esakal | अद्भुत! मंदिराच्या पायऱ्यांवर पाय ठेवताच ऐकू येतो ध्वनी
sakal

बोलून बातमी शोधा

airavateshwar temple

आजही जगातील अनेक धार्मिक स्थळे आश्चर्यचकीत करतात. तिथल्या वास्तूकलेचा अद्भुत नमुना पाहत रहावा असाच असतो. वास्तू रचनेमुळे निर्माण झालेलं गुढ आपल्याला चकीत करतं. भारतात एक असं मंदिर आहे ज्याच्या पायऱ्यांवर पाय ठेवताच संगीत तयार होतं.

अद्भुत! मंदिराच्या पायऱ्यांवर पाय ठेवताच ऐकू येतो ध्वनी

sakal_logo
By
ई सकाळ

चेन्नई - आजही जगातील अनेक धार्मिक स्थळे आश्चर्यचकीत करतात. तिथल्या वास्तूकलेचा अद्भुत नमुना पाहत रहावा असाच असतो. वास्तू रचनेमुळे निर्माण झालेलं गुढ आपल्याला चकीत करतं. भारतात एक असं मंदिर आहे ज्याच्या पायऱ्यांवर पाय ठेवताच संगीत तयार होतं. हे संगीत मनाला वेगळाच आनंद देऊन जातं. कोणत्याही दैवी शक्तींमुळे नाही तर मंदिराच्या वास्तुरचनेची ती कमाल आहे. तामिळनाडुत असलेल्या ऐरावत मंदिरात पायऱ्यांमधून असं संगीत ऐकायला मिळतं. बाराव्या शतकात चोल राजांनी त्यांच्या राजवटीमध्ये या मंदिराची उभारणी केली. हे मंदिर महान जीवंत चोल मंदिर म्हणून ओळखलं जातं. तसंच युनेस्कोनेसुद्धा या मंदिराला जागतिक वारसा स्थळ घोषित केलं आहे.

तामिळनाडुतील कुम्भकोणमजवळील दारासुरममध्ये हे मंदिर आहे. ऐरावतेश्वर मंदिरावर कोरण्यात आलेलं नक्षीकामसुद्धा सुबक आहे. विशेषत: तीन पायऱ्या अशा प्रकारे तयार कऱण्यात  आल्या आहेत ज्यावर थोडासा जरी वेगाने पाय ठेवला तरी वेगवेगळ्या ध्वनींचा नाद ऐकू यायला सुरुवात होते. याशिवाय मंदिराच्या अंगणात दक्षिण पश्चिम कोपऱ्यात 4 तिर्थ असलेला एक मंडपही आहे. यावर यमाची प्रतिमा सर्वांच्या नजरा वेधून घेते. तसंच मंदिरात सात आकाश देवतांच्या मुर्तीही कोरण्यात आल्या आहेत. 

भटकंती : टाहाकारीचे शिल्पसौंदर्य जगदंबा मंदिर

मंदिरातील पायऱ्यांमधून निघणाऱ्या ध्वनींच्या नादाचे गूढ अद्याप उलगडलेले नाही. गेल्या 800 वर्षांपासून अनेक संशोधकांनी याचा शोध घेण्याचा प्रयत्न केला. मंदिराची रचना, त्याचा कालखंड तसंच इतर गोष्टी तपासल्यानंतर युनेस्कोने 2004 मध्ये जागतिक वारसा स्थळांच्या यादीमध्ये मंदिराचा समावेश केला. 

भगवान शंकराचं हे मंदिर आहे. मंदिराच्या स्थापनेबाबत स्थानिकांमध्ये अनेक दंतकथाही सांगितल्या जातात. त्यानुसार देवांचा राजा इंद्राच्या पांढऱ्या हत्तीने या ठिकाणी भगवान शंकराची पुजा केली होती. यामुळेच या मंदिराचे नाव ऐरावतेश्वर असं पडलं आहे. याशिवाय असाही उल्लेख आढळतो की, मृत्यू देवता यमाला एका ऋषीने शाप दिला होता. त्यामुळे त्याच्या अंगाची लाही लाही होत असे. यानंतर तो या मंदिरात आला आणि परिसरातील पवित्र पाण्याने अंघोळ करून भोलेनाथाची पूजा केली. यानंतर यमाची पीडा दूर झाली. म्हणूनच मंदिरात यमाची प्रतिमाही दिसते. 

वीकेंड भटकंती : प्रशस्त आवाराचे ‘गोंदेश्‍वर मंदिर’

ऐरावतेश्वर मंदिराचे खांब 80 फूट उंच आहे. त्यावर दगडांमध्ये सुंदर अशी नक्षी कोरण्यात आली आहे. मंदिराचे दोन वेगवेगळे भाग आहेत. यातील पहिल्या भागात मोठा दगडी रथ आहे. हा रथ घोडे ओढत असल्याचं दाखवण्यात आलं आहे. तर दुसऱ्या भागात बळी देण्यासाठी व्यवस्था करण्यात आली होती. त्यामुळे याला बलीपीठ असंही म्हटलं जातं.