
गुगल पेवरुन पैसे पाठवण्यासाठी आता अतिरिक्त शुल्क लागू केले जाईल, अशी माहिती समोर आली होती.
नवी दिल्ली : कॅशलेस इंडिया मोहिमेअंतर्गत रोखीने व्यवहार करण्याऐवजी कार्ड्स अथवा डिजीटल पद्धतीने व्यवहारांवर भर देण्यात आला. त्यामुळे भीम ऍप, गुगल पे, फोन पे, पेटीएम अशा डिजीटल पेमेंट्स ऍपची चलती निर्माण झाली. वापरायला सोपे आणि सहज असल्याने कोट्यवधी युझर्सनी यांना पसंती दर्शवली. मात्र, यातील गुगल पे बाबत अलिकडेच अनेक बातम्या येत होत्या.
गुगल पेवरुन पैसे पाठवण्यासाठी आता अतिरिक्त शुल्क लागू केले जाईल, अशी माहिती समोर आली होती. आजवर मोफत वापरल्या जाणाऱ्या या ऍपलाही आता चार्जेस भरावे लागणार या चिंतेने अनेक लोक हैराण झाले होते. मात्र, आता गुगलने स्पष्ट केलंय की, भारतात गुगल पे ऍपद्वारे पैसे ट्रान्सफर करण्यासाठी भारतीय युझर्सना कोणत्याही प्रकारचे चार्जेस आकारण्यात येणार नाहीयत. हा बदल फक्त अमेरिकन युझर्सासाठीच मर्यादीत आहे.
हेही वाचा - नव्या वर्षात ट्विटर पुन्हा देणार ब्लू टिक; तब्बल तीन वर्षानंतर व्हेरिफिकेशन प्रोग्राम
मागच्या आठवड्यात गुगलने घोषणा केली होती की पुढील वर्षापासून एँड्रॉईड आणि आयओएसवर नव्या गुगल पे ऍपचे आगमन होईल. त्याच्यानंतर युझर वेब ब्राऊझरच्या द्वारे या सेवेचा उपयोग करु शकणार नाही. रिपोर्टनुसार, गुगल पे वरुन तात्काळ पैसे ट्रान्सफर पाठवायला पैसे देखील आकारले जाणार असल्याची बातमी होती.
याबाबत आता गुगलच्या प्रवक्त्यांनी संदिग्धता दूर केलीय. त्यांनी म्हटलंय की, हे चार्जेस खासकरुन अमेरिकेसाठी आहे. तसेच भारतात गुगल पे किंवा गुगल पे फॉर बिझनेस ऍपवर हे चार्जेस लागू होणार नाहीत. गुगल पेचे भारतात सप्टेंबर 2019 पर्यंत एकूण 6.7 कोटी युझर्स होते. तसेच या द्वारे वर्षाला एकूण 110 अब्ज अमेरिकन डॉलर जमा झाले होते.