नवउद्योजकांना  अरब देशांमध्ये संधी

शनिवार, 17 फेब्रुवारी 2018

‘इंडिया-अरब चेंबर ऑफ कॉमर्स’तर्फे नवउद्योजक आणि लघू व मध्यम उद्योजकांना २२ अरब देशांमध्ये व्यवसायाच्या संधी उपलब्ध करून दिल्या जात आहेत. त्या निमित्ताने चेंबरचे अध्यक्ष अनिर्बान सरकार यांच्याशी साधलेला संवाद 

प्रश्न - ‘अरब चेंबर’चे सध्या कोणते उपक्रम सुरू आहेत? 
संयुक्त अरब अमिरातीसह जॉर्डन, इराक, इजिप्त, बहारीन, कतार असे एकूण बावीस अरब देश आणि भारतामध्ये उद्योग-व्यवसायाच्या संधी शोधणे आणि त्याचा फायदा उद्योजकांना मिळवून देण्यासाठी अनेक उपक्रम राबविले जात आहेत. अरब देशांमध्ये पुनर्विकास व पुनर्बांधणीची अनेक कामे भारतीय कंपन्या करत आहेत. परदेशातून कामानिमित्त अरब देशांमध्ये स्थायिक झालेल्यांपैकी सर्वाधिक ‘एक्‍सपॅट’ नागरिक हे भारतीय आहेत. त्यांच्याकडे खूप आदराने पाहिले जाते. या भारतीयांना अडचणीच्या काळात, विशेषतः युद्धसदृश परिस्थितीत मदत करण्यासाठी चेंबर प्रयत्नशील आहे. दूतावासामध्ये अनुभवायला मिळणारा लालफितीचा कारभार चेंबरच्या कार्यप्रणालीत दिसत नाही. त्यामुळे अरब देशातील भारतीय नागरिकांची काळजी घेणे आणि भारतासह संबंधित अरब देशाची अर्थव्यवस्था बळकट करण्यासाठी चेंबरतर्फे सर्व उपक्रम राबविले जातात. 

अरब देशांमध्ये भारतीयांना कशा प्रकारच्या  संधी आहेत?
अनेक भारतीय पदार्थ, उत्पादनांना अरब देशांमध्ये मागणी आहे. मात्र त्यांना भारतीय बाजारपेठेची पुरेशी माहिती नसते. त्यामुळे व्यवसाय-व्यापारातील दोन्ही घटकांना एकमेकांशी जोडणे आणि त्यांना व्यासपीठ मिळवून देण्याचे काम अरब चेंबरतर्फे केले जाते. अनेक अभियांत्रिकी प्रकल्पांमध्ये आता भारतीय कंपन्यांना संधी आहे. आजपर्यंत हे प्रकल्प युरोप किंवा अमेरिकन कंपन्यांकडे जात होते, पण गेल्या काही वर्षांत अरब देशांची मानसिकता बदलली आहे. भारतीय कंपन्यांना काम देण्यास ते अनुकूल झाले आहेत. अरब जगतात कधीही अस्थिरता येते. त्या परिस्थितीत आपण काही करू शकत नाही, पण युद्धानंतर पुनर्बांधणीचे काम सुरू होते. त्या वेळी भारतीय अभियंते तिथे काम करू शकतात. रशियाकडून दहा हजार कोटी युरो आणि अमेरिकेतून दहा हजार कोटी डॉलर एवढी गुंतवणूक अरब देशांमध्ये पुनर्बांधणीच्या कामासाठी होत आहे. त्यापैकी वीस टक्के रकमेचे काम भारतीय कंपन्यांनी मिळविल्यास ती खूप मोठी रक्कम असेल. 

लघू-मध्यम उद्योजकांच्या दृष्टीने कोणत्या क्षेत्रात संधी आहेत? 
रस्ते, इमारती, बोगदे, पूलबांधणी यासारख्या पायाभूत सुविधांचे प्रकल्प, वैद्यकीय क्षेत्र, शिक्षण संस्था, पर्यावरण क्षेत्रामध्ये वायू, पाण्याशी संबंधित प्रकल्पांमध्ये ‘एसएमई’ना संधी आहेत. स्थानिक परिस्थिती बिघडण्याची भीती न बाळगता ‘एसएमई’ने अरब देशांतील कामे घ्यावीत. स्थानिक लघू उद्योजकांना हाताशी धरून ‘सब-कॉन्ट्रॅक्‍ट’ पद्धतीने काम पूर्ण करावे. सध्या बड्या कंपन्याही अडचणीत आहेत. त्यामुळे ती पोकळी ‘एसएमई’ भरून काढू शकतात. आंतरराष्ट्रीय पातळीवर होणाऱ्या ‘टेंडर’ प्रक्रियेत ‘एसएमई’ना थेट पात्र होता येत नाही. त्यासाठी बड्या कंपन्यांची मदत ते घेऊ शकतात. चेंबरतर्फे ‘एसएमई’ना अशा बड्या कंपन्यांना जोडण्याचे काम केले जाते. मोठ्या कंपनीने ‘प्री-क्वॉलिफिकेशन’ दिल्यानंतर ‘प्रायमरी बिडर’ मोठी कंपनी असते व ‘सेकंड बिडर’ संबंधित ‘एसएमई’ असते. बड्या कंपनीकडून ‘एसएमई’ला गरजेप्रमाणे काही निधी दिला जातो. 

स्टार्टअप, नवउद्योजकांनी  काय करावे? 
नवउद्योजकांना अरब देशांमध्ये खूप संधी आहेत; पण त्यांची एक समस्या म्हणजे सगळ्यांनाच एका रात्रीत मोठे व्हायचे आहे. नवउद्योजकांची आणखी एक समस्या म्हणजे ज्यांना तंत्रज्ञान माहिती आहे, ते ‘कमर्शिअल’ नाहीत आणि ज्यांना व्यवहार ज्ञान आहे त्यांना तांत्रिक गोष्टी समजत नाहीत. त्यामुळे बहुतांश स्टार्टअप बंद पडत आहेत. सध्याच्या काळात नवउद्योजकांनी ‘टेक्‍नो-कमर्शिअल’ असणे खूप गरजेचे आहे. इंजिनिअरिंगविषयी बोलण्यासाठी इंजिनिअर असायची गरज नाही. तुमचे वाचन भरपूर असले पाहिजे. योग्य आणि तज्ज्ञ व्यक्तींचे मार्गदर्शन नवउद्योजकांना मिळत नाही. ही उणीव भरून काढण्यासाठी चेंबरतर्फे ‘स्टार्टअप मीट’सारखे उपक्रम हाती घेतले आहेत. त्यामध्ये यशस्वी उद्योजकांबरोबर गप्पा तसेच वित्त संस्था, सल्लागार, बॅंक तज्ज्ञांना बोलावून आम्ही नवउद्योजकांना व्यावहारिक ज्ञान देतो.

Web Title: Salil Urunkar article Opportunity new entrepreneurs Arab countries