सुशांतच्या मृत्यूबाबत महत्त्वाचा खुलासा; AIIMS च्या डॉक्टरांचा अहवाल

सकाळ वृत्तसेवा
Tuesday, 29 September 2020

एम्सच्या डॉक्टरांकडून सुशांतसिंहच्या पोस्टमार्टमच्या अहवालाचे पुन्हा एकदा मुल्यांकन करण्यात आले आहे. तसेच त्याच्या आतड्याचे परिक्षण (viscera reports) करुन ही हत्या आहे की आत्महत्या आहे, याचा अहवाल सीबीआयला दिला गेला आहे.

नवी दिल्ली : सुशांत सिंह राजपूतचा मृत्यू ही हत्या की आत्महत्या यावर अनेक दावे-प्रतिदावे केले जात आहेत. त्याचा मृत्यू गळफासामुळे झाला की विषप्रयोगामुळे झाला, यासंबधीचे अनेक आरोप-प्रत्यारोप सुरु आहेत. मात्र आता विषप्रयोगाच्या दाव्याला
पूर्णविराम देणारा एक अहवाल समोर आला आहे. 

सुशांत सिंह राजपूतच्या मृत्यूसंदर्भात दिल्लीच्या एम्सच्या (India Institute of Medical Sciences - AIIMS) डॉक्टरांच्या एका समितीने सीबीआयला हा अहवाल दिला आहे. या अहवालानुसार सुशांत सिंहचा मृत्यू विष दिल्यामुळे झालेला नाहीये, असं स्पष्ट करण्यात आलं आहे. सुशांतच्या परिवाराकडून तसेच इतर अनेकांकडून सुशांतवर विषप्रयोग झाल्याचा आरोप आणि दावा केला गेला होता. मुंबई पोलिसांनी सुशांत सिंहचा मृत्यू आत्महत्येमुळे झाला असल्याचं सांगितलं होतं. मात्र, सुशांतवर विषप्रयोग झाला असल्याचा दावा केला गेला होता. नंतर हे प्रकरण मुंबई पोलिसांकडून सीबीआयकडे सोपवण्यात आले होते. 

हेही वाचा - कोरोना, ब्रुसेलोसिस आणि आता कॅट क्यू व्हायरस? नव्या विषाणूबद्दल आयसीएमआरची माहिती

एम्स डॉक्टरांच्या  समितीचे प्रमुख डॉ. सुधीर गुप्ता यांनी याबाबत माहिती दिली आहे. एम्सच्या डॉक्टरांकडून सुशांतसिंहच्या पोस्टमार्टमच्या अहवालाचे पुन्हा एकदा मुल्यांकन करण्यात आले आहे. तसेच त्याच्या आतड्याचे परिक्षण (viscera reports) करुन ही हत्या आहे की आत्महत्या आहे, याचा अहवाल सीबीआयला दिला गेला आहे. आणि या अहवालाद्वारे स्पष्ट करण्यात आले आहे की, विषप्रयोग म्हणता येईल, असा  कोणताही पुरावा त्यांना उपलब्ध झालेला नाही. 

14 जून रोजी 34 वर्षीय सुशांत सिंह राजपूतचा मृतदेह संदिग्ध अवस्थेत त्याच्या मुंबईच्या घरात सापडला होता. मुंबई पोलिसांनी ऑटोप्सीच्या आधारे ही आत्महत्या असल्यांचं जाहीर केलं होतं. मात्र, त्याच्या मृत्यूवर सोशल मिडीयात अनेक दावे-प्रतिदावे आणि आरोप-प्रत्यारोप केले गेले. जस्टीस फॉर सुशांत नावाची मोहीमदेखील चालवली गेली. यानंतर सुशांतच्या कुटुंबाकडून त्याच्या गर्लफ्रेंडवर म्हणजेच रिया चक्रवर्तीवर अनेक आरोप लावले गेले. या प्रकरणाने वातावरण इतकं गरम झालं होतं की या प्रकरणाचा तपास मुंबई पोलिसांकडून सीबीआयकडे देण्यात आला.

हेही वाचा - राहुल गांधींची किसान की बात; काँग्रेस कृषी कायद्यांना देणार न्यायालयात आव्हान

सध्या या प्रकरणातून ड्रग्ज कनेक्शन समोर आले आहे. एकूण प्रकरणाने नवे वळण घेतले आहे. सुशांतच्या ड्रग्ज सेवनातून बॉलिवूड ड्रग्ज कनेक्शनचा तपास होत आहे. सीबीआय सध्या आत्महत्येला प्रवृत्त केलं गेलंय का या दिेशेने आपला तपास करत आहे. सुशांतच्या मित्रांनी आणि त्याच्या कुंटुंबियांनी त्याच्या मृत्यूबद्दल अनेक प्रश्न उपस्थित केले होते. रिया चक्रवर्तीने सुशांतचा मानसिक छळ केल्याचा आरोप त्याच्या कुटुंबियांकडून करण्यात आला होता. त्याला माहित नसताना त्याला औषधे देणे, पैशांसाठी शोषण करणे आणि त्याच्या मृत्यूसाठी कारणीभूत असण्यासाठी रियावर आरोप लावले गेले होते. मागच्या आठवड्यात कुटुंबियांचे वकील विकास सिंह यांनी असा दावा केला होता की एम्सच्या समितीत सामिल असणाऱ्या एका डॉक्टरांनी त्यांना ही माहिती दिली होती की सुशांतचा मृत्यू गळा दाबल्यामुळे झाला होता.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Sushant Singh Rajput Case AIIMS Doctor crucial report about death