

India’s First Hydrogen Train
esakal
लेखक : सुदर्शन कुडचे
भारतीय रेल्वे ही जगातील सर्वात मोठ्या रेल्वे व्यवस्थांपैकी एक असून दररोज कोट्यवधी प्रवाशांना सेवा देते. वाढते प्रदूषण, जीवाश्म इंधनावरील अवलंबित्व आणि हवामान बदलाच्या पार्श्वभूमीवर रेल्वे क्षेत्र अधिक स्वच्छ आणि पर्यावरणपूरक करण्यासाठी भारताने महत्त्वाचे पाऊल उचलले आहे. त्याचाच भाग म्हणून देशातील पहिल्या हायड्रोजनवर चालणाऱ्या रेल्वेचा उपक्रम आता प्रत्यक्षात साकार होत आहे. हरियाणातील जींद-सोनीपत मार्गावर या रेल्वेची चाचणी आणि संचालनाची तयारी पूर्ण झाली असून हा प्रकल्प भारताच्या हरित ऊर्जा प्रवासातील महत्त्वाचा टप्पा मानला जात आहे.
हायड्रोजनवर चालणाऱ्या रेल्वेमध्ये डिझेलऐवजी हायड्रोजनचा वापर करून विद्युतनिर्मिती केली जाते. या प्रक्रियेत हायड्रोजन आणि प्राणवायू यांच्या रासायनिक अभिक्रियेतून वीज तयार होते आणि त्या विजेवर रेल्वे धावते. या प्रक्रियेत धूर किंवा कार्बनयुक्त प्रदूषक बाहेर पडत नाहीत. उपउत्पादन म्हणून केवळ पाण्याची वाफ निर्माण होते. त्यामुळे ही रेल्वे पर्यावरणपूरक वाहतुकीचे प्रभावी उदाहरण मानली जाते.