
WhatsApp Pay India : व्हॉट्सॲप पे इंडियाचे प्रमुख विनय चोलेट्टी यांचा राजीनामा, कारण...
व्हॉट्सॲप पे इंडियाचे प्रमुख विनय चोलेट्टी यांनी बुधवारी राजीनामा दिला. लिंक्डइन पोस्टद्वारे त्यांनी ही माहिती दिली आहे. चार महिन्यांपूर्वीच त्यांनी कंपनीचा कार्यभार स्वीकारला होता. चोलेट्टी यांनी ऑक्टोबर 2021 मध्ये भारतातील व्हॉट्सॲपमध्ये रुजू झाले होते. सप्टेंबर 2022 पर्यंत त्यांनी कंपनीचे प्रमुख म्हणून पदभार स्वीकारला. कंपनीत मनीष महात्मे यांच्याकडून त्यांनी हे पद स्वीकारले होते.
चोलेट्टी यांनी लिंक्डइनवर लिहिले की, मंगळवारचा दिवस हा व्हॉट्सॲपमध्ये काम करण्याचा शेवटचा दिवस होता. त्यांनी पुढे लिहिले की, 'मी आता माझ्या पुढच्या प्रवासाकडे वाटचाल करत आहे. मला खात्री आहे की, व्हॉट्सॲपमध्ये डिजिटल पेमेंट आणि लोकांच्या आर्थिक सहभागात अभूतपूर्व रूपांतर करण्याची ताकद आहे आणि मी येणाऱ्या काही वर्षांत त्या फिचर्सचा फायदा घेण्यासाठी उत्सुक आहे.'
हेही वाचा : प्राप्तिकर- कशाने मिळेल सूट, कशावर भरावा लागेल कर....
आयआयएम अहमदाबादचे माजी विद्यार्थी चोलेट्टी यांनी पुढे लिहिले, 'कंपनीत गेले एक वर्ष चांगले गेले. मी अभिमानाने सांगू शकतो की, भारतात व्हॉट्सअॅपचे प्रमाण आणि प्रभाव पाहणे हा एक चांगला अनुभव आहे. व्हॉट्सॲप पे वापरून ग्राहक त्याचा अवलंब करत आहेत हे पाहून मला खूप आनंद होत आहे. चोलेट्टी ऑक्टोबर 2021 मध्ये कंपनीत रुजू झाले आणि अवघ्या 11 महिन्यांत ते कंपनीचे प्रमुख बनले. व्हॉट्सॲप पे इंडियामध्ये येण्यापूर्वी चोलेटी ॲमेझॉनमध्ये काम करत होते.
अलीकडच्या काही महिन्यांत अनेक वरिष्ठ अधिकारी मेटा इंडिया सोडून गेले आहेत. गेल्या महिन्यात अभिजित बोस, राजीव अग्रवाल आणि अजित मोहन यांनी राजीनामा दिला होता. बोस हे व्हॉट्सअॅप इंडियाचे प्रमुख होते. राजीव अग्रवाल हे META चे भारतासाठी सार्वजनिक धोरण समितीचे संचालक होते तर मोहन हे META India चे प्रमुख होते.
हेही वाचा: टेक्नोहंट : ‘अवतार’ची अफलातून दुनिया
व्हॉट्सअॅप पे इंडियाच्या आधी चोलेट्टी यांनी काम केलेल्या कंपन्यांमध्ये आयटीसी (जून 2004-जुलै 2005), सिटी बँक इंडिया (ऑगस्ट 2005 -नोव्हेंबर 2008), अमेरिकन एक्सप्रेस (नोव्हेंबर 2008-जून 2011), अरेटे फायनान्शियल पार्टनर्स (फेब्रुवारी 2013), मश्रेक बँक (जुलै 2013-फेब्रुवारी 2014) आणि Amazon (एप्रिल 2014-ऑक्टोबर 2021) यांचा समावेश होता.