शंभर देशांना सायबर हल्ल्याचा फटका

वृत्तसंस्था
रविवार, 14 मे 2017

हल्ल्याचा परिणाम 

  • ब्रिटनमधील रुग्णालयांमधील संगणक बंद पडल्याने आरोग्यसेवेला फटका, अनेक रुग्णांना घरी पाठविण्यात आले. 
  • स्पेनसह जगभरातील अनेक कंपन्यांच्या कामकाजावर परिणाम 
  • भारतातीलही काही कंपन्यांच्या कामकाजावर परिणाम 
  • हल्ल्यामुळे परिस्थिती गंभीर बनण्याचा रशियाचा इशारा 
  • 'रॅनॉल्ट' मोटार उत्पादन कंपनीला उत्पादन थांबविणे भाग 

सियाटल : जगभरातील जवळपास शंभर देशांना आज सायबर हल्ल्याचा फटका बसला असून, यामध्ये भारताचाही समावेश आहे. अमेरिकेच्या राष्ट्रीय सुरक्षा संस्थेमधून (एनएसए) चोरलेल्या 'सायबर शस्त्रा'च्या आधारेच हॅकर्सनी हा हल्ला केल्याचा दावा तज्ज्ञांनी केला आहे. 

अमेरिकेतील माध्यमांनी दिलेल्या माहितीनुसार हा सायबर हल्ला झाल्याचे सर्वप्रथम स्वीडन, ब्रिटन आणि फ्रान्समध्ये लक्षात आले. एका मालवेअरची (संगणकीय यंत्रणेत बेकायदा प्रवेश करणारे सॉफ्टवेअर) ऍक्‍टिव्हिटी वाढल्याचे लक्षात येईपर्यंत जगभरात जवळपास एक लाख यंत्रणांमध्ये सायबर हल्ले झाल्याचे लक्षात आले.

सायबर सुरक्षा कंपनी असलेल्या कॅस्परस्कीने केलेल्या तपासानुसार ब्रिटन, रशिया, युक्रेन, भारत, चीन, इटली, स्पेन आणि इजिप्त या देशांसह 99 देशांना या हल्ल्याचा फटका बसला. या सायबर हल्ल्याचा सर्वाधिक फटका ब्रिटन आणि रशियाला बसल्याचे समजते. मायक्रोसॉफ्ट विंडोजचे जुने व्हर्जन असलेल्या यंत्रणांवर हा हल्ला होतो आहे. रशिया व भारतामध्ये अद्यापही बऱ्याच ठिकाणी विंडोजचे जुनेच व्हर्जन वापरात असल्याने या दोन्ही देशांना फटका बसला आहे. हा आतापर्यंतचा सर्वांत मोठा सायबर हल्ला मानला जातो. 

अमेरिकेच्या कम्प्युटर इमर्जन्सी रेडीनेस टीमच्या (यूएससीईआरटी) माहितीनुसार त्यांच्याकडे 'वॉनाक्राय रॅन्समवेअर' या मालवेअरच्या पसरण्याबाबत जगभरातून अहवाल आले आहेत. संगणक यंत्रणेत घुसून खंडणी (रॅन्सम) मागणाऱ्या या मालवेअरबाबत तपास सुरू असल्याचे आणि इतर देशांना याबाबत अधिक माहिती देण्यास तयार असल्याचे त्यांनी सांगितले. 

हल्ल्यामागे 'शॅडो ब्रोकर्स'? 
हा मालवेअर 14 एप्रिलला शॅडो ब्रोकर्स या नावाच्या गटाने ऑनलाइन उपलब्ध करून दिला होता. याच गटाने गेल्या वर्षीही अमेरिकेच्या सुरक्षा संस्थेवर सायबर हल्ला केल्याचा संशय आहे. या हल्ल्यामागे हॅकर्सचा नक्की काय उद्देश आहे, हे समजलेले नाही. त्यांनी पैसे देण्यासाठी येत्या शुक्रवारपर्यंत मुदत दिली असल्याचेही हॅक झालेल्या संगणकांवरील संदेशात दिसत आहे. 

'रॅन्समवेअर'चा फटका 
संगणकामध्ये घुसून त्यातील डाटा लॉक करणारा आणि अनलॉक करण्यासाठी खंडणी मागणारा हा मालवेअर असल्याचे तज्ज्ञांनी सांगितले. संगणक अन्‌लॉक करण्यासाठी तीनशे अमेरिकी डॉलर डिजिटल करन्सी बिटकॉइनच्या स्वरूपात देण्याची मागणी करण्यात येत आहे. तसेच, वेळेत दिले नाहीत तर ही रक्कम वाढविण्याचीही धमकी दिली जात आहे. हा मालवेअर ई-मेलद्वारे पसरत आहे. मात्र, नागरिक अथवा संस्थांनी हे पैसे भरू नयेत, असे आवाहन 'यूएनसीईआरटी'ने केले आहे. 

स्नोडेनने दिला होता इशारा 
हा हल्ला अमेरिकेच्या सुरक्षा संस्थेने (एनएसए) तयार केलेल्या सॉफ्टवेअरद्वारेच केला गेला असल्याची शक्‍यता वर्तविण्यात येत आहे. हॅकर्सने 'एनएसए'ची यंत्रणा हॅक करून तो लीक केला आणि त्यातील कोड वापरून हा हल्ला केल्याचे मानले जाते. 'एनएसए' अतिशय धोकादायक सॉफ्टवेअर तयार करत असल्याचा इशारा या संस्थेचा माजी कर्मचारी आणि अमेरिकेच्या संरक्षण मंत्रालयाची गोपनीय कागदपत्रे उघड करणाऱ्या एडवर्ड स्नोडेन याने पूर्वीच दिला होता. अमेरिकेने असे सॉफ्टवेअर तयार करताना सुरक्षेऐवजी आक्रमकतेवरच भर दिल्याने जगभरातील इंटरनेट सेवा सुरक्षित राहिली नसल्याची टीकाही काही तज्ज्ञांनी केली आहे. 

    Web Title: Global Cyber attack infects 100 countries all over the world