अवकाशगंगांची संख्या दोन हजार अब्ज

वृत्तसंस्था
बुधवार, 18 जानेवारी 2017

लंडन : विश्‍वामध्ये एकूण दोन हजार अब्ज अवकाशगंगा असल्याचे नव्या अभ्यासातून समोर आले आहे. पूर्वी असलेल्या अंदाजापेक्षा ही संख्या दसपटीने अधिक आहे.

लंडन : विश्‍वामध्ये एकूण दोन हजार अब्ज अवकाशगंगा असल्याचे नव्या अभ्यासातून समोर आले आहे. पूर्वी असलेल्या अंदाजापेक्षा ही संख्या दसपटीने अधिक आहे.

विश्‍वामधील अवकाशगंगांची संख्या जाणून घेण्यासाठी संशोधक सातत्याने प्रयत्न करत असतात. मागील वीस वर्षांपासून यासाठी ते अवकाशात असलेल्या हबल दुर्बिणीचा वापर करत आहेत. या दुर्बिणीद्वारे मिळणाऱ्या छायाचित्रांचा अभ्यास करून विश्‍वामध्ये शंभर ते दोनशे अब्ज अवकाशगंगा असल्याचा निष्कर्ष संशोधकांनी काढला होता. ब्रिटनमधील नॉटिंगहॅम विद्यापीठातील खगोलशास्त्रज्ञ ख्रिस्तोफर कॉन्सेलाइस यांच्या नेतृत्वाखालील गटाने नव्याने अभ्यास करत अवकाशगंगांची संख्या अधिक असल्याचा दावा केला आहे. अवकाशगंगा मोजण्याबाबतचे विश्‍लेषण केल्यावर या गटाने हबलसह इतर सर्व दुर्बिणींमधून मिळणाऱ्या पेन्सिल बीम छायाचित्रांचे त्रिमितीय नकाशात (थ्री डी मॅप) रूपांतर केले. यामुळे अवकाशगंगांची घनता मोजणे शक्‍य झाले, तसेच अवकाश पोकळीला छोट्या छोट्या भागात विभागून प्रत्येकाचा स्वतंत्र अभ्यास करणे शक्‍य झाले. या अत्यंत अवघड आणि किचकट संशोधनानंतर या गटाला आतापर्यंत न मोजल्या गेलेल्या अवकाशगंगांचा शोध घेता आला. त्यांचे हे संशोधन विश्‍वाच्या विविध कालखंडातील अवकाशगंगांच्या निरीक्षणावर आधारलेले आहे. अवकाशगंगांची संख्या मोजता, ती पूर्वीच्या अनुमानापेक्षा जवळपास दहा पटीने अधिक असल्याचे त्यांच्या लक्षात आले.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: galaxy number two thousand billion