Video : जावळीतील पांडवकालीन मरडेश्वर शिवलिंग

संदीप गाडवे
Monday, 17 August 2020

नाविन्याची चाहूल म्हणजे श्रावण. श्रावणात आपल्या संस्कृती, परंपरा, सण उत्सव यांची अगदी रेलचेल असते. वातावरणात थंडावा आलेला असतो. जिथे पाहावे, तिथे धरणी माता नवचैतन्याने न्हाऊन निघत असते. नदी, नाले, तलाव दुथडी भरून वाहत असतात. पाण्याची अल्लड धाव मनमोहून टाकणारी असते. प्राणी, पक्षी अवनीच्या या नवरुपामुळे आनंदी झालेले असतात. पावसाच्या शिडकाव्यामुळे हिरवाईची चादर पसरलेली असते. यांसारखी अनेक वैशिष्ट्ये श्रावणाची सांगता येतील. याशिवाय महादेव शिवशंकरालाही हा महिना अत्यंत प्रिय असल्याचे सांगितले जाते.

केळघर (जि.सातारा) : सातारा जिल्ह्यातील जावळी तालुक्‍यात भटकंतीसाठी प्रसिद्ध अशी भरपूर ठिकाण आहेत. अशाच ठिकाणांपैकी थोडेसे अपरिचित ठिकाण म्हणजे मरडेश्वर शिवलिंग. पूरातन काळात पांडव जेव्हा अज्ञातवसात होते तेव्हा या शिवलिंगाची निर्मिती झाली अशी आख्यायिका आहे. समुद्र सपाटीपासून अंदाजे 900 ते एक हजार मीटर उंचीवर हे ठिकाण आहे.

पाच एकर सपाट भूभाग असलेल्या या पठारावर बरोबर मध्यभागी अर्धवट बांधणीच्या मंदिरात शिवलिंगाची स्थापना आहे. मरडेश्वर शिवलिंगाच्या समोर दोन नंदी आहेत. तसेच बाजूला दोन शिवलिंग आहे. मुख्य शिवलिंगाच्या समोर एक चौकोणी विहीर आहे. सध्या ही विहिर गाळ मातीने भरलेली आहे. पूर्वी या विहिरीत 12 महिने पाणी असायचे. लोक त्याचा वापर पिण्यासाठी करीत असे ज्येष्ठ नागरिक सांगतात. काळाच्या ओघात विहिर गाळाने भरली आहे.

ऐतिहासिक, पौराणिक कथांशी जोडलेलं एक रम्य ठिकाण शिखर शिंगणापूर!

या पठारावरून पाठीमागे वेण्णा नदी कण्हेर धरण, कास पठार,सातारा शहर, किल्ले अजिंक्‍यतारा, किल्ले सज्जनगड, क्षेत्र मेरुलिंग, किल्ले चंदन वंदन, किल्ले वैराटगड, किल्ले पांडवगड, मांढरदेवी, कमळगड , पाचगणी हा परिसर न्याहाळता येतो. याच पठाराच्या बाजूला जोडगळीत पंचक्रोशीत एकूण चार पठार भूभाग आहेत. पंचक्रोशीतील लोक त्यांना सडा या नावांनी ओळखतात. पूर्वेला 15 मिनिटांच्या अंतरावर तळवीचा सडा आहे. ह्या पठारावर एक छोटा तलाव देखील आहे. तसेच या सड्याच्या जांभ्या दगडाच्या कातळात निसर्ग निर्मित गुहा आहेत. त्यांना गावकरी वाघबीळ या नावाने ओळखतात.

पांडवकालीन मेरुलिंग; मंदिराच्या गाभाऱ्यात उमटताे तुमचा प्रतिध्वनी

पांडवकालीन महादेवाचे मंदिर ऐतिहासिक असून येथे श्रावण महिन्यात विशेषतः सोमवारी भाविकांची गर्दी असते.मरडेश्वर हे ऐतिहासिक शिव मंदिर असून हे जागृत देवस्थान असल्याचे ग्रामस्थ सांगतात. या मंदिराचा जिर्णोद्धार करण्यासाठी प्रयत्न सुरु आहेत. 

कसे पोहचाल

मरडेश्वरला पोचण्यासाठी मेढा पाचवड मार्गावर मेढा घाट चढूनवरच्या बाजूस मालदेवखिंड लागते. उजव्या हाताला मालदेव मंदिराच्या पाठीमागून मरडेश्वर पंचक्रोशी फाटा आहे. तिथून 10 किलोमीटरचा मार्ग थोडा घाटमार्ग चढून गेलात की पहिले पदुमलेमुरा हे गाव लागत. त्यानंतर धनगरवाडी, शेडगेवाडी, रेंडीमुरा फाटा, कुंभारगणी फाटा लागतो.

डोंगराच्या कुशीतील यवतेश्वर; यादवकालीन श्री शंभू महादेव मंदिर

त्यानंतर मरडमुरे या गावचा मार्ग धरून पुढे मार्गस्थ व्हावे (शेडगेवाडी ते मरडमुरे हा मार्ग सध्या कच्चा आहे लवकरच तो डांबरमार्ग होईल). पुढे आल्यावर हिरवेवस्ती लागते. तिथे तुम्ही वाहन उभे करु शकता. त्यानंतर तुमच्या समोर दिसते त्या टेकडीच्या पठारावर मरडेश्वराचे शिवलिंग आहे. दहा मिनिटांत तुम्ही या टेकडीच्या पठारावर पोहचता.

Edited By : Siddharth Latkar


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Satara Article About Mardeshwar Lord Shiva Temple In Jawali