निसर्गाची अन्नसाखळी म्हणजेच वड

Wad, Pimpal and Pimparani
Wad, Pimpal and Pimparani

वड, पिंपळ अन्‌ पिंपरणी 

"फायकस' ही एक पोटजात किंवा वर्ग आहे. या वर्गात 850/1000 प्रजाती असून सर्व प्रजाती कठीण अशा लाकूड, झुडूप, वेली, दुसऱ्या वृक्षाचा आश्रय घेऊन स्वतंत्रपणे उगविण्याची क्षमता असणारी झाडे (हेमिएपिफायटीक) आहेत. यास मोरॅएसी कुटुंबही म्हणतात; पण सर्वसाधारणपणे या कुटुंबाला "फिग ट्री' किंवा "फिग' असेही म्हणतात. फिग ट्री प्रकारात वड, पिंपळ, पिंपरणी (पिंपरी), अंजीर अशी आपल्या परिसरात आढळणारी वृक्षांची मांदियाळी दिसते. ही झाडे कुठेही उगवतात. अगदी कठीण कातळ, विहीरीचे दगड, प्राचीन देवालये, ब्रिटीश कालीन पूल. जुनी घरे, थडगी, भिंतीवर ही झाडे उगवतात. जिथे ती उगवतात तिथे दगड फोडून काढतात. भिंती उलथवून टाकतात. याचं मुळ पाताळात गेले आहे की काय, असे वाटते. सहजासहजी ही झाडे नष्ट होत नाही. कठिण परिस्थितीत ते तरुन जातात. बुंधा उरला तरी त्यातून नवा अंकूर उगवितो. 5 मे रोजी जागतिक पर्यावरण दिवस आणि वटपौर्णिमा एकत्रित येत आहे. खरेतर हा दुर्मिळ योगायोग. हे तिन्ही वृक्ष भवतालाचं पर्यावरण शुद्ध ठेवतात. यासाठी या वृक्षांचे संवर्धन प्रत्येकाने केले पाहिजे. 
- अमोल सावंत, कोल्हापूर 
... 
काही वृक्ष उष्ण कटिबंधात तर काही अर्ध-उबदार समशितोष्ण प्रदेशात दिसतात. अंजीरसारखे वृक्ष तर दक्षिण-पश्‍चिम आशिया, भूमध्य समुद्र प्रदेशात ही (अफगाणिस्तान ते पोर्तुगाल) दिसतात. प्राचीन कालखंडापासून अंजीर, वड, पिंपळ, पिंपरणीची लागवड केली जात आहे. स्थानिक लोकांचे अर्थकारण प्रबळ करण्यासाठी अश वृक्षांच्या प्रजातीने हातभार लावला आहे. खाद्य पदार्थांमध्ये बिया, फळे, साल, मुळ्यांचा वापर होतो. आयुर्वेद, युनानी, सिद्धामध्ये या वृक्षांपासून औषधी अर्क, भस्मे, तेल, गुटी, मलम तयार केली जातात. प्राणी, पक्षी, किटकांच्या खूप प्रजाती या वृक्षांच्या झाडांवर दिसतात. कोल्हापूर जिल्ह्यात काही ठिकाणी हे वृक्ष मुद्दामहून लावलेले आहेत; तर काही पक्ष्यांच्या विष्ठेतून बीज पडून ते उगविले आहेत. विशेषत: दत्त मंदिरांच्या ठिकाणी वड, पिंपळ, उंबर आजूबाजूला दिसतात. दत्त आणि नाथ संप्रदायाशी या वृक्षांचे जुने नाते आहे. 

वडाला वटवृक्ष असेही म्हणतात. प्राचीन ऋषीमुनींनी वटवृक्षाखाली तपश्‍चर्या केल्याचे उल्लेख प्राचीन हिंदू ग्रंथात आढळतात. महाराष्ट्रात जिथे सिद्धांची, संतांची ठिकाणे आहेत. तिथे हा वृक्ष हमखास दिसतो. वडाबरोबर पिंपळ, पिंपरणीही दिसतो. वडाचा अंतर्भाव मोरेसी कुलातील फायकस प्रजातीमध्ये केला जातो. फायकस प्रजातीत 1500 ते एक हजार जाती आहेत. त्यांपैकी 70 जाती भारतात सापडतात. उंबर, पिंपळ, अंजीर, पिंपळी, काळा उंबर, कृष्णवड आदी वृक्षांचा अंतर्भाव या प्रजातीत केला आहे. "कृष्ण वड' नावाने परिचित वृक्ष खऱ्या वडांपेक्षा निराळा आहे. कृष्ण वडाचे शास्त्रीय नाव फायकस कृष्णी असे असून इंग्रजीत "कृष्णाज बटरकप' असेही म्हणतात. कृष्ण वडाची पाने पात्याच्या तळाजवळ दुमडलेली असतात. द्रोणासारखी ती दिसतात. हा वृक्ष शोभेसाठी बागेतही लावतात. कृष्ण वडाचे लाकूड लवचिक, अधिक बळकट असते. तंबूंचे खांब, बैलगाड्यांचे जू, दांडे आदीसाठी ते उपयुक्त आहे. खोडाचे लाकूड करडे, साधारण कठीण असते. अनेक किरकोळ वस्तू, सजावटी सामानासाठी वापर होतो.

वडाच्या लाकडापासून कागदाचा लगदा तयार होतो. सालीच्या धाग्यांपासून दोर, पारंब्यांची दोरी, चिकापासून गोंद पाखरे पकडण्यासाठी केला जातो. पानांपासून पत्रावळी, द्रोण केले जाते. कोवळ्या पानांचा शेळ्या, मेंढ्या, अन्य गुरांना चारा म्हणून उपयोग केला जातो. हत्तीला तर हा चारा खूप आवडतो. वडाचा चीक हा दातदुखी, संधिवात, कटिशूल व्याधींवर उपयुक्त आहे. तळपायांच्या भेगांवर लेप लावतात. वडाच्या सालीत 11 टक्के टॅनिन असते. रस स्तंभक आणि पौष्टिक असून आमांश, अतिसारात उपयोगी आहे. सालीचा काढा मधुमेहात दिला जातो. मुळांची साल परम्यावर उपयोगी असून पानांचे पोटीस गळवांवर बांधतात. म्हणून वटपौर्णिमेला सांस्कृतिक महत्व असले तरी वड जिथे असेल तिथे तो अनेकांना उपयोगी होतो. 
मार्च-जून काळात वडाची फळे झाडावर दिसतात. अनेक पक्षी, वटवाघळे, खारी, माकडे आदी प्राणी खाद्यांमध्ये वापरली जातात. वडाची फळे दुष्काळी भागात खाल्ली जातात. अनेकदा वडाचे बी दुसऱ्या वृक्षांच्या दुबेळक्‍यात रूजत असते. प्रारंभी अपवनस्पती स्वरूपात हे रोपटे वाढते; पण कालांतराने मुळे जमिनीत जातात. हा वृक्ष मूळच्या आश्रय वृक्षांवर अवलंबून न राहता स्वतंत्रपणे वाढतो. वडाची लागवड मृग नक्षत्र झाली की, फांद्या लावून करतात. पक्ष्यांच्या विष्ठेतून पडलेल्या बियातून ही वड तररारुन येतो. 

रॉयल बॉटनिकल गार्डन कोलकाता, गयेचा अक्षय वट आणि प्रयागचा श्‍याम वट प्राचीन काळापासून प्रसिद्ध आहेत. कोलकाता येथील सिबपूर येथील भारतीय वनस्पती उद्यानातील वट वृक्ष पर्यटकांचे आकर्षण आहे. वडाचे बी ताडवृक्षाच्या (खजुर) पानांच्या दुबेळक्‍यात 1782 मध्ये पडले. ते बी रूजून वडाचे झाड झाले. 1900 मध्ये डी. प्रेन यांनी या वृक्षाचे वर्णन केले. यानंतर दोनशे वर्षाहून अधिक आयुष्यमान असलेल्या या वृक्षाचे मूळ खोड रोगग्रस्त होऊन नष्ट झाले. डोचपासून जवळ असलेल्या नर्मदा नदीतील एका बेटावर कबीर वड हा पुरातन वृक्ष दिसतो. फॉर्बझ यांनी वर्णन केल्याप्रमाणे लहान वायवी मुळांच्या आधारावर तो उभा आहे. हल्ली या वडाचे स्वरूप खूप कमी झाले आहे. जावळी (जि. सातारा), जुन्नर (जि. पुणे) येथील वट वृक्षही प्राचीन आहेत. सर जॉन किंग यांनी जावळी जवळच्या एका वट वृक्षाचे मोजामाप केले. मद्रास येथील अड्यार नदीच्या दक्षिण तीरावर एका 500 वर्षे आयुःकाल असलेला वृक्ष आहे. 

कोल्हापूर शहरात पूर्वी पिंपळाचे आणि परिसरात पिंपरणीचे वृक्ष खूप होते. जसजसशी वस्ती वाढत गेली तशी हे पिंपळ नष्ट केले गेले. केबल, रस्ता खोदाई, भिंती उभारणी, इलेक्‍ट्रिक वायर्स आदींमुळे पिंपळ, वड, उंबरांवर संक्रांत आली आहे. ब्रिटीश काळामध्ये जे रस्ते तयार केले गेले. त्या रस्त्याशेजारी वड अजूनही दिसतात; मात्र रस्ता रुंदीकरण, हायवेमुळे असे वड आता बऱ्यापैकी नष्ट झाले आहेत. हे वड एकदा नष्ट झाले की, ते पुन्हा लावले जात नाहीत. त्याठिकाणी अन्य वृक्षांची लागवड होते. खरेतर रस्त्याशेजारी वड असेल तर सावलीसाठी उपयोग होतो. भारतीय संस्कृती कोशात दिलेल्या माहितीनुसार, हा यज्ञीय वृक्ष असून यज्ञपात्रे तयार करण्यासाठी या लाकडांपासून तयार केली जात असत. 

वटपौर्णिमेदिवशी महिला वडाची पूजा करतात. हा अंजीराच्या जातीचा वृक्ष आहे. महाराष्ट्रात काही ठिकाणी तर असे उंबर 100 वर्षांहून अधिक काळ जगल्याचे उल्लेख आहेत. काही वडांची मात्र जंगली किंवा शेताच्या बाजूला लावली जातात. वडाचे बीज किंवा रोपटे जरी लावले तरी वड तिथे येतो. वैदिक कालखंडातील तर वड, पिंपळ, पिंपरणीचे अनेक उल्लेख दिसतात. 

पिंपरणी तुम्ही पाहिली असाल. कोल्हापुरात ही पिंपरणी तुम्हाला पाहायची असेल तर शिवाजी पूल, शाहूकालीन इमारती, भवानी मंडप, जुने पूल, कोल्हापूरी बंधारे आदी ठिकाणी दिसतात. न्यू पॅलेसच्या परिसरात तर पिंपरणीचा मोठा वृक्ष पाहायला मिळतो. पिंपरणीचे फायकस ऍम्प्लीसीमा असे शास्त्रीय नाव आहे. बोन्सायच्या कुंडीमध्ये पिंपरणी उठून दिसते. घरासमोर, बागेत तो आकर्षून घेतो. सदाहारीत वृक्ष असून गर्द हिरवीगार पाने वर्षभर दिसतात. या पिंपरणीला खूप ऊन लागते.

कमी पाण्यात ती उगवते. दगडाच्या खोबणीत ती अनेकदा आढळते. पिंपरणीचा उपयोग हा माऊथ अल्सर, ब्लड शुगर, अँटी डायबेटिससाठी वापरली जाते. पिंपरणीची फळे पक्षी खातात. शेळ्या-मेंढ्या पिंपरणीची पाने खातात. फर्निचरसाठी हे झाड अतिशय मजबूत आहे. पिवळसर लाकूड असलेल्या झाडाच्या बुंध्या, फांद्यापासून काष्ठशिल्पे तयार केली जातात. ही पिंपरणी खूप वर्षे जगते. अगदी 100 वर्षांपेक्षा ही जास्त. हीच गोष्ट पिंपळाची. कोवळीशार, लुसलुसीत पाने दररोज सकाळी खाल्ली तर मेंदूसाठी उपयोग होतो. कोल्हापूर परिसरातील अनके रस्त्यावर हा पिंपळ दिसतो. जिथे कुठे पिंपळ, उंबर, पिंपरणीची झाडे दिसतील. तेथून आणून ती योग्य ठिकाणी लावली तर परिसराला निश्‍चितपणे फायदा होतो. 
 

कशी करायची लागवड 
महाराष्ट्रातील हवामानात वट वृक्षाची वाढ उत्तम होते; कारण हा वृक्ष काटक असून तो केवळ पावसाच्या पाण्यावर येतो. वडाचे झाड जास्त पावसाच्या तसेच कोरडवाहू भागातही येते. पाऊस सुरू झाला की, वडाची आठ फूट उंचीची फांदी घ्यावी. ही फांदी जमिनीत दोन फूट खोल लावावी. जो खड्डा असतो, तो शेणखत, मातीने भरून घ्यावा. फांदी लावल्यानंतर तिच्या सभोवताली काटेरी कुंपण करावे. पावसाळा संपला की, हिवाळ्यात, उन्हाळ्यात त्या झाडाला आठ दिवसांच्या अंतराने थोडे पाणी घालावे. हे पाणी वर्षभर घालावे. त्यानंतर पाणी घालण्याची जरुरी नाही. अशा रीतीने लावलेल्या फांदीचा पाच वर्षांत वटवृक्ष तयार होईल. 

हवा शुद्ध होते... 
वटवृक्ष पर्यावरण रक्षणाच्या दृष्टीने महत्त्वाचा आहे. आता जगभर तापमान वाढीची समस्या निर्माण झाली आहे. हवेत कार्बन डायऑक्‍साईड सारखे वायू उत्सर्जित केला जातो. वाढते तापमान कमी करण्याचे जे मार्ग आहेत. त्यात वटवृक्ष हा प्रभावी आहे. वड हा आपल्या पानांवाटे हवेतील कार्बन डायऑक्‍साईड वायू शोषून घेतो. ताजा ऑक्‍सिजन सोडतो. यामुळे हवा शुद्ध होते. पानांतील छिद्रांवाटे तो हवेत ओलावा सोडतो. त्याला "पर्णोत्सर्जन म्हणतात. त्यामुळे हवेत गारवा निर्माण होतो. महाराष्ट्रातील प्रत्येक ग्रामपंचायतीने रस्त्याच्या दुतर्फा किंवा मोकळ्या जागेत वटवृक्षाची लागवड करावी. ज्या शिक्षण संस्था आहेत. ज्यांच्याकडे जमीन आहे. त्यांनी जर वटवृक्षाची लागवड केली तर या वृक्षाच्या सावलीत त्यांना वर्ग घेता येतील. गुरुदेव रवींद्रनाथ टागोर यांच्या शांतीनिकेतनमध्ये विद्यार्थ्यांचे वर्ग वटवृक्षाच्या सावलीत घेतले जातात. प्रत्येक वटवृक्षाभोवती त्यांनी सुंदर पार बांधले आहेत. महाराष्ट्रातील शिक्षण संस्थांनाही असे शांतिनिकेतन सारखे वातावरण निर्माण करता येईल. ठाणे जिल्ह्यातील कोसबाड येथील कृषी संस्थेसमोर वडाचे एक सुंदर झाड आहे. या झाडाखाली विद्यार्थ्यांचे वर्ग भरवलेले असत. 
----- 
काव्यात वर्णन... 
दश कूप समो वापी 
दश वापी समो सरः 
दश सर समो पुत्रः 
दश पुत्र समो तरूः 

याचा अर्थ, दहा विहिरीसमान एक मोठी विहीर, दहा मोठ्या विहिरीसमान एक सरोवर, दहा सरोवरासमान एक पुत्र, दहा पुत्रांसमान एक वृक्ष. महाभारतात एक प्रसंग आहे, द्रौपदी अत्यंत निराश होऊन श्रीकृष्णाचा धावा करू लागली. तेव्हा श्रीकृष्ण तिला म्हणाले निराश होऊ नकोस. वटवृक्षासारखी हो. वटवृक्षाला जरी मुळासकट काढले आणि त्याची एक फांदी जरी दगडावर पडली तरी तिला मुळे फुटतात. त्यांतून मोठा वट वृक्ष उभा राहतो. महाराष्ट्र राज्यात वडाच्या झाडांचे संवर्धन, लागवड करून वटपौर्णिमा साजरी करण्याचा संकल्प महिलांनी केला पाहिजे. 

(संदर्भ : भारतीय संस्कृती कोश, गुगल, विकीपिडिया, "सकाळ' ग्रंथालय सेवा)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com