भारताचे उपग्रहांचे शतक; 'पीएसएलव्ही सी-40'द्वारे 31 उपग्रहांचे प्रक्षेपण

पीटीआय
शनिवार, 13 जानेवारी 2018

श्रीहरीकोटा (आंध्र प्रदेश) : भारताने काल पीएसएलव्ही सी-40 या प्रक्षेपकाच्या साह्याने 'कार्टोसॅट 2' हा आपला शंभरावा उपग्रह अवकाशात यशस्वीपणे प्रक्षेपित करत अवकाश तंत्रज्ञान क्षेत्रातील आपले सामर्थ्य सिद्ध केले. 'कार्टोसॅट'बरोबरच भारताचे आणखी दोन आणि इतर देशांचेही एकूण 28 उपग्रह अवकाशात सोडत आपली व्यापारी क्षमता दाखवून दिली. 

श्रीहरीकोटा (आंध्र प्रदेश) : भारताने काल पीएसएलव्ही सी-40 या प्रक्षेपकाच्या साह्याने 'कार्टोसॅट 2' हा आपला शंभरावा उपग्रह अवकाशात यशस्वीपणे प्रक्षेपित करत अवकाश तंत्रज्ञान क्षेत्रातील आपले सामर्थ्य सिद्ध केले. 'कार्टोसॅट'बरोबरच भारताचे आणखी दोन आणि इतर देशांचेही एकूण 28 उपग्रह अवकाशात सोडत आपली व्यापारी क्षमता दाखवून दिली. 

भारतीय अवकाश संशोधन संस्थेच्या (इस्रो) सतीश धवन अवकाश केंद्रातून पीएसएलव्ही सी-40 चे नियोजित वेळेवर उड्डाण झाले. ही 'पीएसएलव्ही'ची आजवरची सर्वांत मोठी मोहीम होती. आजच्या मोहिमेच्या धवल यशाने चारच महिन्यांपूर्वी पीएसएलव्ही- 39 च्या मोहिमेचे अपयश धुऊन निघाले. या मागील मोहिमेदरम्यान उड्डाणानंतर प्रक्षेपकाचे उष्णताकवच अखेरच्या टप्प्यात विलग न झाल्याने उपग्रहाला बाहेर पडण्याचा मार्ग मिळाला नाही आणि मोहीम अपयशी ठरली होती. मात्र, आजच्या यशामुळे मागील वेळेसचे अपयश दुर्मीळ होते, हे सिद्ध झाले. 'इस्रो'चे अध्यक्ष ए. एस. किरणकुमार हे लवकरच निवृत्त होणार असल्याने त्यांनीही कारकिर्दीतील ही अखेरची मोहीम यशस्वी ठरल्याने आनंद व्यक्त केला. आजची मोहीम ही 'इस्रो'च्या कारकिर्दीतील मैलाचा दगड ठरली. आज 'पीएसएलव्ही सी-40' द्वारे सोडलेल्या 31 उपग्रहांपैकी तीन भारताचे होते. यातील मायक्रो उपग्रह हा अवकाशात सोडलेला भारताचा शंभरावा उपग्रह ठरला. 'इस्रो'ने सोडलेल्या शंभर उपग्रहांमध्ये काही नॅनो आणि मायक्रो उपग्रहांचा समावेश असून, यापैकी काही उपग्रह देशातील शैक्षणिक संस्थांनी तयार केलेले आहेत. 

कक्षेत यशस्वीपणे स्थिर 
काल सोडलेल्या उपग्रहांपैकी सर्वांत महत्त्वाचा उपग्रह कार्टोसॅट- 2 हा होता. पृथ्वी निरीक्षणासाठी सोडलेला हा 710 किलो वजनाचा उपग्रह प्रक्षेपकापासून विलग झाल्यानंतर 17 मिनिटांनी आपल्या नियोजित कक्षेत स्थिर झाला. या उपग्रहानंतर भारताचा नॅनो सॅटेलाइट आणि अमेरिका, ब्रिटन, दक्षिण कोरिया, फ्रान्स, फिनलंड आणि कॅनडा या देशांचे मिळून तीन मायक्रो आणि 25 नॅनो उपग्रह अवकाशात सात मिनिटांच्या अवधीत सोडण्यात आले. या सर्वांचे एकूण वजन 613 किलो होते. यानंतर पीएसएलव्हीचा चौथा टप्पा दोन वेळेस सुरू करून कक्षा बदलण्यात आली आणि पृथ्वीपासून 359.584 किमी अंतरावर प्रक्षेपकाला खाली आणत अखेरचा भारताचा मायक्रो उपग्रह अवकाशात सोडण्यात आला. एकूण दोन तास 21 मिनिटांच्या अवधीत सर्व उपग्रह अवकाशात सोडण्यात आले. 

'कोर्टोसॅट 2'चा उपयोग 
कार्टोसॅट 2 या उपग्रहाद्वारे ग्रामीण आणि शहरी भाग, किनारी भाग यांची उच्चप्रतीची प्रतिमा मिळणार असून त्यामुळे रस्त्यांचे जाळे, पाणीवाटप, इतर भौगोलिक माहिती यावर लक्ष ठेवणे सोपे जाणार आहे. 

हा अत्यंत गौरवाचा क्षण आहे. अवकाश क्षेत्रामध्ये भारताचे भवितव्य उज्ज्वल असल्याचा निर्वाळा मिळाला आहे. 'इस्रो'चे अभिनंदन. नव्या वर्षाच्या सुरवातीलाच अवकाश तंत्रज्ञान क्षेत्रात मिळालेल्या या यशामुळे नागरिक, शेतकरी आणि मच्छीमारांना मोठा फायदा होणार आहे. या यशाचा आमच्या भागीदारांनाही फायदा मिळणार आहे. 
- नरेंद्र मोदी, पंतप्रधान 

नवा इतिहास घडविल्याबद्दल 'इस्रो'चे अभिनंदन. तुमचे कष्ट आणि योगदानामुळेच अवकाश कार्यक्रमांमध्ये भारत आघाडीवर आहे. 
- राहुल गांधी, कॉंग्रेस अध्यक्ष


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marathi news marathi websites ISRO PSLV C40 space science