भटकंती : अलिबाग - साद घालती समुद्रकिनारे!

Alibag
Alibag

पर्यटनाला काही प्रमाणात आता सुरुवात झाली आहे. सहा-सात महिने घरात बसून काढल्याने सर्वांनाच बाहेर फिरायचे वेध लागले आहेत. साहजिकच, वीकएण्डला जाऊन येण्यासारख्या पर्यटनस्थळांचा शोध सुरू झाला आहे. यामध्ये सर्वांत आधी नाव येते कोकणचा समुद्रकिनारा. त्यातही अलिबागला प्राधान्य दिले जाते. अलिबाग म्हटल्याबरोबर आपल्या डोळ्यांसमोर उभा राहतो तो शांत, सुंदर, स्वच्छ समुद्रकिनारा; त्यातून फेसाळणाऱ्या लाटा आणि नितांत सुंदर निसर्ग. अलिबागचे हे रूप पाहण्यासाठी, अनुभवण्यासाठी आपण सर्वजण कधीही तयार असतो. 

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

अलिबाग हे शहर सतराव्या शतकात मराठा साम्राज्याचे सेनापती सरखेल कान्होजी आंग्रे यांनी वसविले. रायगड जिल्ह्याचे पूर्वीचे नाव कुलाबा जिल्हा होते. आत्ताचा रामनाथ परिसर हे तेव्हाचे मुख्य गाव होते. रेवदंडा, चौल, नागाव, अक्षी, वरसोली, थळ, किहीम आणि आवास ही गावे त्या वेळी अष्टागरे म्हणून ओळखली जात. अलिबागच्या समुद्रकिनाऱ्याशिवाय किहीम, नवगाव, थळ, वरसोली, अक्षी, नागाव, आवास, सासवणे, रेवस, चौल, मांडवा, काशीद आणि कोरलई हे समुद्रकिनारेसुद्धा जवळच्या परिसरात आहेत.

याशिवाय कुलाबा किल्ला, कनकेश्वर मंदिर, खांदेरी, उंदेरी, चौल, गणेश मंदिर (बिर्ला मंदिर), कान्होजी आंग्रे समाधी, उमा-महेश्वर मंदिर, बालाजी मंदिर, दत्त मंदिर, हिंगुलजा मंदिर, शितळादेवी मंदिर, चुंबकीय वेधशाळा, कोरलई किल्ला ही काही मुख्य प्रेक्षणीय स्थळे अलिबाग आणि आजूबाजूच्या परिसरात आहेत. याबरोबर मराठी भाषेतील पहिला मानला जाणारा शिलालेख अक्षी गावात आहे. 

सासवणे येथील करमरकर शिल्पालयात अतिशय सुबक व मूर्त शिल्पे आहेत. अलिबागला ‘मिनी गोवा’ म्हणूनही ओळखले जाते. अलिबाग समुद्रकिनाऱ्याबरोबर सीफूडसाठी प्रसिद्ध आहे.

कसे जायचे?
रस्ता मार्ग :

  • अलिबाग मुंबईपासून दक्षिणेला ७८ आणि पेणपासून ३० किलोमीटर अंतरावर आहे. 
  • मुंबईहून अलिबागला मुंबई-गोवा या प्रमुख मार्गाने जाता येते. या मार्गावर असलेल्या वडखळ या ठिकाणापासून पुढे अलिबागला जाण्यासाठी मार्ग आहे. हे अंतर मुंबईपासून १०८ किलोमीटर आहे.
  • पुणे ते अलिबाग अंतर १७० किलोमीटर असून ताम्हिणी घाटमार्गे जाता येते. या घाटातील निसर्गसौंदर्य अनुभवण्यासारखे आहे.

लोहमार्ग : 
पेण हे अलिबागजवळचे रेल्वे स्थानक आहे.

फेरी बोट : 
मांडवा हे जवळचे बंदर असून तेथून फेरी बोटीने मुंबईच्या गेट वे ऑफ इंडियाला जाता येते. दुसरे जवळचे बंदर रेवस हे आहे. सकाळी ६.०० ते संध्याकाळी ६.०० वाजेपर्यंत ही फेरी उपलब्ध असते. बोटीच्या प्रकाराप्रमाणे मांडवा ते मुंबई प्रवासाला ४० ते ५५ मिनिटे वेळ लागतो. (फेरी बोट सुरू झाली की नाही, याची मात्र खात्री करून घ्यावी.)

Edited By - Prashant Patil

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com