मंगळावर पाण्याची सरोवरे; शास्त्रज्ञांच्या दाव्याने जीवसृष्टीबाबत चर्चांना उधाण

सकाळ वृत्तसेवा
Tuesday, 29 September 2020

'नेचर ऍस्ट्रॉनॉमी'मध्ये या संशोधनाबाबतचा अहवाल काल 28 सप्टेंबर रोजी प्रसिद्ध झाला आहे. 

पृथ्वी सोडून इतर ग्रहांवर जीवसृष्टी असावी का? हा प्रश्न आजवर सातत्याने चर्चेमध्ये आला आहे. इतर ग्रहावर जीवसृष्टीच्या अस्तित्वासाठी महत्वपूर्ण घटक आहे तो म्हणजे पाणी. पृथ्वीचा शेजारी असलेला लाल ग्रह म्हणजेच मंगळ हा याबाबत सतत संशोधनाचा केंद्रबिंदू राहिला आहे. मंगळावर पाणी आहे की नाही याचे संशोधन आणि चर्चा सातत्याने होते. मात्र आता मंगळावर पाण्याची सरोवरे असल्याचा शोध संशोधकांनी लावला आहे. मंगळावरील जमीनीच्या आत ही तीन सरोवरे दबलेली आहेत, असा संशोधकांचे म्हणणे आहे. नेचर अॅस्ट्रॉनॉमी मध्ये या संशोधनाबाबतचा अहवाल काल 28 सप्टेंबर रोजी प्रसिद्ध झाला आहे. 

काय आहे हे संशोधन?
दोन वर्षांपूर्वी ग्रहांचा अभ्यास करणाऱ्या शास्त्रज्ञांनी मंगळावर खाऱ्या पाण्याचे सरोवर असल्याचा शोध लावला होता. मंगळ ग्रहाच्या दक्षिण ध्रुवावर हे सरोवर असल्याचा शास्त्रज्ञांचा दावा होता. या संशोधनाने उत्साह निर्माण झाला होताच पण त्याबरोबरच बरेच प्रश्नही उभे राहिले होते. आणि आता संशोधकांनी त्या खाऱ्या पाण्याच्या सरोवराच्या अस्तित्वावर शिक्कामोर्तब केलं आहे. 
फक्त ते एकच सरोवर नव्हे तर त्या सरोवराच्या आजूबाजूला आणखीही तीन सरोवरांचे अस्तित्व दिसून आल्याची निरीक्षणे संशोधकांनी नोंदवली आहेत. प्रसिद्ध झालेल्या अहवालानुसार आधी मिळालेल्या सरोवरासारखीच आणखी तीन सरोवर असल्याचे शास्त्रज्ञांनी म्हटलं आहे. 

हेही वाचा - सुशांतच्या मृत्यूबाबत महत्त्वाचा खुलासा; AIIMS च्या डॉक्टरांचा अहवाल​

काय आहे संशोधकांचं म्हणणं?
रोम विद्यापीठीत असणाऱ्या ग्रह अभ्यासक इलेना पेट्टीनेल्ली यांनी म्हटलं की, आधी सापडलेल्या पाण्याच्या सरोवराच्या जवळच आणखी तीन पाण्याचे सरोवर सापडले आहेत. ही सरोवरे बर्फाखाली दबली गेली आहेत. हि सरोवरे 75 हजार चौरस किमी परिसरात  पसरलेली आहेत. म्हणजे जवळपास जर्मनी देशाच्या एक पंचमांश क्षेत्रफळ इतकी जागा या सरोवरांनी व्यापलेली आहे. यातील सर्वात मोठे सरोवर 30 किमीच्या परिसरात आहे तर इतर तीन बाजूची सरोवरे काही किमी अंतराची आहेत. 
 

हेही वाचा - राहुल गांधींची किसान की बात; काँग्रेस कृषी कायद्यांना देणार न्यायालयात आव्हान

कसे झाले संशोधन?
युरोपियन स्पेस एजन्सीच्या मार्स एक्स्प्रेस स्पेसक्राफ्टच्या रडारद्वारे प्राप्त झालेल्या माहितीद्वारे हे संशोधन करण्यात आले आहे. 2018 मध्ये सापडलेल्या सरोवराच्या परिसरातच या सरोवरांचे अस्तित्व आढळून आले आहे. जर हे खरे असेल तर मंगळावर पाण्याचा अंश असल्याचा आणि त्या अनुषंगाने जीवसृष्टीच्या अस्तित्वाचीही शक्यता नाकारता येणार नाही. पण 2012 ते 2015 दरम्यान 29 निरीक्षणांच्या आधारे हे दावे करण्यात आले आहेत. आणि संशोधकांचं असं म्हणणं आहे की, त्यांच्या या दाव्याला आणखी मजबूत करणारे आणखी काही पुरावे आवश्यक आहेत. 

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Liquid water on Mars report published in Nature Astronomy