
WhatsApp: व्हॉट्सअॅपची मुजोरी, शेअर केला भारताचा चुकीचा नकाशा; केंद्रीय मंत्र्यांनी फटकारलं
WhatsApp tweets video with incorrect India map: मेटाच्या मालकीचे इंस्टंट मेसेजिंग अॅप व्हॉट्सअॅपने भारताचा नकाशा चुकीच्या पद्धतीने शेअर केला आहे. कंपनीने ट्विटरवर एक व्हीडिओ शेअर केला असून यामध्ये भारताच्या नकाशा चुकीचा दाखवण्यात आला आहे. यामुळे व्हॉट्सअॅपवर आता यूजर्सच्या रोषाचा सामना करावा लागत आहे.
चुकीचा नकाशा शेअर केल्यानंतर आता केंद्रीय इलेक्ट्रॉनिक्स आणि सूचना तंत्रज्ञान मंत्री राजीव चंद्रशेखर यांनी देखील WhatsApp ला फटकारले आहे. तसेच, योग्य नकाशा शेअर करण्यास सांगितले आहे. काही दिवसांपूर्वीच राजीव चंद्रशेखर यांनी व्हीडिओ कॉलिंग प्लॅटफॉर्म झूमचे सीईओ एरिक युआन यांना देखील याच कारणामुळे फटकारले होते.
हेही वाचा: Twitter Update: जानेवारी २०२३ मध्ये इलॉन मस्क देणार मोठे गिफ्ट, ट्विटरवर येणार 'हे' खास फीचर
राजीव चंद्रशेखर यांनी व्हॉट्सअॅपच्या व्हीडिओवर रिप्लाय दिला आहे. चंद्रशेखर ट्विट करत म्हणाले की, 'नकाशामध्ये झालेली चूक त्वरित दुरुस्त करावी. तसेच, जे प्लॅटफॉर्म्स भारतात व्यवसाय करत आहेत अथवा व्यवसाय करू इच्छित आहेत, त्यांनी अचूक नकाशा वापरणे गरजेचे आहे.'
दरम्यान, दोनच दिवसांपूर्वी झूमचे सीईओ एरिक युआन यांनी देखील आपल्या ट्विटर हँडलवरून भारताचा चुकीचा नकाशा शेअर केला होता. यानंतर चंद्रशेखर यांनी युआन यांनी ट्विटरवर फटकारले होते. भारताचा चुकीचा नकाशा शेअर करण्याची ही पहिलीच वेळ नाही. याआधी ट्विटरने देखील चुकीचा नकाशा शेअर केला होता.