स्मार्टफोन आहे; पण इंटरनेट मिळत नाही..! 

वृत्तसंस्था
मंगळवार, 1 ऑगस्ट 2017

'रिलायन्स'ने 'जिओ'ची घोषणा केल्यापासून देशातील दूरसंचार क्षेत्रातील कंपन्यांमधील स्पर्धा तीव्र झाली आहे. यामुळे मोबाईलवरून इंटरनेट वापरणाऱ्यांचे प्रमाण गेल्या आठ महिन्यांत चौपट झाले आहे.

नवी दिल्ली : भारतामध्ये आता जवळपास प्रत्येक हातात स्मार्टफोन असला, तरीही त्यापैकी बहुतांश स्मार्टफोनवर वापरण्यासाठी अद्याप इंटरनेटची सुविधाच उपलब्ध नसल्याचे 'ट्रू बॅलन्स' या मोबाईल ऍप्लिकेशनने केलेल्या सर्वेक्षणातून समोर आले आहे. गेल्या आठ महिन्यांत भारतातील इंटरनेटच्या प्रसाराचा वेग वाढला आहे. तरीही अद्याप 56 टक्के स्मार्टफोनवर अद्याप इंटरनेटची सुविधा नाही. 

'भारतामध्ये इंटरनेट वाढत असले, तरीही प्रत्यक्ष इंटरनेटचा वेग मात्र वाढत नाही. काही भागांमध्ये अजूनही इंटरनेट मिळू शकत नाही. तसेच, काही भागांमध्ये इंटरनेटचा वेग कमीच मिळतो', असे 'ट्रू बॅलन्स'ने म्हटले आहे. 'गेल्या काही महिन्यांत भारतामधील इंटरनेटचा प्रसार वाढला आहे; तरीही काही ठिकाणी पायाभूत सुविधांच्या अभावामुळे स्मार्टफोन असूनही इंटरनेट मिळत नसल्याचा अनेकांचा अनुभव आहे', असेही यात म्हटले आहे. 

'रिलायन्स'ने 'जिओ'ची घोषणा केल्यापासून देशातील दूरसंचार क्षेत्रातील कंपन्यांमधील स्पर्धा तीव्र झाली आहे. यामुळे मोबाईलवरून इंटरनेट वापरणाऱ्यांचे प्रमाण गेल्या आठ महिन्यांत चौपट झाले आहे. तरीही देशातील जवळपास 11 टक्के युझर्सना 24 तासांहून अधिक काळ इंटरनेटशिवाय राहावे लागते, असे या सर्वेक्षणातून समोर आले. 

24 तास इंटरनेटची सुविधा उपलब्ध असलेल्या स्मार्टफोनचे प्रमाण जुलै 2016 मध्ये केवळ सात टक्के होते. 2017 च्या एप्रिलमध्ये हेच प्रमाण 44 टक्के झाले. 

Web Title: marathi news marathi website Smartphone Internet True Balance Survey Internet in India