स्पॉन्जेसच्या प्रजाती प्रयोगशाळेत वाढविण्यात यश

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 6 जून 2019

रत्नागिरी - कोकण किनारपट्टीवर आढळलेल्या स्पॉन्जेसवर पर्यावरणातील बदलांचा परिणाम होत असतो. अतिशय संवेदनक्षम असणारे हे प्राणी नष्ट होऊ नये म्हणून प्रयत्न करताना काही प्रजाती प्रयोगशाळेत वाढविण्यात शिरगाव येथील मत्स्य महाविद्यालयाला यश मिळाले.

रत्नागिरी - कोकण किनारपट्टीवर आढळलेल्या स्पॉन्जेसवर पर्यावरणातील बदलांचा परिणाम होत असतो. अतिशय संवेदनक्षम असणारे हे प्राणी नष्ट होऊ नये म्हणून प्रयत्न करताना काही प्रजाती प्रयोगशाळेत वाढविण्यात शिरगाव येथील मत्स्य महाविद्यालयाला यश मिळाले. पुढील टप्प्यावर प्रयोगशाळेत वाढवलेले स्पॉन्जेस योग्य त्या ठिकाणी ट्रान्सप्लांट करून त्यांचे संवर्धन करणे हा आमचा पुढचा प्रयत्न असेल, अशी माहिती प्राध्यापिका डॉ. स्वप्नजा मोहिते यांनी दिली.

कोकण किनारपट्टीवर 22 प्रकारची स्पॉन्जेस आढळतात. समुद्राचे पर्यावरण सांभाळायचं असेल तर स्पॉन्जेससारख्या अन्नसाखळीतील अगदी सुरवातीला असणाऱ्या सागरी जीवांचे संरक्षण करून समुद्राशी नाते जोडणे हे आपण करू शकतो. कायमस्वरूपी बांधिलकी म्हणून समुद्राशी असलेले नाते वृद्धिंगत करणे हेच आपले कर्तव्य ठरेल, असे डॉ. मोहिते यांनी स्पष्ट केले.

पृथ्वीची निर्मिती झाली तेव्हापासून अथांग समुद्र पर्यावरणाचा अविभाज्य भाग बनला. समुद्र जगाच्या गरजेपैकी 50 टक्‍क्‍यांहून जास्त प्राणवायूची निर्मिती करतो आणि वातावरणातील 50 टक्‍क्‍यांहून अधिक कार्बन डायऑक्‍साईड आपल्यात साठवून ठेवतो. 70 टक्‍क्‍यांहून जास्त पृथ्वी व्यापणारा समुद्र, वातावरणातील उष्णता विषुववृत्ताकडून ध्रुवांकडे नेतो व पृथ्वीवरील हवामानाचा, ऋतूंचा समतोल राखतो. पुराणात समुद्रापासून मिळालेल्या चौदा रत्नांचा उल्लेख आढळतो. पण माणसाने हव्यासापायी समुद्राची हानी केली असून आता जगभरातून समुद्र व तिथल्या जैवविविधता जपण्यासाठी लक्ष दिले जात आहे. जागतिक तापमान वाढ आणि वादळे, त्सुनामी आणि अवकाळी पाऊस, पूर, समुद्राचे अतिक्रमण, हिमनगांचे झपाट्याने वितळणे अशा अनेक घटनांतून वातावरणात होणारे बदल प्रकर्षाने दिसू लागले आहेत. समुद्राबद्दल बोलणे आणि विचारपूर्वक कृती करण्याची साऱ्यांनाच गरज आहे.

प्रदूषण नसल्याचे द्योतक

समुद्राच्या पर्यावरणाचे, तेथील अधिवासांचे आणि सगळ्या अन्नसाखळ्यांचे संरक्षण करणे महत्वाचे आहे. आज कोकणच्या किनाऱ्यांवर स्पॉन्जेसचे अस्तित्व आहे, हे येथे प्रदूषण नसल्याचे द्योतक मानता येईल. स्पॉन्जेस असतील तर जलीय अन्नसाखळ्या अबाधित राहतील. म्हणजेच पर्यायाने समुद्राचे पर्यावरण राखले जाईल.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Success in expanding sponges species into laboratory