'मेझी'ची सुसाट 'अमेरिकन एक्स्प्रेस'

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 17 फेब्रुवारी 2018

स्नेहल आणि स्वप्नील शिंदे यांनी दहा वर्षांपूर्वी संगीत क्षेत्रात ‘धिंगाणा डॉट कॉम’ आणले आणि एकच खळबळ उडाली. आज दहा वर्षांनी त्या दोघांनी पुन्हा एकदा खळबळ उडवून दिली आहे. ‘आर्टिफिशियल इंटलिजन्स’ (एआय) तंत्रज्ञानावर आधारित त्यांची ‘मेझी’ या दुसऱ्या स्टार्टअपला ‘अमेरिकन एक्‍स्प्रेस’ने नुकतेच विकत घेतले.

स्नेहल व स्वप्नील पुण्याचे. दहा वर्षांपूर्वी त्यांनी संगीत क्षेत्रात ‘धिंगाणा डॉट कॉम’ आणले आणि एकच खळबळ उडाली. आज दहा वर्षांनी त्या दोघांनी पुन्हा एकदा खळबळ उडवून दिली आहे. ‘आर्टिफिशियल इंटलिजन्स’ (एआय) तंत्रज्ञानावर आधारित त्यांची ‘मेझी’ या दुसऱ्या स्टार्टअपला ‘अमेरिकन एक्‍स्प्रेस’ने नुकतेच विकत घेतले. तेसुद्धा सुमारे एक हजार कोटी रुपयांना!!  

‘धिंगाणा डॉट कॉम’ ही म्युझिक स्ट्रिमिंग स्टार्टअप २०१५मध्ये अमेरिकेतील ‘आरडीओ’ या कंपनीला विकल्यानंतर स्नेहल व स्वप्नील शिंदे यांनी ‘मेझी’बाबत विचार सुरू केला. एखाद्या व्यक्तीचे आवडीचे गाणे कोणते असू शकते, याचा अंदाज बांधणाऱ्या धिंगाणाच्या ‘प्रणाली’चा वापर त्यांनी ‘मेझी’ या मोबाईल ॲप्लिकेशनमध्ये पर्यटनाच्या आवडी-निवडी शोधण्यासाठी केला. त्यासाठी त्यांनी ‘चॅटबॉट’ आणि ‘एआय’ तंत्रज्ञानाचा वापर केला. ही संकल्पना घेऊन गुंतवणूक मिळविण्यासाठी प्रयत्न करू लागल्यावर, म्हणजे जून २०१६मध्ये ‘अमेरिकन एक्‍स्प्रेस’ कंपनीने त्यांच्या कंपनीत ३० लाख डॉलर गुंतवले. ऑक्‍टोबर २०१६मध्ये शिंदे बंधूंनी ‘ॲमेक्‍स’बरोबर बिझनेस पार्टनरशिप केली. या करारानुसार ‘मेझी’ मोबाईल ॲपचा वापर ॲमेक्‍सने प्रायोगिक तत्त्वावर सुरू केला. ‘आस्क ॲमेक्‍स’ नावाने ही सेवा जून २०१७मध्ये सुरू झाली. ग्राहकांच्या आवडी निवडी ओळखणे आणि त्यांना सातत्याने गुंतवून ठेवण्यात ‘मेझी’ यशस्वी ठरले. पहिल्या तीन महिन्यांतच ॲपला एवढा प्रचंड प्रतिसाद मिळाला की ‘ॲमेक्‍स’कडून स्नेहल व स्वप्नील शिंदे यांना ऑफर देण्यात आली. ती ऑफर होती ‘मेझी’ विकत घेण्याची. ‘अमेरिकन एक्‍स्प्रेस डिजिटल लॅब्स’चे उपाध्यक्ष फिल नॉर्मन यांनी स्नेहलला ही ऑफर दिली.  

स्नेहल म्हणाला, ‘‘आम्ही ‘ॲमेक्‍स’कडून ऑफर आल्यानंतर खूप विचार केला. ‘मेझी’ या ब्रॅंडचे अस्तित्व कायम राहावे अशी आमची इच्छा होती. ती ‘ॲमेक्‍स’ने मान्य केली.’’


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marathi news Snehal shinde Swapnil Shinde Startup