उतारवयात पोटाचा घेर घटण्याची शक्यता कमीच

वृत्तसंस्था
मंगळवार, 3 ऑक्टोबर 2017

मज्जासंस्थेशी रोगप्रतिकार पेशींचा संवाद कसा चालतो आणि चरबीच्या पेशी पोटावरील चरबी कशा पद्धतीने कमी करतात याचा अभ्यास आम्ही करत होतो. वृद्धांच्या चयापचय प्रक्रियेमध्ये अधिक सुधारणा करण्याचा या अभ्यासाचा हेतू आहे. 

- ख्रिस्तीना डी कॅमेल, संशोधक, येल विद्यापीठ

उतारवयात पोटावरील चरबी कमी होण्याची कमीत कमी शक्यता असल्याचे नव्या संशोधनात समोर आले आहे. वय वाढेल, तसे पोटावरील चरबी घटण्याची शक्यताही कमी होत जाते, असे संशोधन येल विद्यापीठातील जीवशास्त्र संशोधकांनी सादर केले आहे. 

मज्जासंस्था आणि रोगप्रतिकारक शक्ती यांचा परस्परांशी संवाद असतो आणि त्याद्वारे चयापचय क्रियेवर (मेटॅबॉलिझम) नियंत्रण ठेवले जाते, असे संशोधन या संशोधकांनी नुकतेच प्रकाशित केले. या संशोधनातील एका टप्प्यावर संशोधकांनी वयस्कर व्यक्तींच्या पोटावरील चरबीचा अभ्यास केला. वय वाढेल तस तशी चरबी घटण्याची शक्यता मावळते आणि संबंधित व्यक्तीला जीवघेण्या आजाराचा सामना करावा लागतो, असे संशोधनात दिसून आले. 

नेचर या विज्ञानविषयक नियतकालिकामध्ये 27 सप्टेंबरला यासंदर्भातील संशोधन येल विद्यापीठातील प्रा. विश्व दीप दीक्षित यांनी प्रकाशित केले आहे. वयस्कर व्यक्तींच्या पोटावर सर्वाधिक चरबी असते. या व्यक्ती लठ्ठ असतीलच, असे नाही; तथापि त्यांच्या पोटावर चरबी असतेच असते. उर्जेची गरज भासते, तेव्हा सर्वसाधारण व्यक्तीचे शरीर चरबीचा वापर करते. मात्र, वयस्कर व्यक्तींच्याबाबतीत तसे होत नाही. या व्यक्तींचे शरीर उर्जेची गरज भागविण्यासाठी चरबीचा वापर करूच शकत नाही. परिणामी पोटावर विघातक चरबी साचत राहते, असे संशोधकांचे म्हणणे आहे. 

मज्जासंस्थेशी रोगप्रतिकार पेशींचा संवाद कसा चालतो आणि चरबीच्या पेशी पोटावरील चरबी कशा पद्धतीने कमी करतात याचा अभ्यास आम्ही करत होतो. वृद्धांच्या चयापचय प्रक्रियेमध्ये अधिक सुधारणा करण्याचा या अभ्यासाचा हेतू आहे, असे संशोधक ख्रिस्तीना डी कॅमेल यांनी सांगितले. 

रोगप्रतिकारक पेशी आणि मज्जासंस्थेतील संवादाचा आणखी अभ्यास करून रोगांवर इलाज करण्याची पद्धती विकसित करण्यावर संशोधकांची टीम आता काम करणार आहे. रोगप्रतिकारक पेशींची झीज रोखून चयापचय क्रियेत सुधारणा घडवून आणता आल्यास एकूणच वय वाढण्याने निर्माण होणाऱया शारीरिक समस्यांवर मात करता येईल, असा संशोधकांना विश्वास वाटतो आहे.

Web Title: Marathi news science news in Marathi fat on belly