

Giuseppe Mazzini
esakal
लेखक - विपुल वाघमोडे
ज्यूसेप्पे मॅझिनी (Giuseppe Mazzini) हा इटलीच्या एकीकरणाचा आध्यात्मिक जनक ‘Soul of Italy’ म्हणून ओळखला जातो. एकोणीसाव्या शतकातील युरोपातील राष्ट्रवादी लाटेला दिशा देणारा, युवा क्रांतिकारकांना प्रेरणा देणारा आणि लोकशाही राष्ट्रराज्याच्या संकल्पनेचा अग्रदूत असा मॅझिनीचा विचार आजही जगभरातील राजकीय इतिहासाच्या अभ्यासात अत्यंत महत्त्वाचा मानला जातो.
मॅझिनीचा जन्म २२ जून १८०५ रोजी इटलीतील (त्यावेळच्या जेनोआ प्रांतातील) एक मध्यमवर्गीय, सुशिक्षित कुटुंबात झाला. वडील वैद्यकीय व्यवसायात तर आई अत्यंत धार्मिक, शिस्तप्रिय आणि देशभक्त वृत्तीची होती. तिच्या प्रभावामुळे मॅझिनीच्या मनात नैतिकता, कर्तव्यनिष्ठा आणि मानवतावाद खोलवर रुजले. जेनोआ विद्यापीठात कायद्याचे शिक्षण घेत असताना त्याच्यामध्ये स्वातंत्र्य, लोकशाही आणि राष्ट्रवाद यांचे बीज रोवले गेले. युरोपभर उमटत असलेल्या उदारमतवादी विचारांनी त्याच्यावर मोठा प्रभाव टाकला.
युवावस्थेत त्याचा ‘कार्बोनारी’ या गुप्त क्रांतिकारी संघटनेशी संबंध आला. इटलीतील परकीय सत्तेविरुद्ध आणि हुकूमशाहीविरुद्ध संघटित लढ्याची ही पहिलीच पायरी होती. राजकीय क्रियाशीलतेमुळे त्याला वारंवार अटक व छळ सहन करावा लागला. १८३१ पासून त्याचे बहुतांश आयुष्य स्वित्झर्लंड, फ्रान्स आणि इंग्लंडमध्ये निर्वासित म्हणून गेले. तथापि, या निर्वासन काळातच त्याने यंग इटली (Young Italy), नंतर यंग युरोप (Young Europe) सारख्या संघटनांना आकार दिला.