थेअरी ऑफ रिलेव्हिटीबाबत न्युटन अन् आइन्स्टाईनचा सिंध्दातही अपूरा

सम्राट कदम
बुधवार, 31 जुलै 2019

- तब्बल शंभर वर्षांनंतरही आइन्स्टाईनच्या गुरुत्वाकर्षण संबंधीच्या 'सापेक्षता' सिद्धांतातील विविध कंगोरे समोर येत आहे.
- वैज्ञानिकांनी अवकाशात शोधलेल्या निरिक्षणात्मक तथ्यांतून तो वेळोवेळी बरोबर ठरत आहे.
- नुकतेच आपल्या आकाशगंगेच्या केंद्रात असलेल्या महाकाय कृष्णविवराजवळ गुरुत्वाकर्षणाची निरीक्षणे घेण्यात आली. त्यामध्ये ही आइन्स्टाईनने तेंव्हा सांगितलेली गृहीतके खरी ठरली आहेत.

पुणे : तब्बल शंभर वर्षांनंतरही आइन्स्टाईनच्या गुरुत्वाकर्षण संबंधीच्या 'सापेक्षता' सिद्धांतातील विविध कंगोरे समोर येत आहे. वैज्ञानिकांनी अवकाशात शोधलेल्या निरिक्षणात्मक तथ्यांतून तो वेळोवेळी बरोबर ठरत आहे. नुकतेच आपल्या आकाशगंगेच्या केंद्रात असलेल्या महाकाय कृष्णविवराजवळ गुरुत्वाकर्षणाची निरीक्षणे घेण्यात आली. त्यामध्ये ही आइन्स्टाईनने तेंव्हा सांगितलेली गृहीतके खरी ठरली आहेत. मात्र, कृष्णविवराच्या आतील गुरुत्वाकर्षण समजून घेण्यासाठी आइन्स्टाईनची सिद्धांतही अपुरा पडत आहे. निदान वैज्ञानिकदृष्ट्या तरी काही अंशी आइनस्टाईन आज तरी बरोबर असल्याचे मत कॅलिफोर्निया विद्यापीठातील खगोलशास्त्राच्या प्राध्यापिका अँन्ड्रीय चेझ यांनी म्हटले आहे. 

या संबंधीचा शोध निबंध 'सायन्स' या प्रतिष्ठित आंतरराष्ट्रीय शोधपत्रीकेत 25 जुलै रोजी प्रकाशित झाला आहे. डॉ. चेझ हे त्या संशोधकांच्या गटाच्या प्रमुख आहे. त्या म्हणतात,''आपण न्युटनचे गुरुत्वाकर्षणाचे नियम केव्हाच धुडकावून लावले आहेत. आम्ही घेतलेली निरीक्षणेही आइन्स्टाईनच्या सापेक्षतावादा जवळ जाणारी आहे. परंतु, कृष्णविवराच्या मधील गुरुत्वाकर्षणाचा अभ्यास करण्यासाठी आइन्स्टाईनचे सिद्धांतही अपुरे ठरत आहे. आता आपल्याला नवीन गुरुत्वाकर्षणाच्या सिद्धांताची गरज आहे.'' 

- काय आहे आइन्स्टाईनचा 'सापेक्षता सिद्धांत' ? 
आइन्स्टाईनने 1915 मध्ये सापेक्षता सिद्धांत मांडला. या सिद्धांतामुळे न्युटनचा गुरुत्वाकर्षणाचा नियम मोडीत निघाला. न्युटनच्या सिद्धांताप्रमाणे पृथ्वीच्या पोटातच गुरुत्वाकर्षण शक्ती आहे. परंतु हे खोटे ठरवत 'गुरुत्वाकर्षण बल हे अवकाश आणि वेळ यांच्यातील वक्रतेमुळे निर्माण झाल्याचा सिद्धांत आइन्स्टाईनने मांडला. पृथ्वी आणि सूर्य यांच्याद्वारे उत्तम पद्धतीने सापेक्षतावाद समजून घेता येतो. भौतिकशास्त्राचे सर्व नियम आणि सापेक्षता सिद्धांत ब्रम्हांडातील सर्व ग्रह ताऱ्यांना लागू होतो. 

- काय आहे संशोधन ? 
कॅलिफोर्निया विद्यापीठातील संशोधकांच्या गटाने महाकाय कृष्णविवराजवळील 'एसओ-2' या ताऱ्याची निरीक्षणे घेतली. त्यातून या ताऱ्याला कृष्णविवरा भोवती एक पूर्ण चक्कर लावायला 16 वर्षे लागतात असे समोर आले. आपल्या आकाशगंगेच्या केंद्राशी असलेला हा कृष्णविवर आपल्या सूर्यापेक्षा 40 लाख पटीने जास्त वजनाचा आहे. संशोधकांनी मागील 24 वर्षांपासून या ताऱ्याची निरीक्षणे घेतली. या ताऱ्यापासून बाहेर पडणाऱ्या किरणाला पृथ्वी पर्यंत पोहण्यासाठी तब्बल 26 हजार वर्षे लागतात. या प्रकाश किरणांवर गुरुत्वाकर्षणाचा होणारा परिणाम शास्त्रज्ञांनी अभ्यासला आणि त्यातून आइन्स्टाईनने मांडलेला सापेक्षतेचा सिद्धांत कसा लागू होतो याची पडताळणी केली. बहुतांशी प्रमाणात हा सिद्धांत लागू पडला परंतु कृष्णविविराच्या आतमध्ये गुरुत्वाकर्षण कसे काम करते याची उत्तरे मात्र अनुत्तरीत राहीली. 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Incomplete Newton and Einstein's theory of the black hole insight