जपान करतोय लाकडाचा सॅटेलाईट बनवण्याची तयारी;जाणून घ्या काय आहे याचा फायदा?

सकाळ वृत्तसेवा
Friday, 1 January 2021

हे उपग्रह सोडताना त्यातून होणाऱ्या प्रदुषणाबाबत अद्याप कसलाही उपाय शोधण्यात आला नाहीये.

क्योटो : पृथ्वीवरील मानवाने अवकाशात आपल्या फायद्यासाठी अनेक उपग्रह सोडले आहेत. मात्र, हे उपग्रह सोडताना त्यातून होणाऱ्या प्रदुषणाबाबत अद्याप कसलाही उपाय शोधण्यात आला नाहीये. उपग्रह सोडताना उर्वरित अवकाशीय कचरा तसाच अवकाशात सोडला जातो. जो वर्षानुवर्षे तसाच टिकून राहतो.  अमेरिकेची स्पेस एजन्सी NASA च्या सांगण्यानुसार 5 लाखाहून अधिक कचऱ्याचे तुकडे आपल्या पृथ्वीभोवती चकरा मारत आहेत. यातील काही अत्यंत वेगाने  फिरत आहेत. या अवकाशीय कचऱ्यामुळे आपल्या उपग्रहांना अथवा स्पेसक्राफ्ट्सना नुकसाना पोहोचू शकते. अवकाशीय कचऱ्याच्या या तुकड्यांमुळे इंटरनॅशनल स्पेस स्टेशन्सना देखील धोका होऊ शकतो. जपानच्या क्योटो युनिव्हर्सिटी आणि कंस्ट्रक्शन कंपनी Sumitomo Forestry ने 2023 पर्यंत या समस्येवरील उत्तर शोधण्यासाठी पाऊल उचललं आहे. 

हेही वाचा - कोरोनाची लस टोचली की त्या क्षणापासूनच माणूस बिनधास्त जगू शकतो?

जपानच्या एस्ट्रॉनॉट् आणि युनिव्हर्सिटी प्रोफेसर असलेल्या तकाओ दोई यांनी याबाबत माहिती दिली आहे. त्यांनी म्हटलंय की, अवकाशीय कचरा हा खरंच एक चिंतेचा विषय आहे. त्यांनी पुढे म्हटलं की, सॅटेलाईट पृथ्वीवर परत येताना जळून जातात आणि त्यांचा कचरा वर्षानुवर्षे पृथ्वीभोवती फिरत राहतो. यामुळे पर्यावरणावर गंभीर असा परिणा होतो. NASA च्या म्हणण्यानुसार, या अवकाशीय कचऱ्याचे तुकडे 17,500 मैल प्रति तास या वेगापर्यंत फिरू शकतात.

काय होईल फायदा ?
जपानने या समस्येवर एक उपाय शोधला आहे. लाकडापासून बनलेल्या सॅटेलाईट्सवर काम करायला त्यांनी सुरवात केली आहे. तापमानात होणारे बदल आणि सुर्याच्या उष्णतेपासून वाचण्याची पुरेपुर क्षमता असणारे हे उपग्रह जपान बनवण्याचा प्रयत्न करतोय. याप्रकारचा हा जगातील पहिलाच प्रोजेक्ट आहे. या प्रोजेक्टसाठी सध्या पृथ्वीवरील प्रतिकूल परिस्थितीमध्ये लाकडाचे परिक्षण केले जात आहे. पृथ्वीवर परत  येताना हे सॅटेलाईट पूर्णपणे जळून जाईल. तसेच अवकाशात मागे कसलाही कचरा शिल्लक राहणार नाही. असं या प्रकल्पाचे उद्दिष्ट्य आहे. जपान सध्या या उपक्रमावर मोठ्या ताकदीनीशी काम करतो आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: kno why japan is working on worlds first satellite made of wood