दूध : फ्रिजशिवाय अनेक महिने टिकणारे! 

महेश बर्दापूरकर 
Thursday, 6 April 2017

उन्हाळ्याच्या दिवसांत सकाळी घरात आलेले दूध तापायला ठेवताच नासल्याचा अनुभव तुमच्यापैकी अनेकांनी घेतला असेल. पाश्‍चरायझेशन या पद्धतीने तयार केलेले दूध तुलनेने अधिक काळ टिकत असले तर युरोपीय देशांत अनेक महिने फ्रिजशिवाय टिकणारे दूध लोकप्रिय होत असून, त्याने चीनमध्येही प्रवेश केला आहे. अल्ट्रा हीट ट्रीटमेंटमुळे नासण्याच्या पलीकडे गेलेल्या या "भविष्यातील' दुधाविषयी... 

उन्हाळ्याच्या दिवसांत सकाळी घरात आलेले दूध तापायला ठेवताच नासल्याचा अनुभव तुमच्यापैकी अनेकांनी घेतला असेल. पाश्‍चरायझेशन या पद्धतीने तयार केलेले दूध तुलनेने अधिक काळ टिकत असले तर युरोपीय देशांत अनेक महिने फ्रिजशिवाय टिकणारे दूध लोकप्रिय होत असून, त्याने चीनमध्येही प्रवेश केला आहे. अल्ट्रा हीट ट्रीटमेंटमुळे नासण्याच्या पलीकडे गेलेल्या या "भविष्यातील' दुधाविषयी... 

दूध हा नाशवंत पदार्थ आहे आणि सध्या सुरू असलेल्या उन्हाळ्यात त्याचा त्रास तुम्हाला नक्कीच जाणवत असणार. दुधाचे "शेल्फ लाइफ' वाढविण्यासाठी "पाश्‍चरायझेशन' पद्धतीचा वापर केला जातो, हे आपल्याला माहिती आहेच. या पद्धतीमध्ये दूध 72 अंश सेल्सिअसपर्यंत तापवून तेथे 15 सेकंद ठेवले जाते. त्यानंतर त्याला लगेचच थंड केले जाते. या पद्धतीमध्ये दुधातील टीबीसारखे घातक जिवाणू मारले जात असले तरी, अनेक शिल्लक राहतात. मात्र, हे दूध फ्रीजमध्ये ठेवल्यास किंवा ते लगेचच वापरल्यास त्यांपासून कोणताही धोका पोचत नाही. जगातील बहुतांश देशांत अशाच प्रकारचे पाश्‍चराईज्ड दूध वापरले जाते. मात्र, काही देशांत पुठ्ठ्याच्या वेष्टनातून मिळणारे व फ्रीजमध्ये न ठेवता अनेक महिने टिकणारे दूध दुकानांमध्ये अनेक वर्षांपासून विकले जाते आहे! काय असते हे दूध? 

अल्ट्रा हीट ट्रीटमेंट 
अल्ट्रा हीट ट्रीटमेंट या प्रक्रियेतून दूध मोठ्या कालावधीसाठी न नासता राहू शकते. या पद्धतीमध्ये दूध पाश्‍चराझेशनच्या दुप्पट तापमानाला, म्हणजे 140 अंश सेल्सिअसला तापवून केवळ 3 सेकंद ठेवले जाते. हे अतिशय उच्च तापमान आपले काम करते व दुधामध्ये कोणतेही जिवाणू शिल्लक राहात नाहीत. हे "शुद्ध' दूध खूप मोठ्या कालावधीसाठी न नासता राहते. हवाबंद पॅक न फोडल्यास हे दूध फ्रिजविना कितीही मोठ्या कालावधीसाठी आहे तसेच राहू शकते. त्यामुळे ते मोठ्या अंतरापर्यंत वाहून नेणेही शक्‍य होते. हिल्टन डिथ या दुधावर अधिक संशोधन करीत आहेत. त्यांच्या मते, ""हे दूध मोठ्या कालावधीसाठी टिकते हे त्याचे मोठे वैशिष्ट्य असल्याने अनेक युरोपियन देशात ते अनिवार्य करण्यात आले आहे. हे दूध नासत नसले तरी, मोठ्या कालावधीसाठी राहिल्यास ते जेलीसारखे बनते व भांड्यात ओतताना हे दह्याप्रमाणे बाहेर पडते. याचे कारणे अल्ट्रा हीट ट्रीटमेंटमध्ये आहे. अतिरिक्त उष्णतेमुळे दुधातील "व्हे' या प्रथिनांमध्ये बदल होतो व त्यांची हालचाल बंद झाल्याने दूध घट्ट होते. ही प्रक्रिया साखरेला तापवून तिचे कॅरामल बनविण्यासारखीच आहे. त्याचबरोबर दुधात सल्फरचे अणू तयार झाल्याने त्याला अंड्यासारखा वासही येतो, मात्र तो एका आठवड्यात नाहीसा होतो. हे दूध पाश्‍चराईज्ड दुधापेक्षा चवीला गोड व दिसायला अधिक पांढरे शुभ्र असते.'' 

या दुधाची चव अद्याप लोकांच्या जिभेवर रेंगाळली नसली तरी, अनेक देशांत त्याची मागणी मोठ्या प्रमाणावर वाढताना दिसते आहे. चीनमध्ये या दुधाच्या मागणीत वर्षाला 10 टक्‍क्‍यांची वाढ होत आहे. ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंड आणि जर्मनीसारख्या देशांनी चीनला या दुधाची निर्यात सुरू केली असून, तिला चांगला प्रतिसाद मिळतो आहे. भारतामध्ये अद्याप या दुधाने पाय रोवले नसले तरी, आपल्याकडील हवामानाचा विचार हे भविष्यातील दूध आहे, हे नक्की...


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: preserve milk without refrigerator lasting several months