
Cyber fraud: एक ट्विट अन् बँक खाते रिकामे, रेल्वे तिकिटाच्या नादात मुंबईच्या महिलेने गमावले ६४ हजार
Online scam: ऑनलाइन फसवणुकीच्या घटनांमध्ये सातत्याने वाढ होत चालली आहे. आता मुंबईच्या एका महिलेची तब्बल ६४ हजार रुपयांना फसवणूक झाल्याचे समोर आले आहे. महिलेने रेल्वे तिकिटाच्या कन्फर्मेशनसाठी ट्विट केले होते. या ट्विटनंतर महिलेला हजारो रुपयांना गंडा बसला. याबाबत आता पोलिसात तक्रार दाखल करण्यात आली आहे.
विले पार्ले येथे राहणाऱ्या ३७ वर्षीय एमएन मीना या महिलेसोबत ही फसवणुकीची घटना घडली आहे. महिलेने 'RAC' तिकिट (Reservation Against Cancellation) काढले होते. हे तिकिट कन्फर्म झाले की नाही, हे जाणून घेण्यासाठी महिलेने IRCTC च्या ट्विटर हँडलवर ट्विट करत तक्रार केली होती. या ट्विटमध्ये त्यांनी तिकिट व इतर माहिती दिली होती.
हेही वाचा: Smartphone Tips: वारंवार फोन चार्ज करावा लागतोय? बॅटरी लाइफ वाढवण्यासाठी फॉलो करा 'या' टिप्स
ट्विटरनंतर महिलेच्या मोबाइलवर सायबर गुन्हेगारांनी फोन करत IRCTC च्या कस्टमर केअरचा अधिकारी असल्याचा दावा केला. यानंतर १४ जानेवारीचे भुजचे तिकिट कन्फर्म करण्यासाठी एक फॉर्म भरावा लागेल व २ रुपये फी द्यावी लागेल, अशी माहिती दिली.
मीना यांनी माहिती दिली की, 'IRCTC च्या ट्विटर पेजवर तक्रार केल्यानंतर काही वेळातच फोन आला. IRCTC चे अधिकारी असल्याचे सांगत त्यांनी तिकिटासाठी काही माहिती मागितली. तसेच, मोबाइलवर एक लिंक देखील पाठवली. यामध्ये बँकेची व इतर माहिती मागण्यात आली होती.' याच माहितीचा वापर करत सायबर गुन्हेगारांनी त्यांच्या खात्यातून तब्बल ६४ हजार रुपये काढून घेण्यात आले.
पोलिसांनी माहिती दिली की, सायबर गुन्हेगारांनी यूपीआयच्या माध्यमातून २ रुपये पाठवण्यास सांगितले होते. मोबाइलवर पाठवण्यात आलेल्या लिंकच्या माध्यमातून खासगी माहिती व पिन नंबर चोरण्यात आला. दरम्यान, आता पोलिसांनी ही रक्कम कोणत्या खात्यात जमा झाली आहे, यासंदर्भात बँकेकडून माहिती मागवली आहे.