

Factors Affecting Ocean Currents
esakal
लेखक : सागर रेपाळे
महासागरीय प्रवाह म्हणजे महासागरातील पाण्याची सतत, निश्चित दिशेने होणारी हालचाल होय. हे प्रवाह महासागरातील नद्यांप्रमाणे कार्य करतात आणि पृथ्वीच्या हवामानावर, सागरी परिसंस्थेवर तसेच मानवी जीवनावर महत्त्वपूर्ण परिणाम करतात.
महासागरीय प्रवाहांवर परिणाम करणारे घटक महासागरीय प्रवाहांवर प्राथमिक आणि द्वितीयक शक्तींचा प्रभाव पडतो.
प्राथमिक शक्तींमध्ये सूर्यामुळे होणारे असमान तापमान, वाऱ्यांचा दाब, गुरुत्वाकर्षण आणि कोरिओलिस बल यांचा समावेश होतो. सूर्याच्या उष्णतेमुळे विषुववृत्ताजवळील पाणी प्रसरण पावते, वारे पाण्याला विशिष्ट दिशेने ढकलतात, गुरुत्वाकर्षण पाण्याचा उतार निर्माण करते आणि कोरिओलिस बलामुळे उत्तर गोलार्धात प्रवाह उजवीकडे, तर दक्षिण गोलार्धात डावीकडे वळतात. या प्रक्रियेत महासागरात महासागरीय आवर्त (Gyres) तयार होतात.
द्वितीयक शक्तींमध्ये पाण्याचे तापमान आणि क्षारता (Salinity) यांमुळे निर्माण होणाऱ्या घनतेतील फरकाचा समावेश होतो. थंड व अधिक खारट पाणी जड असल्यामुळे खाली जाते, तर उबदार व कमी खारट पाणी वर येते. यामुळे खोल पाण्याचे प्रवाह तयार होतात.