Small AI
Esakal
लेखिका – श्रद्धा कोळेकर
बारामतीतील ऊसशेतीत AI च्या मदतीने मिळणाऱ्या सल्ल्यामुळे काही शेतकऱ्यांच्या उसाच्या उत्पादनात ४० टक्के वाढ झाली आणि पाणी व खतांचा वापर ३० टक्क्यांनी कमी झाला. आरोग्य क्षेत्रात क्षयरोगाचं निदान करण्याचं प्रमाण ३५ टक्क्यांनी वाढल्याचा दावाही केंद्रीय इलेक्ट्रॉनिक्स व माहिती तंत्रज्ञान मंत्री अश्विनी वैष्णव यांनी केला. ८ ऑक्टोबर २०२६ रोजी नवी दिल्ली येथे जागतिक बँकेच्या World Development Report 2026: The Promise of Artificial Intelligence या अहवालाच्या भारतातील प्रकाशन कार्यक्रमात ते बोलत होते.
या उदाहरणांमधून AI चा वापर स्थानिक गरजांनुसार केल्यास शेती आणि आरोग्यासारख्या क्षेत्रांमध्ये कोणत्या संधी निर्माण होऊ शकतात, याची कल्पना येते. मात्र, AI च्या विकासासाठी प्रत्येक देशाने महागडी मॉडेल्स आणि प्रचंड डेटा सेंटर उभारणं आवश्यक आहे का? की कमी खर्चातील, विशिष्ट समस्या सोडवणारी आणि स्थानिक परिस्थितीशी जुळवून घेता येणारी AI साधनंही विकासाला चालना देऊ शकतात?
जागतिक बँकेच्या World Development Report 2026 मध्ये AI च्या माध्यमातून विकासाच्या संधी कशा वाढवता येतील, याविषयी भाष्य करण्यात आले आहे. विकसनशील देशांनी उपलब्ध AI साधनांचा वापर करणं, त्यांना स्थानिक गरजांनुसार अनुकूल बनवणं आणि स्वतःची तांत्रिक क्षमता विकसित करणं याविषयी या अहवाला मुद्दे मांडण्यात आले आहेत. या अहवालातील महत्त्वाचे निष्कर्ष, आकडेवारी आणि भारतासाठी त्यातून निर्माण होणाऱ्या संधी जाणून घेऊया.