वाहनक्रांतीची झलक | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Praneet Pawar writes about Auto Expo-2023  Maruti MG Tata Toyota  Kia

वाहनक्रांतीची झलक

कोरोनाच्या दोन वर्षांच्या खंडानंतर सोळावे ‘ऑटो एक्स्पो-२०२३’ नुकताच मोठ्या दिमाखात ग्रेटर नोएडा येथील ‘इंडिया एक्स्पो मार्ट’मध्ये पार पडला. यंदाच्या एक्स्पोमधून नवीन वाहने, अविष्काराची उत्सुकता होती. गेले आठवडाभर चाललेल्या आटो एक्स्पोमधून विशेष काय मिळाले, याचा आढावा.

एमजी मोटर्स इंडिया

एमजी मोटरद्वारे ऑटो एक्स्पोमध्ये ‘ड्राइव्ह अहेड’ संकल्पना सादर करण्यात आली. यामध्ये शून्य उत्सर्जन असलेली ‘एमजी-४’ ही पूर्णपणे इलेक्ट्रिक हॅचबॅक कार; तर ‘एमजी ईएचएस’ ही प्लग इन हायब्रिड एसयूव्ही या सादर करण्यात आल्या. शिवाय ‘युनिक-७’

या थर्ड-जनरेशन हायड्रोजन फ्युएल-सेल तंत्रज्ञानाने युक्त ''न्यू एनर्जी व्हेइकल्स''चे (एनईव्ही) दर्शन घडवले.

एमजी ४ : ही हॅचबॅक श्रेणीतील कार असून त्यात ऐसपैस जागा, आकर्षक इंटिरियर, पाच विविध चार्जिंगचे पर्याय दिले आहेत. चार्जिंग पर्यायांमुळे ड्रायव्हिंगचा खरा आनंद घेता येणार आहे.

एमजी ईएचएस : एसयूव्ही श्रेणीतील प्लग इन हायब्रिड कार मोठा बूट स्पेस, आकर्षक बाह्य आणि अंतर्गत रचनेसह सादर करण्यात आली. यामध्ये इलेक्ट्रिक मोटर, बॅटरी पॅक आणि पेट्रोल इंजिन आहे.

युनिक-७ : हायड्रोजन इंधनावरील वाहने प्रदूषणविरहित, उत्तम कार्यक्षमता, अधिक क्षमतेची असतात. प्रोम पी३९० प्रणालीने युक्त असलेल्या युनिक-७ या एमपीव्ही कारमधून केवळ पाण्याचे उत्सर्जन होते.

मारुती सुझुकी

भारतात सर्वाधिक कार विक्री करणाऱ्या मारुती सुझुकीने फ्लेक्स फ्युएल इंधनावर आधारित वॅगनार, ब्रिझ्झा एससीएनजी, इंटेलिजंट इलेक्ट्रिक हायब्रिड तंत्रज्ञानाची ग्रँड व्हिटारासह, ईव्हीएक्स ही इलेक्ट्रिक कॉन्सेप्ट कार सादर केली. शिवाय जिम्नी आणि फ्रॉन्क्स या कारचे दर्शनही घडवले.

ईव्हीएक्स : सुझुकी मोटर कॉर्पोरेशनद्वारे डिझाईन केलेल्या ‘ईव्हीएक्स’ची निर्मिती ग्राऊंडअप ऑल इलेक्ट्रिक प्लॅटफॉर्मवर करण्यात आली आहे. या एसयूव्ही कारमध्ये ६०० केव्ही बॅटरी आणि ५५० किलोमीटर रेंज दिली आहे.

फ्लेक्स फ्युएल व्हॅगनार : ही लोकप्रिय कार ई-२० (२० टक्के इथेनॉलमिश्रित पेट्रोल) आणि ई-८५ (८५ टक्के इथेनॉलमिश्रित पेट्रोल) फ्लेक्स इंधनावर चालण्यास सक्षम आहे. ही कार सामान्य कारप्रमाणेच कामगिरी बजावते.

किआ इंडिया

भारतात यापूर्वी ईव्ही-६ ही इलेक्ट्रिक कार आणलेल्या किआने आता पुढे जात ईव्ही-९ ही कन्सेप्ट कार सादर करून भविष्याचा वेध घेतला आहे. शिवाय केए-४ ही लक्झरी आरव्ही श्रेणीताल कार सादर केली. अल्पावधीतच लोकप्रिय ठरलेल्या कॅरेन्सची पोलिस आणि अँब्युलन्स श्रेणीही सादर केली.

ईव्ही-९ : ही कार ई-जीएमपीवर (इलेक्ट्रिक ग्लोबल मॉड्युलर प्लॅटफॉर्म) आधारित आहे. किआचे ईव्हीसाठी तयार केलेले प्लॅटफॉर्म असून, ज्यामध्ये बॅटरी, मोटर आणि पॉवर इलेक्ट्रिक सिस्टमचा समावेश आहे.

केए-४ : किआच्या कॅलिफोर्निया डिझाईन स्टुडिओने या वाहनाचे आतील भाग डिझाइन केले आहे. या कारमध्ये डिझाइन, क्षमता, सुरक्षितता आणि लक्झरी यांचा संगम आहे.

टाटा मोटर्स

‘मूव्हिंग इंडिया’अंतर्गत टाटा मोटर्सने सेफर, स्मार्टर आणि ग्रीनर दृष्टिकोनातून १२ कार आणि कन्सेप्ट कार सादर केल्या. यामध्ये कर्व्‍ह आयसीई, अल्‍ट्रोज आयसीएनजी व पंच आयसीएनजी, अल्‍ट्रोज रेसर, टियागो ईव्‍हीचा स्पोर्टिव्ह श्रेणीही सादर करण्यात आली.

सिएरा ईव्‍ही : टाटा ही कार पेट्रोल आणि इलेक्टिक या दोन्ही प्रकारात लाँच करणार आहे. सिएरा इलेक्ट्रिक एसयूव्ही २०२५ पर्यंत बाजारात विक्रीसाठी येईल.

हॅरियर ईव्‍ही : भारतात पहिल्‍यांदाच ऑल-व्‍हील ड्राईव्‍ह पर्यायात जनरेशन २ आर्किटेक्‍चरवर हॅरियर ईव्‍ही विकसित केली आहे.

‘अविन्‍य’ कन्‍सेप्‍ट : जनरेशन-३ आर्किटेक्‍चरवर निर्माण करण्‍यात आलेली अविन्य ही प्‍युअर इलेक्ट्रिक कार आहे. गतीशीलता, ऐसपैस जागा व आरामदायीपणाची खात्री या कारमधून मिळते.

टोयोटा किर्लोस्कर मोटर्स

टोयोटा किर्लोस्कर मोटर्सने हरित आणि स्वच्छ वाहतुकीच्या दृष्टिकोनातून जनजागृतीवर भर दिला आहे. त्याच अनुषंगाने स्ट्राँग हायब्रीड, हायड्रोजन, फ्लेक्स फ्युएलवर आधारित वाहने सादर करण्यात आली.

मिराई : ऑक्टोबर २०२२ मध्ये सादर केलेल्या या कारचे सेकंड जनरेशन टोयोटाने दाखल केले. ही हायड्रोजन फ्युएल सेल इलेक्ट्रिक कार आहे. या कारमध्ये ३ हायड्रोजन टँक दिले असून ती ६४० किलोमीटरची रेंज देते.