
Kent RO Systems : बचतीची खात्री देणारा कूल पंखा; डॉ. महेश गुप्ता
पुणे : शुद्ध पेयजल पुरविणाऱ्या ‘केंट आरओ’ या कंपनीने अलीकडेच ‘कूल’ या ब्रँडअंतर्गत अत्याधुनिक पंखा बाजारात आणला आहे. यातील अनोख्या तंत्रज्ञानामुळे पंख्यांचा आवाज कमी होतोच, शिवाय सर्वसाधारण पंख्यांना लागणाऱ्या विजेच्या तुलनेत ६५ टक्के विजेची बचत होते.
रिमोटच्या साह्याने, ‘अॅलेक्सा’च्या आवाजावर चालणारे हे पंखे देशाची दोन लाख कोटी रुपयांची वीजबचत करू शकतात, असा दावा ‘केंट आरओ’चे मुख्य व्यवस्थापकीय संचालक डॉ. महेश गुप्ता यांनी केला आहे.
पेट्रोलियम अभियंता असलेले डॉ. महेश गुप्ता यांचे कानपूर आयआयटीमध्ये शिक्षण झाले आहे. ‘इंडियन ऑईल’मधील दहा वर्षांच्या नोकरीदरम्यान त्यांनी इंधनाची बचत करण्यासंदर्भात काम केले होते. ते आता विजेच्या बचतीकडे वळाले आहेत.
कंपनीने बाजारात आणलेल्या ‘कूल’ पंख्याच्या वैशिष्ट्याबद्दल आणि त्यामागील संकल्पनेबाबत विचारले असता डॉ. गुप्ता म्हणाले,‘‘पंख्यामुळे वीज वाचण्याबरोबरच त्यांच्यामुळे घराचे सौंदर्य वाढावे, हा उद्देश होता. सध्या घराच्या सजावटीमध्ये फर्निचर, पडदे नवे असले तरी पंखे जुनेच असतात.
त्यामुळे ग्राहकांना नव्या पंख्यांचा पर्याय द्यावा, आपले पंखे आवाज करणारे नसावेत, ते रिमोटने, मोबाईल फोनने, आवाजाने चालतील, असे त्यात तंत्रज्ञान असावे आणि पंखा केवळ हवा देणारा नसावा तर तो प्रकाशही देणारा असावा, यासारख्या गोष्टींचा विचार करण्यात आला. आमचा हा पंखा पूर्णपणे ‘मेक इन इंडिया’ संकल्पनेवर आधारित आहे.’’
‘बीएलडीसी’ तंत्रज्ञानाचा वापर
विजेची बचत करणाऱ्या तंत्रज्ञानाबाबत माहिती सांगताना डॉ. गुप्ता यांनी सांगितले की, ‘हा पंखा केवळ विजेचीच नव्हे तर ग्राहकांच्या कमाईची बचतही करणारा आहे. जास्त आवाज करणारा पंखा चांगली हवा देतो, हे खरे नाही. अधिक पाते असल्यास पंखा कमी वेगातही जास्तीत जास्त हवा देतो. सर्वसाधारण पंख्यांमध्ये तीन पाती असतात.
यामध्ये आठ आठ पाते असलेलेही पंखे आहेत. सध्याचे पंखे इंडक्शन तंत्रज्ञानावर काम करणारे आहेत. ‘कूल’ पंख्यांमध्ये ब्रशलेस डायरेक्ट करंट (बीएलडीसी) तंत्रज्ञान वापरले आहे. या तंत्रज्ञानामध्ये कॉईलचा वापर होत नाही, तर विद्युतप्रवाह सायनोसायडल वेव्ह स्वरूपात दिला जातो. त्यामुळे वीजबचत होते.
वीजबचत ६५ टक्के
‘कूल’ पंख्यांना केवळ २८ वॉट वीज लागते, असे सांगताना डॉ. गुप्ता यांनी सर्वसाधारण पंखा ७० ते ७५ वॉट विजेवर चालतो, असे निदर्शनास आणून दिले. म्हणजेच ६५ टक्के वीज कमी लागते. ‘पंख्यावर तुमचे १०० रुपये खर्च होत असतील, तर या पंख्यामुळे तुमचा खर्च केवळ ३५ रुपये असेल. देशात १२० कोटी पंखे आहेत.
एका पंख्यावर एका वर्षात किमान दीड हजार रुपयांची वीज वाचेल. सर्वांनी पंखे बदलले तर १२० कोटी पंख्यांसाठी संभाव्य बचत दोन लाख कोटी रुपयांची ठरेल,’ असा हिशोब डॉ. गुप्ता यांनी सांगितला.
सर्वसाधारण पंख्याच्या तुलनेत ‘बीएलडीसी’ पंखा महाग म्हणजे, तीन हजार रुपयांना मिळत असला तरी तो दोन वर्षात संपूर्ण किंमत वसूल करून देतो, असेही त्यांनी सांगितले. शिवाय, ५०० व्हीए क्षमतेच्या इन्व्हर्टरवर एकच सर्वसाधारण पंखा चालतो. तितक्याच क्षमतेच्या इन्व्हर्टरवर आमचे तीन पंखे चालतील, असा दावा गुप्ता यांनी केला. या क्षमतेमुळे या पंख्यांचा ग्रामीण भागात चांगला उपयोग होईल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.
देशासाठी काही तरी करावे हा निर्धार आधीपासूनच होता. त्यातूनच तेल बचतीवर काम केले. त्यानंतर लोकांना पिण्यासाठी स्वच्छ पाणी मिळावे यातून रिव्हर्स ऑस्मॉसिस तंत्रज्ञानावर आधारित ‘केंट आरओ’चे उत्पादन सुरू केले. आता वीज वाचवायचे लक्ष्य आहे. त्यातून कूल पंखे आणले आहेत. अतिशय समाधान देणारा हा प्रवास आहे आणि आणखी बरेच काही करायचे आहे.
- डॉ. महेश गुप्ता,केंट आरओ’चे मुख्य व्यवस्थापकीय संचालक