WhatsApp, Facebook, Instagram का झालं होतं ठप्प? कंपनीला मोठा फटका | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

WhatsApp, Facebook, Instagram का झालं होतं ठप्प?

फेसबुकच्या या डाऊनमुळे कंपनीला आर्थिक फटका सहन करावा लागला आहे. शेअर्समध्ये एका दिवसात ४.९ टक्क्यांची घसरण झाली.

WhatsApp, Facebook, Instagram का झालं होतं ठप्प?

फेसबुकसह मेसेजिंग प्लॅटफॉर्म व्हॉटसअॅप आणि फोटो शेअरिंग अॅप इन्स्टाग्राम सोमवारी रात्री ७ तासांहून अधिक काळ बंद होते. कोट्यवधी युजर्सना तिन्ही अॅप्स वापरण्यात अडचणी येत होत्या. अखेर सात तासानंतर तिन्ही अॅप्सची सेवा पुर्ववत झाली आहे. फेसबुकने या प्रकारानंतर युजर्सची माफीही मागितली असून आभारही मानले आहेत. मात्र फेसबुक डाऊन होण्याचं नेमकं कारण मात्र सांगितलेलं नाही. भारतीय प्रमाणवेळेनुसार सोमवारी रात्री ८ वाजून ४५ मिनिटांनी युजर्सना अडचणी येऊ लागल्या. downdetector या इंटरनेट समस्येबाबत अपडेट देणाऱ्या वेबसाइटने सांगितलं की, फेसबुकच्या आतापर्यंतच्या इतिहासातील हा सर्वात मोठा बिघाड ठरला. जगभरातील १०.६ मिलियन युजर्सनी याबाबत रिपोर्ट केलं आहे.

फेसबुकच्या या डाऊनमुळे कंपनीला आर्थिक भुर्दंडही सहन करावा लागत आहे. शेअर्समध्ये एका दिवसात ४.९ टक्क्यांची घसरण झाली. नोव्हेंबरपासून एका दिवसातील ही सर्वात मोठी घसरण होती. यामध्ये फेसबुकला जवळपास ५ लाख ४५ हजार डॉलर प्रत्येक तासाला नुकसान झालं आहे.

फक्त युजर्सनाच नव्हे तर कंपनीच्या अंतर्गत अॅप्स आणि इमेल सिस्टिम वापरण्यातही अडचणी आल्या होत्या. ब्लूमबर्गने दिलेल्या रिपोर्टमध्ये असं म्हटलं आहे की, कॅलिफोर्नियातील ऑफिसमध्ये कर्मचाऱ्यांना इतर कार्यालयांसह कॉन्फरन्स रूम इत्यादी अॅक्सेस करता येत नव्हतं. हे सर्व अॅक्सेस करण्यासाठी त्यांना सिक्युरिटी बॅजची गरज असते मात्र सिस्टिममध्ये झालेल्या तांत्रिक बिघाडाने यात अडचणी येत होत्या असं ट्विटर आणि रेडिट युजर्सनी सांगितलं आहे.

मार्क झुकेरबर्गने याबाबत युजर्सची वैयक्तिक माफी मागितली आहे. काही लोकांना फेसबुक अॅप वापरण्यास अडचणी आल्या. आम्ही ते पुन्हा पुर्ववत करण्याचा प्रयत्न करत होतो. पण यामागचं कारण समजू शकलं नाही असं सांगण्यात आलं आहे. इन्स्टाग्रामच्या अदम मोस्सेरी यांनी स्नो डे असल्यासारखं वाटतंय असं म्हटलं होतं. तर फेसबुकचे मुख्य टेक्नॉलॉजी ऑफिसर माइक स्क्रॉफर यांनी नेटवर्किंगमध्ये प्रॉब्लेममुळे असं झाल्याचं म्हटलं आहे.

रॉयटर्स वृत्तसंस्थेला नाव न सांगण्याच्या अटीवर काही फेसबुक कर्मचाऱ्यांनी प्रतिक्रिया दिली. त्यांनी म्हटलं की, इंटर्नल राउटिंगमधील चुकीमुळे हे झालं होतं. काही सुरक्षा तज्ज्ञांच्या मते फेसबुक, व्हॉटस्ॅप आणि इन्स्टाग्राम त्यांच्या अंतर्गत चुकीमुळे तसंच त्यांच्याच सिस्टिममुळे झालं असल्याची शक्यता आहे. हार्वर्डमधील इंटरनेट अँड सोसायटीचे संचालक जोनाथन झित्रेन फेसबुकमध्ये झालेल्या या घटनेवर म्हटलं की, फेसबुकने त्यांच्या किल्ल्या कारमध्येच लॉक केल्या.

फेसबुकचे माजी सिक्युरिटी ऑफिसर अॅलेक्स स्टॅमोस यांनी म्हटलं की,'सर्व्हरवर लोड आल्यानं किंवा चुकीचा कोड नेटवर्क मॅनेजमेंट सिस्टिममध्ये पुश झाल्यानं असं झाल्याची शक्यता आहे.' काही इंटरनेट तज्ज्ञांच्या मते फेसबुकच्या राऊटर्समध्ये गडबड झाली असावी. जे राऊटर्स फेसबुक नेटवर्कला इंटरनेटशी जोडतात त्यातील समस्येमुळे असा प्रकार घडला असावा असं क्लाउडफ्लेअरच्या जॉन ग्राहम कमिंग यांनी म्हटलं आहे.

टॅग्स :Facebook