

Rainy Season Memories
esakal
व्यंकटेश उपाध्ये
सर्वात जास्त बेभान करणारा पाऊस म्हणजे हिमाचल आणि उत्तरांचलमध्ये मी १०-१२ वर्षांच्या वास्तव्यात अनुभवलेला. तिथला पाऊस म्हणजे निसर्गाचे मुक्त नर्तनच. इतका मनमोहक नजारा मी इतर कुठेच पाहिला नाही. नभ मेघांनी इतके आक्रमायचे की सकाळी आठ वाजताही गुडूप अंधार झालेला मी पाहिला आहे.
माझ्या मनात आणि स्वप्नसृष्टीतही श्रावण, भाद्रपद आणि नंतरच्या मार्गशीर्ष अन् पौष या महिन्यांना एक विशेष स्थान आहे. कारण त्यांचा उल्लेख होताच माझ्या डोळ्यांपुढून एखाद्या स्लाइड शोसारखी खूप मनमोहक चित्रे आणि आठवणी सरकू लागतात.
लहानपणाची पावसाची पहिली आठवण माझ्या आवडत्या बेळगावची. बेळगावचा पाऊस तसा फार बदनाम. एकदा सुरू झाला की तो विजय मांजरेकरच्या बॅटिंगसारखा आणि बापू नाडकर्णींच्या बॉलिंगसारखा प्रचंड नीरस असायचा. कानडीत त्या पावसाला री...री...री...री... पाऊस लागलाय असं म्हणतात. काही शब्द श्राव्यातून दृकमध्ये सहज जातात. त्यातील हा एक. तर हा पाऊस कसलीही आतषबाजी, धुवांधार फटकेबाजी न करता सतत गळायचा आणि सातत्याने अक्षरशः आठवडे आठवडे चालायचा.