पुढच्या पिढीसाठी वारसा जपूया!

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 18 एप्रिल 2017

लोकसहभागाबरोबरच कृती कार्यक्रमांसह हवी ठोस भूमिका

लोकसहभागाबरोबरच कृती कार्यक्रमांसह हवी ठोस भूमिका
कोल्हापूर - जागतिक वारसा दिन (ता. 18) साजरा करत असताना वारसास्थळांच्या संवर्धनासाठी तात्पुरत्या उपाययोजनांवर भर न देता दीर्घकालीन ठोस भूमिका महत्त्वाच्या आहेत. महाराष्ट्रातील ज्या स्थळांचा जागतिक वारसास्थळांमध्ये समावेश झाला, त्यातील बहुतांश ठिकाणांची स्थिती अद्यापही अपेक्षेइतकी समाधानकारक नाही.

नैसर्गिक असो किंवा मानवनिर्मित, आपल्याला हा वारसा पुढच्या पिढीसाठी जतन करायचा आहे, या भावनेतूनच कार्यवाही महत्त्वाची ठरणार आहे.

संयुक्त राष्ट्रसंघाच्या शैक्षणिक, वैज्ञानिक आणि सांस्कृतिक संघटनेतर्फे (युनेस्को) वारसास्थळांच्या जतनासाठी प्रयत्न होतात. त्यांच्या यादीमध्ये भारतातील 35 स्थळांचा समावेश आहे. यामध्ये 7 नैसर्गिक, 27 सांस्कृतिक, तर 1 मिश्र अशी वर्गवारी आहे. महाराष्ट्रातील अजिंठा-वेरूळ लेणी, मुंबईतील छत्रपती शिवाजी टर्मिनस, तसेच एलिफंटा गुहा यांचाही यादीत समावेश आहे. भारताचे आणखी काही प्रस्ताव "युनेस्को'च्या विचाराधीन आहेत. याशिवाय राज्य आणि प्रादेशिक पातळीवर अनेक वारसास्थळे आहेत, ज्यांच्या पाऊलखुणांचा ठेवा पुढच्या पिढीसाठी उपकारक ठरणार आहे.

जैवविविधतेने समृद्ध निसर्गसंपन्न पश्‍चिम घाटालाही वारसास्थळांच्या यादीत स्थान आहे. त्यामध्ये कोल्हापूर जिल्ह्यातील राधानगरी- दाजीपूर अभयारण्याचा समावेश आहे. हा वारसा जपण्याची जबाबदारी समाजातील सर्वच घटकांची आहे. त्यासाठी पर्यावरणपूरक ठोस कृती कार्यक्रमांची आवश्‍यकता आहे. पन्हाळगडासह शहरातील भवानी मंडप, जुना राजवाडा या ठिकाणांची पाहणीही दोनच महिन्यांपूर्वी "युनेस्को'च्या चौदा जणांच्या पथकाने केली. याबाबत अद्याप कोणतीच कार्यवाही नसली तरी पर्यटनाच्या अनुषंगाने या वारशांकडे पाहताना व्यवसाय अधिक महत्त्वाचा, की वारसा जपणे, याबाबत ठोस भूमिका घ्यावी लागणार आहे.

कास पठाराचे वैभव
सातारा - निसर्गसंपन्न साताऱ्याचा मानबिंदू असलेल्या कास पठाराला जागतिक निसर्ग वारसास्थळाचे कोंदण लाभले आहे. जिल्हा प्रशासन, संयुक्त वन व्यवस्थापन समिती, पर्यावरणवादी संस्था- संघटना आणि कार्यकर्त्यांच्या प्रयत्नांतून "कास'चे पुष्पवैभव जपण्याचे प्रयत्न होत आहेत. साताऱ्याच्या पश्‍चिमेला 23 किलोमीटरवर कास पठार आहे. भारताला आणि पश्‍चिम घाटाला प्रदेशनिष्ठ असणाऱ्या वनस्पतींपैकी 98 वनस्पतींचा कास पठारावर आढळ आहे. पठारावरील लाल मातीचा बारीक थर, सच्छिद्र जांभा खडक, पर्जन्य, आर्द्रता, तापमान हे या वनस्पतींच्या वाढीस पोषक असल्यामुळे या सर्व सपुष्प वनस्पती पठारावर एकवटल्या आहेत. महाराष्ट्रातील एकूण वनस्पतींच्या 70 टक्के वनस्पती या पठारावर आढळतात.

अजिंठा, वेरूळला अनेक कलांचा संगम
औरंगाबाद - भारतातील पहिले जागतिक वारसास्थळ अजिंठा लेणी जिल्ह्यात आहेत. इसवी सनपूर्व 480 किंवा इसवी सन 650 मध्ये त्यांची उभारणी झाली. ही लेणी दोन टप्प्यांमध्ये तयार केली आहेत. सातवाहन काळात प्रथम टप्पा आणि वाकाटक सम्राट काळात दुसरा टप्पा. स्थापत्य, शिल्पशास्त्र, चित्रकला, प्राचीन रंगकाम, मूर्तिशास्त्र आणि दैवतशास्त्र यांचा अनोखा संगम अजिंठ्यात आहे.

औरंगाबादपासून 29 किलोमीटरवरील चाळीसगाव येथील वेरूळ लेणी भारतीय-रॉक कट आर्किटेक्‍चर प्रसिद्ध आहेत. येथे 34 मंदिरे आणि लेणी खडकांत कोरलेली आहेत. जगातील सर्वांत मोठे असलेले हे खडकांतील कोरीवकाम आहे. औरंगाबादचा ऐतिहासिक वारसा जगप्रसिद्ध असला तरी त्याचे जतन व संवर्धन हे आव्हानच आहे.

छत्रपती शिवाजी टर्मिनस
मुंबई - सध्याचे छत्रपती शिवाजी टर्मिनस हे पूर्वी व्हिक्‍टोरिया टर्मिनस नावाने ओळखले जायचे. येथे मध्य रेल्वेचे मुख्यालय आहे. 1878-1888 दरम्यान व्हिक्‍टोरियन गॉथिक पुनरुज्जीवित आर्किटेक्‍चर आणि पारंपरिक मुघल इमारतीच्या प्रेरणेतून फ्रेडरिक विल्यम्स स्टीव्हन्स यांनी ही इमारत बांधली. त्यामुळेच इटालियन, व्हिक्‍टोरियन काळ आणि भारतीय राजवाड्यांची वास्तुकला यांची आठवण ही इमारत करून देते. भारताचे व्यापारी केंद्र असलेल्या मुंबईचा हा चेहरा बनला आहे.
मुंबईजवळील अरबी समुद्रातील घारपुरी बेटावर एलिफंटा लेणी आहेत. अखंड पाषाणात ती कोरली आहेत. ज्या काळी पाश्‍चात्त्य देशांमध्ये मानवी वसाहतीचा मागमूससुद्धा नव्हता, त्या काळी आपल्या भारतीय पूर्वजांनी इतक्‍या दुर्गम भागात इतकी अफाट कलाकृती निर्माण केली, याला कुठेच तोड नाही.

वाडेच चिरेबंदी!
नागपूर - गोंड राजाने वसविलेल्या नागपूरचा इतिहास जेवढा सरकारने जपलाय, तेवढाच स्थानिकांनीदेखील परंपरांमधून जोपासला आहे. शहरातील वैशिष्ट्यपूर्ण मंदिरे, वास्तू इत्यादी पुरातत्त्व समितीच्या आणि विभागाच्या देखरेखीत असले, तरी कित्येक पिढ्यांची मजबूत जडणघडण बघणारे चिरेबंदी वाडे आजही त्या-त्या कुटुंबांकडेच आहेत. जुन्या नागपूरमध्ये वसलेले हे बहुतांशी वाडे शहराच्या इतिहासाचे जिवंत साक्षीदार आहेत. साधारणतः साडेतीनशे ते चारशे वर्षे जुन्या वाड्यांची ठेवण आणि बांधकाम आजदेखील जसेच्या तसे आहे.

बाकाबाईचा वाडा, बुटी वाडा, देशमुखांचा वाडा, चिटणविसांचा वाडा अशा शंभर तरी नावांचा उल्लेख करता येईल.

जुने गोव्यातील चर्च
पणजी - पंधराव्या आणि सोळाव्या शतकात गोव्यात पोर्तुगिजांची सत्ता असताना त्यांनी अनेक चर्चची उभारणी केली. यातील बाम बासिलिका चर्चचा जागतिक वारसा यादीत समावेश आहे. या चर्चमध्ये सेंट झेवियर यांचे शव जतन केल्याने त्यांच्या नावानेही या चर्चला ओळखतात. सुरवातीच्या काळातील ओल्ड गोवा या पोर्तुगिजांच्या राजधानीत 1595 ते 1605 या काळात या चर्चची उभारणी झाली.

पश्‍चिम घाटातील विविध ठिकाणांचा जागतिक वारसा स्थळामध्ये समावेश झाला असला, तरी तो जपण्यासाठी आवश्‍यक ठोस भूमिका अद्यापही कुठल्याच पातळीवर घेतली गेलेली नाही. आपल्याला हा वारसा पुढच्या पिढीसाठी जपायचा आहे आणि आपण फक्त त्याचे विश्‍वस्त आहोत, या भावनेतून पर्यावरणीय बाबींचा विचार करूनच तत्काळ पुढील कार्यवाही महत्त्वाची आहे.
- डॉ. जय सामंत, ज्येष्ठ पर्यावरणतज्ज्ञ, कोल्हापूर

"पुरातत्व'कडून विठ्ठल मंदिराची देखभाल 
पंढरपूर - येथे श्री विठ्ठल मंदिर, चंद्रभागा नदीवरील घाट, नदी पात्रातील श्री विष्णुपद, महाद्वार घाटावरील शिंदे सरकार वाडा, होळकर वाडा, गोपाळपुऱ्यातील गोपाळकृष्ण मंदिर, ही प्रमुख ऐतिहासिक ठिकाणे आहेत. श्री विठ्ठल मंदिराची पुरातत्व विभागाच्या देखरेखीखाली दुरुस्ती होते. चंद्रभागा नदीवर चौदा घाट आहेत. महाद्वार घाटालगत अहल्यादेवी होळकर यांनी 1780 च्या सुमारास भव्य दगडी वाडा बांधला. त्यामध्ये श्रीरामाचे आकर्षक मंदिर, अहल्यादेवींची संगमरवरी मूर्ती आहे. वाड्याजवळच दत्ताजीराव शिंदे यांनी शिंदे सरकार वाडा बांधला. त्याला दगडी तट, बुरुज आहेत. गोपाळपूरचे गोपाळकृष्ण मंदिराचे बांधकाम अतिशय आकर्षक आहे. 

निजामशाही वास्तूंना हवे बळ 
नगर - निजामशाहीचे वैभव सांगणाऱ्या काही वास्तू आजही शहरात उभ्या आहेत. त्यांच्या संवर्धनासाठी प्रयत्नांची आवश्‍यकता आहे. निजामशाहीचा संस्थापक अहमदशाहने बिदरचा सेनापती जहांगीरखानाचा पराभव जेथे केला, तेथे 1490 मध्ये "कोटबाग निजाम' नावाची वास्तू बांधली. तिलाच भुईकोट किल्ला म्हणतात.

त्याच्याजवळच नगर शहर वसविण्यात आले. शहराच्या संस्थापकांची समाधी बागरोजा येथील सीना नदीच्या तीरावर आहे. तिच्या घुमटाकृती इमारतीभोवती दहा फूट उंचीचा कोट आहे. भुईकोट किल्ल्यात 1942 मध्ये पंडित नेहरू, सरदार वल्लभभाई पटेल यांच्यासारख्या मान्यवर नेत्यांना बंदिवासात ठेवले होते. येथेच पंडित नेहरूंनी "डिस्कव्हरी ऑफ इंडिया' ग्रंथ लिहिला. 

Web Title: The next generation to inherit a beware