सेरेनाने मर्यादा ओलांडली : नवरातिलोवा 

वृत्तसंस्था
Tuesday, 11 September 2018

कोचिंग चालते... 
स्टॅंडमध्ये बसलेल्या प्रशिक्षकांकडून खेळाडूंना "कोचिंग' दिले जाते, हे सर्रास घडते आणि त्यास परवानगीसुद्धा असायला हवी, असे मत नवरातिलोवा यांनी मांडले. पॅट्रिक मौरातोग्लोऊ (सेरेनाचे प्रशिक्षक) यांनी हाताने खुणा केल्या. त्यामुळे पंच रॅमोस यांनी ताकीद दिली. अशा वेळी पंच आपल्याला खोटारडी म्हणाल्याचा चुकीचा अर्थ सेरेनाने काढला. सेरेनाने प्रशिक्षकांच्या खुणा पाहिल्या का किंवा त्याचा तिला फायदा झाला का, हे मुद्दे गौण ठरतात.

न्यूयॉर्क : अमेरिकन ओपन टेनिस स्पर्धेच्या अंतिम सामन्यात सेरेना विल्यम्सने कोर्टवर वागताना मर्यादा ओलांडली. पुरुष खेळाडूंना कसेही वागले तरी चालते म्हणून महिलांनाही मोकळीक मिळावी, अशी तिची भूमिका चांगली नाही, असे परखड प्रतिपादन एक काळ गाजविलेल्या मार्टिना नवरातिलोवा यांनी केले. 

बिली जीन किंग, ख्रिस एव्हर्ट अशा काही प्रमुख माजी खेळाडूंनी सेरेनाला पाठिंबा दिला, पण नवरातिलोवा यांनी एका अग्रगण्य वृत्तपत्रात अग्रलेखच लिहिला. त्यांनी म्हटले आहे, की "हुज्जत घालणाऱ्या पुरुष खेळाडूवर रॅमोस यांनी अशीच कारवाई केली नसती, असे सेरेनाने सामन्यानंतर पत्रकार परिषदेत सांगितले. हे म्हणताना ती एक मुद्दा विसरली. आपण सगळे इतके प्रेम करतो त्या खेळाविषयी आदर ठेवून तिने वागणे जास्त योग्य ठरले असते. पुरुषांना चालते म्हणून आम्हाला का नको, असा युक्तिवाद चांगला नाही. याउलट आपण आपल्या खेळाचा आणि प्रतिस्पर्ध्याचा आदर कसा राखू शकू, हाच प्रश्‍न स्वतःला विचारायला हवा.' 

भेदभाव नष्ट व्हावा 
देदीप्यमान कारकिर्दीत 18 ग्रॅंड स्लॅम विजेतीपदे मिळविलेल्या नवरातिलोवा यांनी पुढे म्हटले आहे, ""सेरेना पुरुष खेळाडू असली असती आणि ती पंचांना चोर म्हणाली असती, तरी निभावून गेले असते का, हे जाणून घेणे अवघड आहे, पण यावर चर्चा करणे योग्यसुद्धा नाही. एकाच प्रकारच्या शिस्तभंगाबद्दल पुरुष खेळाडूंना मोकळीक मिळते, ही मात्र वस्तुस्थिती आहे. याची संपूर्ण तपासणी व्हायला हवी आणि हा भेदभाव नष्ट केला गेलाच पाहिजे.'' 

कोचिंग चालते... 
स्टॅंडमध्ये बसलेल्या प्रशिक्षकांकडून खेळाडूंना "कोचिंग' दिले जाते, हे सर्रास घडते आणि त्यास परवानगीसुद्धा असायला हवी, असे मत नवरातिलोवा यांनी मांडले. पॅट्रिक मौरातोग्लोऊ (सेरेनाचे प्रशिक्षक) यांनी हाताने खुणा केल्या. त्यामुळे पंच रॅमोस यांनी ताकीद दिली. अशा वेळी पंच आपल्याला खोटारडी म्हणाल्याचा चुकीचा अर्थ सेरेनाने काढला. सेरेनाने प्रशिक्षकांच्या खुणा पाहिल्या का किंवा त्याचा तिला फायदा झाला का, हे मुद्दे गौण ठरतात.

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Martina Navratilova criticize Serena Williams