

Rampur and Bhakaspur Village Story
esakal
लेखक : प्रवीण राऊत
एकाच डोंगराच्या पायथ्याशी वसलेली दोन गावे - 'रामपूर' आणि 'भकासपूर'. दोन्ही गावांची लोकसंख्या सारखी, जमीन सारखी आणि हवामानही सारखेच. पण आज या दोन गावांच्या प्रगतीत जमीन-अस्मानाचा फरक आहे. या फरकाचे कारण कोणतेही मोठे औद्योगिक केंद्र नसून, फक्त एक साधी गोष्ट आहे, ती 'घरोघरी मिळणारे नळाचे पाणी'. या एका सोयीसुविधेने रामपूरचा चेहरामोहरा बदलला आणि रामपूर विकसनशील गाव बनले. तर भकासपूर गावाला घरोघरी नळाचे पिण्याचे पाणी न मिळाल्याने नावाप्रमाणे भकास राहिले.
रामपूरमध्ये केवळ पिण्याच्या पाण्याची सुविधा वाढल्यामुळे येथील महिलांनी नळ फिरवला की पाणी मिळते. यामुळे महिलांचा दिवसातील किमान ४-५ तास वाचतात. या वाचलेल्या वेळेत रामपूरच्या महिलांनी 'बचत गट' स्थापन केले, शिवणकाम किंवा कुक्कुटपालन सुरू केले. घराघरात दोन पैसे जास्तीचे येऊ लागले. शुद्ध आणि प्रक्रिया केलेले नळाचे पाणी मिळाल्यामुळे येथील आरोग्याचा दर्जा सुधारला आहे. दवाखान्याचा खर्च वाचला आणि लोक अधिक कार्यक्षम झाले आहेत. पाणी भरण्याची चिंता नसल्याने येथील मुली नियमित शाळेत जातात. शिक्षणाचा दर्जा सुधारल्याने पुढची पिढी अधिक प्रगत होत आहे.
याउलट भकासपूर हे गाव नावाप्रमाणे भकास आणि मागासलेले राहिले, कारण या गावात घरोघरी नळाचे पाणी मिळत नाही. येथील महिलांचा अर्धा दिवस मैलोन्मैल चालत जाऊन पाणी आणण्यात जातो. घरातील कर्त्या महिला पाण्यासाठी वणवण करत असल्याने त्यांना कोणताही छोटा उद्योग किंवा शेतीकामात मदत करता येत नाही. परिणामी, कुटुंबाचे उत्पन्न मर्यादित राहिले आहे. विहिरीचे किंवा नदीचे उघड्यावरचे पाणी पिल्यामुळे येथे पावसाळ्यात जलजन्य आजार पाचवीला पुजलेले असतात. दवाखान्याचा खर्च आणि आजारपणामुळे बुडणारी मजुरी यामुळे गाव गरिबीच्या दुष्टचक्रात अडकले आहे. घरच्या कामात आणि पाणी भरण्यात मदत करण्यासाठी अनेक मुलींना शाळा सोडावी लागली किंवा त्या शाळेत उशिरा पोहोचतात. एकंदरीत भकासपूर सामाजिक आणि आर्थिकदृष्ट्या मागासलेला राहिला आहे.
रामपूर आणि भकासपूरमधील हा फरक केवळ पाण्याचा फरक नाही, तर तो 'विकासाच्या संधीचा' फरक आहे. पायाभूत सुविधांचा अभाव कसा एका पिढीला मागे ठेवू शकतो आणि एक छोटीशी सुविधा (नळाचे पाणी) संपूर्ण समाजाचे नशीब कशी बदलू शकते, याचे हे उत्तम उदाहरण आहे.