
आज भारतरत्न जेआरडींच्या स्मृतीदिनी सहज हा प्रपंच आणि या व्यक्ती नव्हे तर संस्था असलेल्या जेआरडींना विनम्र अभिवादन !
JRD Tata : टाटा मीठापासून ते टायटनपर्यंत इंडस्ट्रीज उभ्या करणाऱ्या जेआरडींची कहाणी
आज संशोधक-प्रयोग यापेक्षा थोडी वेगळी आणि काहीशी पडद्यामागची गोष्ट सांगतो. गोष्ट आहे जेआरडींची. जेआरडी म्हणजे जहॉंगीर रतनजी दादाभाई टाटा. ‘टाटा’ हे केवळ एक भारतीय उद्योगपती नव्हे तर भारतीय समाजजीवनातील एक असे नाव आहे जे वगळले तर देशाचा इतिहास अधुरा राहिल.
आजही भारतात कुठल्याही घरात कर्करोगाचं निदान होतं तेव्हा प्रत्येकाला स्वस्त आणि उत्तम पर्याय म्हणून चटकन मुंबईचं ‘टाटा मेमोरिअल हॉस्पिटल’च डोळ्यांसमोर येतं. जेआरडींनी जेव्हा या हॉस्पिटलची घोषणा केली तेव्हा पहिल्याच बैठकीत तज्ज्ञ मंडळी हॉस्पिटल किती खाटांचे असावे आणि विश्वस्त मंडळी खर्चाबाबत विचार करत होते तेव्हा जेआरडींनी आपली ‘त्रिसुत्री’मांडली. “या हॉस्पिटलमध्ये उपचार-आरोग्यशिक्षण-संशोधन व्हावं.”
‘उपचाराइतकंच संशोधनही महत्वाचे’अशी मांडणी करत त्यांनी बैठकीचा नूरच बदलवून टाकला आणि सेवा असो वा व्यवसाय मानवी आयुष्याला स्पर्श करणाऱ्या गोष्टींचं नियोजन दुरगामी असावे याची जाणीव सर्वांना करून दिली. या हॉस्पिटलच्या उद्घाटन सोहळ्यात तत्कालिन गव्हर्नर सर रॉजर ल्युमली यांनी आपल्या भाषणात “हे हॉस्पिटल भारतीय वैद्यकिय जगतात नवनव्या निदानपद्धती, नवं ज्ञान आणेल आणि एक वस्तुपाठ ठरेल”असं प्रतिपादन केले.
जे ऐंशी वर्षांनंतरही तितकंच खरं आहे. १९४३ ला जेआरडींची भेट केंब्रिज विद्यापीठातील एका बुद्धिमान भारतीय शास्रज्ञाशी झाली. भारतात संशोधनाचा अभाव असण्याचे कारण तशा संस्था इथे नसल्याचा उल्लेख त्यांच्या चर्चेदरम्यान झाला. तरुण शास्त्रज्ञाने पुढे जाऊन एवढंही सांगितलं,” भारतात अशा संस्था असल्या तर आम्ही तिथेच काम करू आणि शब्दही देतो की देशाला गरज पडली तर आम्ही आमचे शंभर टक्के देऊ पण इतरांच्या मदतीची गरज पडू देणार नाही.”
जेआरडींनी लागलीच ‘टाटा इन्स्टिट्यूट ऑफ फंडामेंटल रिसर्च’ची घोषणा केली जिथं अनेक भारतीय संशोधकांची आणि संशोधनांची पाळेमुळे आहेत.
केंब्रिजला भेटलेल्या तरुणानंही आपला शब्द पाळला. हि वॉज डॉ. होमी जहाँगीर भाभा, रेस्ट इज हिस्ट्री. आरोग्य-विज्ञान-संशोधन वगैरे ठिक आहे गरजेचेच आहे पण प्रशिक्षणाचं काय? पुन्हा चर्चा झाल्या. जेआरडींनी ’टाटा मॅनेजमेंट ट्रेनिंग सेंटर’ची घोषणा केली. पुण्यात या केंद्राचे उद्घाटन झाले. तेव्हा जेआरडी बोलले, “तंत्रकुशल लोकं फक्त चांगले काम करतीलच असे नाही पण देशाचे अर्थचक्र गतीमान करून टाकतील.” या संस्थेने देशाला उत्कृष्ट प्रशासक-व्यवस्थापक दिले.
ज्ञान विज्ञानाने केवळ भौतिक प्रगती होते असे नाही त्यातून आत्मिक आनंदही मिळाला पाहिजे, चंगळवाद हा समाज पोखरतो त्याला ‘खोली’ पाहिजे या भावनेतून जेआरडींनी नॅशनल सेंटर फॉर द परफॉर्मिंग आर्ट सुरू केले. सत्यजित रे, येहूदी मेनूहीन यांसह अनेक महानुभाव इथलेच प्रॉड्क्ट्स. जेआरडींना रोज शेकडो पत्र येत ते ही अनेक पत्रांची व्यक्तीश: उत्तरं देत. इन्फोसिसच्या सुधा मुर्तींचं विद्यार्थीदशेत टाटांना पाठवलेलं पत्र आणि त्याला टाटांनी दिलेलं उत्तर सोबत टेल्कोत महिलांचे रिक्रुटमेंट हा या पत्रव्यवहारांचाच एक भाग. जेआरडींनी टाटा मीठापासून टायटन घड्याळापर्यंत जवळपास चौदा इंडस्ट्रीज उभ्या केल्या. ‘नफा’ या भांडवलदारी संज्ञेला थेट समाजाशी जोडत व्यवसायाला एक संस्कृती बनवलं.