सोसेल तेवढाच सोशल मीडिया  बरा..!

स्मिता जोशी, समुपदेशक
रविवार, 23 फेब्रुवारी 2020

पती-पत्नीचं नातं हे विश्वासावर अधिक टिकतं. विश्वासानंच प्रेम, जिव्हाळा वाढून कौटुंबिक कर्तव्याची आदर्शवत पूर्तता केली जाते. परंतु, जेव्हा आपला जोडीदार आपल्यापेक्षा दुसऱ्या व्यक्तीला किंवा दुसऱ्या गोष्टीला अधिक महत्त्व देतो, हे समजतं तेव्हा ते पचवणं अवघड होतं आणि त्यातूनच पती-पत्नीमधील ब्रेकअप होतं.

‘माझी पत्नी आणि दोन मुलं, अगदी सुखाचा संसार चालू होता आमचा. पण, लग्नाच्या वाढदिवसाच्या दिवशी मी माझ्या पत्नीला नवीन स्मार्ट फोन घेऊन दिला. तिला व्हॉट्‌सॲप, फेसबुक अगदी सगळं डाऊनलोड करून दिलं. पत्नीला खूश केलं, याच्यात मला खूप आनंद वाटला होता. परंतु, काही दिवसांतच तिचं मुलांकडं आणि माझ्याकडं दुर्लक्ष होऊ लागलं. त्या मोबाईलमध्ये ती गुंतून राहू लागली. तिच्या कॉलेजच्या मित्रांचा व्हॉट्‌सॲप ग्रुप केलेला होता आणि त्या ग्रुपमध्ये तिच्या एका जुन्या मित्राची पुन्हा एकदा भेट झाली. त्या दोघांचं चॅटिंग सुरू झालं आणि तिच्या मोबाईलवरील चॅटिंग बघून आज मी थक्क झालो. माझ्या लक्षात आलं, की माझा संसार धोक्‍यात आहे.’

ताज्या बातम्यांसाठी ई-सकाळचे ऍप डाऊनलोड करा 

राहुल त्याची व्यथा घेऊन माझ्याकडं आला होता. पत्नीला या सगळ्यातून कसं बाहेर काढावं? की मुलांना घेऊन वेगळं राहावं आणि घटस्फोट घ्यावा? असे अनेक प्रश्न त्याला सतावत होते. सोशल मीडियामुळे नातेसंबंधांवर परिणाम होत असून, कौटुंबिक वाद वाढण्याची अनेक उदाहरणं आज दिसून येत आहेत.

पती-पत्नीचं नातं हे विश्वासावर अधिक टिकतं. विश्वासानंच प्रेम, जिव्हाळा वाढून कौटुंबिक कर्तव्याची आदर्शवत पूर्तता केली जाते. परंतु, जेव्हा आपला जोडीदार आपल्यापेक्षा दुसऱ्या व्यक्तीला किंवा दुसऱ्या गोष्टीला अधिक महत्त्व देतो, हे समजतं तेव्हा ते पचवणं अवघड होतं आणि त्यातूनच पती-पत्नीमधील ब्रेकअप होतं. संघर्ष वाढतात. सोशल साइट्‌सवर निर्माण झालेली नाती वैवाहिक नात्यात अडसर होऊन जातात. कुटुंबाला वेळ दिला जात नाही. एकाच घरात राहून एकटेपणानं स्वतंत्रपणे जगणं सुरू होऊन जातं आणि कौटुंबिक सौख्यावर, नातेसंबंधांवर त्याचा परिणाम होतो. ई-मेल, इन्स्टाग्राम, फेसबुक या माध्यमातून एकमेकांच्या भावनांची देवाणघेवाण होते. त्यामुळे वेगळीच नाती निर्माण होऊ लागली आहेत. नात्यात आणि भाषेतही जरा अधिकच मोकळेपणा आला आहे.

‘लव्ह यू’ हा शब्द ‘डिअर’च्या पंक्तीत अगदी बिनदिक्कतपणे जाऊन बसला आहे. काळाच्या ओघात जे आपल्या जोडीदाराकडून अपेक्षित होतं, ते त्याच्याकडून मिळालं नाही; तर इतर मित्र-मैत्रिणींकडून ते अपेक्षिलं जाऊ लागतं. नवरा-बायकोच्या नात्यातील कसर दुसऱ्या नात्यानं भरून काढण्याचा प्रयत्न सोशल मीडियाचा वापर करून केला जाऊ लागला आहे. विवाहबाह्य संबंध, सतत चॅटिंग, ऑनलाइन राहून ‘व्हर्च्युअल रोमान्स’ याचं प्रमाण वाढत असून, पती-पत्नीच्या नात्यामध्ये यामुळे दुरावा निर्माण होऊ लागला आहे.

सोशल मीडियामुळे इतर नाती जवळ येतात. असं असलं तरी जवळच्या नात्यांचं काय? सहवास असतो; पण एकमेकांशी संवादच नाही. कारण, सोशल मीडिया एक आभासी जग निर्माण करतं. नवीन वर्षाच्या शुभेच्छा जगभराच्या मित्र-मैत्रिणींना दिल्या जातात. परंतु, शेजारी बसलेल्या आपल्या जोडीदाराच्या हातात हात घेऊन शुभेच्छा देण्याचं राहून जातं. कारण, हात मोबाईलमध्ये गुंतलेले असतात. व्हॉट्‌सॲपवर हजारो ग्रुप असतात. पण, कुटुंबामध्ये चार जणांचं एकत्र येणं होत नाही. एकत्र कुठंही पिकनिकला किंवा साध्या हॉटेलमध्ये एकत्र गेले, तरी कुटुंबातील प्रत्येक सदस्यांच्या हातात मोबाईल असतो. समोर एकमेकांशी गप्पा मारण्याचं सोडून प्रत्येक जण आपापल्या ग्रुपवर फोटो शेअर करणं, कमेंट करणं, लाइक करणं, मेसेज फॉरवर्ड करणं यातच गुंतून राहतो.

मध्यंतरी एका कार्यक्रमामध्ये मुंबई उच्च न्यायालयाच्या माजी न्यायमूर्ती डॉ. शालिनी फणसाळकर-जोशी ‘कौटुंबिक नातेसंबंध’ या विषयावर बोलताना म्हणाल्या की, एखाद्या हॉटेलमध्ये गेल्यानंतर एखादं जोडपं मोबाईलमध्ये गुंतलेलं असेल, तर नक्की समजावं की ते एकमेकांचे पती-पत्नी आहेत. गर्लफ्रेंड -बॉयफ्रेंड तरी एकमेकांशी बोलत असतात. कॉलेजमध्ये, ऑफिसमध्ये, व्यवसायाच्या ठिकाणी जाताना आपला टिफिन विसरला तरी चालतो. परंतु, मोबाईल विसरून चालत नाही. सतत सोशल मीडियाच्या वापरामुळे कार्यक्षमतेवर परिणाम होतोच; पण मानसिक ताण वाढतो आणि एकत्र असूनही एकटेपणाचा अनुभव येतो. त्यामुळे निराशही वाटतं, असं मत अनेक मानसशास्त्रज्ञांनी व्यक्त केलं आहे.

सोशल मीडिया या नवीन तंत्रज्ञानाचे फायदे कोणीही अमान्य करणार नाही. दैनंदिन कामकाजात आणि संवादातील सहजता, ही केवळ सोशल मीडियामुळे शक्‍य झाली आहे. परंतु, याचा वापर ताण वाढविण्यासाठी नाही, तर तो कमी करण्यासाठी केला जावा, हे अधिक महत्त्वाचं आहे. त्याचं भावनिक आणि सामाजिक जीवनावर आक्रमण होणार नाही, याची काळजी घेणं महत्त्वाचं आहे. या तंत्रज्ञानाचे आपण गुलाम न होता, त्याचा वापर आपल्यासाठी कसा करायचा, हे कौशल्य शिकणं गरजेचं आहे. प्रत्येक क्षण कॅमेऱ्यात टिपण्यापेक्षा एखादा असा क्षण केवळ मनात साठवावा आणि नंतर अंतःचक्षूच्या कॅमेऱ्यानं हृदयात बंद करून ठेवावा. काहीवेळा स्मायली पाठवून आपल्या भावना व्यक्त करण्यापेक्षा, खळखळून हसावं. तंत्रज्ञानाचा वापर आपण कसा करतो, यावर त्याची योग्यता ठरत असते. या तंत्रज्ञानाच्या अधीन न होता संयमानं परिणामांचा विचार करून त्याचा वापर केला, तर त्यातील फायदे आपल्याला नक्कीच मिळतील. आभासी दुनियेच्या प्रवाहात वाहत न जाता चांगलं काय, वाईट काय निवडण्याची आणि त्यात किती वेळ रमायचं, हे ठरवण्याची सदसद्विवेकबुद्धी सतत जागरूक ठेवली आणि मर्यादित संयमानं आणि विवेकानं याचा वापर केला, तर सोशल मीडियामुळे नातेसंबंध अधिक समृद्ध होण्यासाठी उपयोग होईल.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: smita joshi article social media