पर्यटकांना आनंद देण्यासाठी सज्ज होतोय!

Tourism-Day
Tourism-Day

पर्यटकांच्या विश्वासाचा, अडचणीच्या वेळी मागे खंबीरपणे उभा राहणारा ट्रॅव्हल एजंट तुटणार नाही, मोडणार नाही, याही परिस्थितीतून टुरिझम इंडस्ट्री सावरेल, पर्यटकांना निखळ आनंद देण्यासाठी आणि त्यांच्या स्वप्नवत सहलींसाठी आम्ही सज्ज होऊच याच विश्वासावर आणि ध्येयावर आम्ही ठाम होतो आणि आहोत. 

कोरोनाचे काळे ढग २०२०च्या सुरुवातीला जमायला लागले व फेब्रुवारीपर्यंत संपूर्ण जग व्यापत पर्यटनाच्या सिझनवर अंधार दाटत गेला. रोज एक नवीन देश कोरोना महामारीच्या संकटात ओढला गेला. पर्यटकांनी पाहिलेल्या स्वप्नांची, केलेल्या सहलीच्या नियोजनांची अक्षरशः माती झाली, तीच परिस्थिती पर्यटक व्यावसायिकांची देखील झाली. पर्यटकांसाठी एक एक देश एन्ट्री बंद करत गेला. २२ मार्चपासून भारतात संपूर्णपणे लॉकडाउन करण्यात आले. त्यानंतर ऑफिसमध्ये जाता येत नव्हते ना कॅन्सलेशनच्या फॉर्मलिटी पूर्ण करता येत होत्या. पर्यटकांचे फोन मात्र चालू झाले होते. लॉकडाउन कधी संपेल, सहल जाणार की नाही, पैसे परत मिळतील का, संपूर्ण परतावा कसा मिळेल या त्यांच्या प्रश्नांचे उत्तर कोणाकडेच नव्हते. सिझनचे झालेले नुकसान आणि व्यवसायाबद्दलचे मोठे प्रश्नचिन्हच उभे राहिले होते...  

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

चिंता आता आभाळाएवढी मोठी होत होती. पर्यटकांचे हॉटेल, ट्रान्सपोर्टर्सना पाठवलेले पैसे, व्हिसासाठीच्या अपॉईंटमेंट्स, ट्रॅव्हल इन्शुरन्स आणि टॅक्स भरून उभ्या असलेल्या टुरिस्ट गाड्या या सगळ्यांच्या विचाराने ट्रॅव्हल एजंटचे डोके चक्रावून गेले नसते तरच नवल. सरकारनेही कामगारांना पगार देणे आणि भाडेतत्त्वावर असलेल्या दुकानांना भाडे देणे बंधनकारक केले आणि ट्रॅव्हल एजंटचे कंबरडेच मोडले. ट्रॅव्हल एजन्ट असोशिएशन पुणे, सारख्या काही मंडळींनी कंबर कसली आणि मिळालेल्या वेळचे नियोजन आणि आपल्या एजंटना अडचणीच्या वेळी खंबीर कसे ठेवता येईल हा विचार करून तब्बल २५ दिवस वेगवेगळे ऑनलाइन सेशन घेत ट्रॅव्हल एजंटना बिझी ठेवत त्यांची मानसिकता खालावू होऊ नये म्हणून प्रयत्न केले. या परिस्थितीत  मोर्चे काढून सरकारसमोर अडचणी तयार करण्याचे आडमुठे धोरण स्वीकारून थोडेच चालणार होते? हीच जाणीव एक असोसिएशन म्हणून TAAP दाखवून देत होती.

जून-जुलैपासून परिस्थिती सुधारेल असे वाटत होते, पण सरकारकडून आलेले पॅकेज निराशा करून गेले व वित्तीय संस्थानीही ट्रॅव्हल एजंटकडे पाठच फिरवली. प्रोफेशनल असूनही एम.एस.एम. ई. मध्ये ट्रॅव्हल एजंटला सरकारकडून प्रोफेशनल म्हणून दर्जा मिळालाच नाही. गेल्या ३० वर्षांत अशी अनेक संकटे आली-गेली आणि पचवलीसुद्धा, मात्र गेल्या ७ महिन्यांत रौद्ररूप धारण केलेल्या कोरोनाने ट्रॅव्हल एजंट स्ट्रीमला व्यवसायाच्या सुरुवातीला आणून ठेवले आहे. सरकार पर्यटन व्यवसायाकडे सर्वांत शेवटी लक्ष देणार हे ध्यानात घेऊन मदतीची वाट न बघता एक व्यावसायिक म्हणून आपला आणि कुटुंबाचा उदरनिर्वाह चालू ठेवण्याकरिता आम्ही इतर निरनिराळे छोटे-मोठे व्यवसाय केले. 

पर्यटन व्यवसाय सुरू होईपर्यंत एक उत्तम उद्योजक म्हणून पर्यटक व्यावसायिकांनी ही लढाई सुरूच ठेवली आणि मूळ व्यवसाय नसतानाही ती यशस्वी करून दाखवली. तुमच्या विश्वासाचा, अडचणीच्या वेळी तुमच्या मागे खंबीरपणे उभा राहणारा ट्रॅव्हल एजंट तुटणार नाही, मोडणार नाही, याही परिस्थितीतून टुरिझम इंडस्ट्री सावरेल, पर्यटकांना निखळ आनंद देण्यासाठी आणि त्यांच्या स्वप्नवत सहलींसाठी आम्ही सज्ज होऊच याच विश्वासावर आणि ध्येयावर आम्ही ठाम होतो आणि आहोत. 

येत्या काळात पर्यटकांची उत्तम प्रकारे काळजी घेण्याचे शिवधनुष्य पेलण्याकरिता ट्रॅव्हल एजंट असोशिएशन, पुणेचे सभासद कंबर कसून तयार झाले आहेत. आम्ही सेफ्टी, सिक्युरिटी आणि रिलायबिलिटी यांची सांगड घालत, पर्यटकांची आवड-निवड जोपासत आणि सध्याच्या परिस्थितीतून सक्षमरित्या मार्ग काढत, उत्तम पर्यटनस्थळे उपलब्ध करून देत TAAPच्या सभासद पर्यटकांकरिता आपली सेवा सुरू करीत आहेत. या सेवांमध्ये प्रामुख्याने ‘वंदे भारत मिशन’अंतर्गत आंतरदेशीय विमान प्रवास, त्यासाठीची तिकिटांची सेवा, देशांतर्गत टुरिझम बोर्डाच्या निवास सेवा, तसेच सुरक्षित निवास व्यवस्था, पावसाळी पर्यटन (अधिनियम पाळून), पासपोर्ट सुविधा, कार रेंटल सर्विसेस, सरकारकडून ठरवून दिलेल्या सूचना पाळून पर्यटन क्षेत्रातील काही सेवा या पहिल्या टप्प्यात ट्रॅव्हल असोशिएशनचे सभासद आपल्या सर्व पर्यटकांकरिता सुरू करीत आहेत. लवकरच देशांतर्गत आणि परदेशी पर्यटनासंदर्भातील निर्णयानुसार इतरही सेवा सुरू करण्याचा आमचा मानस आहे. 

लॉकडाउनमुळे कंटाळलेल्या वातावरणातून निसर्गाच्या सानिध्यात फिरून येणे आणि थोडे रिलॅक्स होणे ही पर्यटकांची गरज आहे. त्यांची बदललेली मानसिकता लक्षात घेऊन गोवा, मध्य प्रदेश,  गुजरात, कर्नाटक, राजस्थान, हिमाचल प्रदेश, उत्तराखंड राज्यांमधली पर्यटनाची ठिकाणे पर्यटकांकरिता उपलब्ध करून देत आहोत. लवकरच मालदीव, लक्षद्वीप, अंदमान, तसेच पर्यटकांचे लाडके काश्मीर आणि केरळ पर्यटन सुरू करण्यासाठी आम्ही पर्यटन व्यावसायिक कामाला लागलो आहोत. 

सोबतच महाराष्ट्राच्या कोकण किनाऱ्यांसोबत ताडोबा-नागझरी, पेंच-कान्हासारख्या जंगल सफारी पर्यटकांना उपलब्ध होण्यासाठी प्रयत्न करीत आहोत. 

सर्वांना जागतिक पर्यटन दिनाच्या हार्दीक शुभेच्छा. 

कोरोनानंतरच्या काळात पुन्हा स्थिती सर्वसाधारण येण्यासाठी काही गोष्टी पाळाव्या लागतील. मोठ्या ग्रुपऐवजी लोक छोट्या संख्येने देशांतर्गत पर्यटनाला जाणे पसंत करतील. ठिकाणे बदलतील. प्रवासाचा लोकांचा कल बदलेल. आंतरराष्ट्रीय सीमा कधी खुल्या होतील, याबाबत अजून काही स्पष्टता आलेली नाही. 
- झेलम चौबळ, केसरी टुर्स

कोरोना बाधितांचे आकडे दिवसेंदिवस वाढत चालले आहेत. लोकांच्या मनात भिती आहे. सगळ्या गोष्टी कधी सुरळीत होतील, हे सरकारलाही सांगता येत नाही. त्यामुळे अनिश्‍चिततेचे वातावरण आहे. आंतरराष्ट्रीय पर्यटनास मार्च २०२१पासून काही प्रमाणत सुरवात होईल, असे वाटते. पुढे टप्प्याटप्प्याने गोष्टी सुरळीत होतील. 
- मिलिंद बाबर, मॅंगो हॉलिडेज

पर्यटन ही लोकांची आता गरज झालेली आहे. लोक कोरोनावर लस येण्याची वाट पाहात आहेत. आगामी काळात ग्रुपने नव्हे, तर स्वतंत्रपणे पर्यटनाचा आनंद लोक घेतील. दसरा दिवाळीपासून साहसी पर्यटन गती घेईल, असे वाटते. सरकारने टूरिझम उद्योगासाठी सवलतीची ऑफर काढावी. शनिवार रविवार अशा सलग सुट्या देता आल्या तर त्याचा उपयोग होईल. 
- अखिलेश जोशी, गिरीकंद ट्रॅव्हल्स 

केंद्र सरकारने कोरोनाकाळात विविध उपाययोजनांसाठी जाहीर केलेल्या २० लाख कोटींच्या पॅकेजमध्ये पर्यटन उद्योगासाठी काहीही तरतूद नव्हती. देशात सुमारे साडे तीन कोटी लोक या उद्योगाशी संबंधित आहेत. हा उद्योग सध्या अनेक संकटांचा सामना करीत आहे. अनलॉकपूर्वीच्या बुकींगचे विमान कंपन्यांकडे अडकलेले पैसे संबंधित ट्रॅव्हल कंपनीला देण्यासाठी सरकारने मध्यस्थी करावी. 
- कॅप्टन नीलेश गायकवाड, कॅप्टन नीलेश हॉलिडेज

Edited By - Prashant Patil

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com