esakal | भटकंती : मनमोहक गणपतीपुळे 
sakal

बोलून बातमी शोधा

Ganpatipule

कसे जाल? 
पुण्याहून सातारा, कऱ्हाड, मलकापूर, साखरपामार्गे ३२५ किलोमीटर. ताम्हणी किंवा वरंध घाटमार्गेही जाता येईल. मुंबईहून कोलाड, महाड, चिपळूणमार्गे ३३८ किलोमीटर. 

मुक्काम करू शकता
गणपतीपुळ्यात गणेश मंदिराचं भक्तनिवास आहे. त्याशिवाय अनेक हॉटेलही आहेत. होम स्टे सुविधाही मिळू शकते.

भटकंती : मनमोहक गणपतीपुळे 

sakal_logo
By
सकाळवृत्तसेवा

गणेश ही देवता भरतवर्षाचं आराध्य दैवत आहे. पुढील आठवड्यात गणरायाचे आगमन होत आहे. या निमित्ताने आपण गणपतीपुळेची सफर करणार आहोत. प्राचीन काळात या गणपतीपचा उल्लेख पश्‍चिमद्वार देवता, असा करण्यात आला आहे. भारताच्या आठ दिशांना आठ द्वारदेवता आहेत. त्यापैकी पुळ्याचा स्वयंभू गणेश ही एक आहे. त्याकाळी गणेशाच्या या स्वयंभू स्थानाची महती सर्वत्र पसरली. छत्रपती शिवाजी महाराजांच्या अष्टप्रथानांमधले सचिव अण्णाजी दत्तो यांनी केंबळी म्हणजे गवती छपराच्या जागा सुंदरसा घुमट बांधला.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

काही काळानं पेशव्यांचे सरदार गोविंदपंत बुंदेले यांनी देवालयाचा सभामंडप बांधला. कोल्हापूर संस्थानाचे कारभारी माधवराव वासुदेव बर्वे यांनी सोन्याचा मुलामा दिलेला घुमटाकार कळस चढवला. श्रीमंत माधवराव पेशव्यांनी नंदादीपाची व्यवस्था केली, तर माधवरावांच्या पत्नी रमाबाई यांनी दगडी धर्मशाळा बांधली. सध्याच्या मंदिराचं बांधकाम १९९८ ते २००३ या काळात झालं. प्राचीन भारतीय स्थापत्यकलेनुसार हे मंदिर बांधण्यात आलं. त्यासाठी आग्ऱ्याहून खास लाल रंगाचा दगड आणण्यात आला.

मंदिराच्या दक्षिण आणि उत्तरेला प्रत्येकी पाच त्रिपुरं आहेत. त्रिपुरी पौर्णिमेला त्यावरचे दिवे, आसमंत झगमगवून टाकतात. प्रत्येक वर्षी नोव्हेंबर आणि फेब्रुवारी या महिन्यांमध्ये सूर्यास्तसमयी सूर्याची किरणं थेट स्वयंभू गणेशाचं दर्शन घेतात. वर्षभर इथं भाविकांची गर्दी असते. किनारपट्टीच्या या प्रदेशात इतरही अनेक प्रेक्षणीय स्थळं आहेत.

गणपतीपुळ्याहून अवघ्या साडेचार किलोमीटरवरचं मालगुंड, हे आधुनिक मराठी कवितेचे जनक कविवर्य केशवसुत (कृष्णाजी केशव दामले) यांचं जन्मस्थान. कोकण मराठी साहित्य परिषदेच्या पुढाकारानं त्यांच्या राहत्या घराचं स्मारकात रूपांतर करण्यात आलं आहे. मालगुंडपासून एक किलोमीटरवर ओंकारेश्‍वराचं हेमाडपंती पद्धतीचं मंदिर आहे. गणपतीपुळ्याहून सुमारे २० किलोमीटरवर जयगडचा किल्ला आहे. किल्ल्याच्या मुख्य प्रवेशद्वारापर्यंत वाहनं जाऊ शकतात. किल्ल्यात गणेशाचं मंदिर आहे. हा किल्ला विजयपूरच्या (विजापूर) आदिलशाहनं बांधला होता. संगमेश्‍वराच्या नाईक यांनी तो जिंकून घेतला. विजापूरकरांनी दोन वेळा तो पुन्हा ताब्यात घेण्याचाच अयशस्वी प्रयत्न केला. ब्रिटिश राजवटीत तो त्यांच्या ताब्यात गेला. किल्ल्याच्या डाव्या बाजूचा रस्ता कऱ्हाटेश्‍वर मंदिर आणि दीपस्तंभाकडं जातो. बांधीव पायऱ्या उतरून या मंदिरात जाता येतं. मंदिराच्या जीर्णोद्धारात शंकराची पिंडी सापडली होती. जयगडहून १८ किलोमीटरवर कोळीसरे इथं लक्ष्मीकेशव मंदिर आहे. कोळीसरेहून ३२ किलोमीटरवर हेदवी हे टुमदार गाव वसलंय. हेदवीचा शांत, स्वच्छ आणि प्रदूषणमुक्त किनारा पर्यटक आणि भाविकांना नेहमीच आकर्षित करतो. इथून ५ किलोमीटरवर वेळणेश्‍वराचं मंदिर आहे.

Edited By - Prashant Patil