भारतीय रसायनशास्त्रज्ञ प्रा.हरी जीवन अर्णीकर यांची कहाणी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

indian chemist prof hari jeevan arnikar

अभ्यास-संशोधन-अध्यापन-लेखन यात अगदी शेवटपर्यंत कार्यरत राहिलेल्या प्रा.हरी जीवन अर्णीकर नावाच्या या पर्वाचा रविवारी (ता.21 नोव्हेंबर) रोजी स्मृतीदिन, त्यांना विनम्र अभिवादन !

भारतीय रसायनशास्त्रज्ञ प्रा.हरी जीवन अर्णीकर यांची कहाणी

sakal_logo
By
डॉ. प्रज्ञावंत देवळेकर

गोष्ट आहे एका भारतीय संशोधकाची. त्यांचा जन्म ६ ऑक्टोबर १९१२ या दिवशी आंध्रातल्या ‘श्रीकाळहस्ती’ या गावी झाला. वयाच्या सातव्या वर्षीच पितृछत्र हरवल्याने त्यांचे बालपण तसे कष्टमयच गेले. अगदी मुलभूत शिक्षणासाठीही त्यांना प्रचंड खस्ता खाव्या लागल्या. या सगळ्या नकारात्मक काळात त्यांच्या अल्पशिक्षित आत्याचे प्रोत्साहन त्यांच्यासाठी ‘टॉनिक’ ठरले आणि त्यांचे शालेय शिक्षण पूर्ण झाले. मदनपल्लीस्थित ‘बेझंट थिऑसॉफिकल महाविद्यालय’ येथील ‘चिंतामणी त्रिलोकेकर’ या अत्यंत गुणग्राहक प्राचार्यांच्या मदतीनं त्यांना बनारसच्या हिंदू विद्यापीठात पुढच्या शिक्षणाची संधी मिळाली.

संधी अनेकांना मिळते तिचं ‘सोनं’ मोजकीच लोकं करतात. बीएस्सी पाठोपाठ एमएस्सी आणि ते देखील या प्रथम श्रेणीत, प्रथम क्रमांकाने उत्तीर्ण होऊन त्यांनी बालपणी जी शैक्षणिक हेळसांड झाली होती, तिचा जणू वचपा काढला. पद्व्युत्तर शिक्षण संपल्यांनतर त्यांनी प्रा.श्रीधर सर्वोत्तम जोशी यांच्या मार्गदर्शनाखाली संशोधन कार्य सुरू केलं आणि ‘कोरोना प्रेशर अँड दी जोशी इफेक्ट इन गॅसेस अंडर डिस्चार्ज’ या शिर्षकाखाली तब्बल सातशे पानी प्रबंध सादर करत ‘डॉक्टरेट’ मिळवली. या अथक परिश्रमांचे फळ म्हणून १९५५ ला त्यांना भारत सरकारची ‘ओव्हरसीज मॉडिफाइड स्कॉलरशिप’ मिळाली.

ते पॅरिसस्थित आणि दस्तूरखुद्द ‘मेरी क्यूरी’ स्थापित प्रयोगशाळेत रुजू झाले. तेथे त्यांना नोबेल विजेते क्युरी दाम्पत्याची नोबेल विजेती लेक आयरिन आणि जावई प्रा.फ्रेडरिक यांच्या समवेत संशोधन करण्याची संधी मिळाली.

हेही वाचा: 'व्हिटॅमिन्स'चा शोध लावणाऱ्या कॅसिमिर फंक यांची कहाणी

या संधीचंही त्यांनी सवयीप्रमाणे ‘सोनं’ केले. पॅरिस विद्यापीठात ‘सेपरेशन ऑफ आयसोटोप बाय इलेक्ट्रोमायग्रेशन इन फ्युज्ड सॉल्ट्स’ हा प्रबंध सादर करत त्यांनी ‘डॉक्टरेट’ मिळवली. उच्चशिक्षण घेऊन मायदेशी परत त्यांनी १९५८ ला बनारस हिंदू विद्यापीठात शिकवणं सुरू केलं. या कालावधीत त्यांनी तिथं अणुरसायनशास्त्र विभागाची पायाभरणी केली. तसेच डॉ.के.एन.उडुपा यांच्या सहाय्याने वैद्यकशास्त्रात किरणोत्सर्गी समस्थानिकांचा यशस्वीपणे उपयोगही करून दाखवला.

१९६२ ला त्यांना अमेरिकेतील विस्कॉन्सिन-मॅडिसन विद्यापीठात मॅनहॅटन प्रकल्पातील शास्रज्ञ प्रा.जॉन विलार्ड यांच्या प्रयोगशाळेत संशोधन करण्यासाठी त्यांना 'फुलब्राइट' शिष्यवृत्ती मिळाली. ‘युनेस्को’ च्या ‘पायलट प्रोजेक्ट ऑन टीचिंग केमिस्ट्री’ या प्रकल्पाचे ते आंतरराष्ट्रीय सल्लागारही होते ज्यामुळे रसायनशास्राच्या अध्यापनात अनेक मौलिक सुधारणा करता आल्या. यानंतर पुणे विद्यापीठात रुजू होत त्यांनी इथल्या रसायनशास्त्र विभागाचं प्रमुखपद स्वीकारले. येथे त्यांनी मुंबईस्थित भाभा अणुशक्ती केंद्राच्या मदतीने अणुरसायनशास्त्राची प्रयोगशाळा-संशोधन केंद्र आणि अध्यापन वर्ग सुरू केले.

त्यांच्या मार्गदर्शनाखाली तब्बल ३३ विद्यार्थ्यांनी ‘डॉक्टरेट’ पदवी मिळवली. त्यांच्या मार्गदर्शनाखाली सुमारे ३०० शोधनिबंध प्रकाशित झाले. १९७७ ला सेवानिवृत्त होऊनही मानद प्राध्यापक म्हणून अध्यापन-संशोधन यात ते पुर्वीइकतेच रमले. त्यामुळे त्यांना हॉट अ‍ॅटम केमिस्ट्री-अ‍ॅक्वाल्युमिनेसन्स-फ्युज्ड इलेक्ट्रोलाइट्स-जोशी इफेक्ट यासारख्या अनेक किचकट विषयात संशोधन करणे शक्य झाले.

हेही वाचा: भारतीय डॉक्टरने केला उपचार, रिझवानच्या रिकव्हरीची कहाणी थक्क करणारी

'युनिव्हर्सिटी केमिकल सोसायटी’च्या मदतीने त्यांनी अनेक उपक्रम राबवले आणि विज्ञान प्रसारासाठी फिरत्या प्रयोगशाळेचा विद्यार्थीभिमुख वापर केला.

कृत्रिम किरणोत्सर्गाच्या शोधाला ५० वर्षे पूर्ण झाल्यामुळे त्यांनी १९८५ ला भाभा अणू संशोधन केंद्राच्या सहाय्याने एक भव्य आंतरराष्ट्रीय चर्चासत्राचे यशस्वी आयोजन केले. १९७४ ला महाराष्ट्र शासनाने ‘उत्कृष्ट शिक्षक’ म्हणून त्यांना सन्मानित केले आणि १९८८ ला त्यांना लंडनच्या ‘रॉयल सोसायटी ऑफ केमिस्ट्री’चं मानद सदस्यत्व मिळाले. १९९९ ला पुणे विद्यापीठाच्या सुवर्ण महोत्सव प्रसंगी त्यांना ‘जीवन साधना गौरव पुरस्कार’ देऊन गौरवान्वित करण्यात आलं. ‘इसेन्शियल्स ऑफ न्यूक्लिअर केमिस्ट्री अँड आयसोटोप्स इन दी अ‍ॅटॉमिक एज’ या त्यांच्या पुस्तकाचे तब्बल सहा युरोपियन भाषांत भाषांतर झालंय. डॉ.लेडबीटर आणि अ‍ॅनी बेझंट यांनी 'गूढ' रसायनशास्त्रावर लिहिलेला 'ऑकल्ट केमिस्ट्री’ या ग्रंथातील निष्कर्षांचा त्यांनी आधुनिक विज्ञानाच्या कसोटींवर अभ्यास केला अन् त्यावर वयाच्या ८८व्या वर्षी २००० ला 'एसेन्शियल्स ऑफ ऑकल्ट केमिस्ट्री’ हा ग्रंथ लिहिला.

तेलगू-हिन्दी-मराठी-फ्रेंच-इंग्रजी या भाषांवर प्रभुत्व असण्यासोबतच त्यांचं वक्तृत्वही अत्यंत प्रभावी होते. या सगळ्या अफलातून मिश्रणामुळे ते पॅरिसच्या लॅबमध्ये जितके रमले तितकंच समरसून सर्वसामान्य लोकांत विज्ञानप्रसाराच्या कार्यातही वावरले.

loading image
go to top