esakal | शमीच्या वृक्षातून निघाले ‘शमी विघ्नेश’; चला पर्यटनाला
sakal

बोलून बातमी शोधा

शमीच्या वृक्षातून निघाले ‘शमी विघ्नेश’; चला पर्यटनाला

शमीच्या वृक्षातून निघाले ‘शमी विघ्नेश’; चला पर्यटनाला

sakal_logo
By
नीलेश डाखोरे

नागपूर : आदासा हे महाराष्ट्रातील नागपूर जिल्ह्यातील सावनेर तालुक्यातील एक गाव आहे. हे गाव तेथील गणेशमंदिरामुळे नावाजलेले आहे. नागपूर शहरापासून आदासा मंदिर नागपूर ते कळमेश्वर महामार्गावर असून, अंदाजे ४० किमी अंतरावर आहे. नागपूर-छिंदवाडा लोहमार्गावर पाटणसावंगी या स्थानकापासून १२ कि.मी. अंतरावर आदासा हे क्षेत्र आहे. एका उंच टेकडीवर हे पुरातन गणेश मंदिर आहे. विदर्भाच्या प्रसिद्ध देवस्थानातील दर्शनासाठी राज्याच्या कानाकोपऱ्यातून गणेश भक्त येत असल्याने येथे दर्शनासाठी रांगा लागतात.

येथील मूर्ती नृत्यगणेशाची आहे, असे अभ्यासक सांगतात. ही गणेशमूर्ती उजव्या सोंडेची आहे. महापाप, संकष्ट आणि शत्रू या तीन दानवांनी जगाला त्राही त्राही करून सोडले होते. या दानवांच्या तावडीतून सुटका करून घेण्यासाठी सर्व देवांनी शंकर-पार्वतीरूपी असलेल्या शमीच्या वृक्षाखाली गणेशाची आराधना केली. तेव्हा त्या वृक्षाच्या मुळापासून शमी विघ्नेश प्रकट झाले आणि त्यांनी तिन्ही दानवांचा संहार केला. ज्या स्थळी ही कथा घडली त्या ठिकाणी मुदगल ऋषींनी गणेशमूर्तीची स्थान केली. तेच हे ‘अदोष क्षेत्र’. गणेशाच्या २१ स्थानांपकी हे एक जागृत गणेश स्थान आहे. येथे माघ शुद्ध चतुर्थीला मोठा उत्सव असतो.

हेही वाचा: शेगाव : श्रींचा १११ वा ऋषीपंचमी सोहळा होणार भक्तांविनाच

विदर्भातील अष्टविनायकांपैकी हे स्थान प्रथम क्रमांकावर

टेकडीवरील गणेश मंदिरात असलेल्या गणपतीच्या मूर्तीला ‘शमी विघ्नेश’ म्हणतात. महाराष्ट्रातील सर्वांत उंच गणेशमूर्ती आहे. मूर्ती जवळपास ६ मीटर उंच आहे. या मंदिराचे बांधकाम हेमाडपंती वाटते. येथील शंकराच्या मंदिरात असलेली पिंड दक्षिणाभिमुख आहे. इतर पिंडी उत्तराभिमुख असतात. गणेश पुराणात वर्णन केलेल्या मूर्तींपैकी ही एक आहे. येथील गणपतीची सोंड उजवीकडे वळलेली आहे.

गणपती ‘शमी विघ्नेश वक्रतुंड’ नावाने प्रसिद्ध

आदासा हे क्षेत्र अतिप्राचीन आहे. या क्षेत्राची महिमा वामन पुराणात आढळून येते. येथील गणपतीची प्रतिमा ही प्राचीन असून वामनाने ही मूर्ती स्थापित केल्याचा उल्लेख वामन पुराणात दिसून येतो. येथील गणपती हा ‘शमी विघ्नेश वक्रतुंड गणपती’ नावाने प्रसिद्ध आहे. मंदिर टेकडीवर वसलेले असल्याने तेथून आजूबाजूचा परिसर नयनरम्य दिसतो. मंदिरात गणेशाची देखणी अशी भव्य स्वयंभू मूर्ती आहे.

हेही वाचा: शेगाव : श्रींचा १११ वा ऋषीपंचमी सोहळा होणार भक्तांविनाच

बारा फूट उंच व सहा फूट रुंद जागृत गणेश मूर्ती

विदर्भातील आठ महत्त्वाच्या क्षेत्रातील श्री गणेशाच्या मंदिराच्या संचाला अष्टविनायक म्हटले जाते. आदासा हे त्या अष्टविनायकातील शमीविघ्नेश गणपती देवस्थान म्हणून ओळखले जाते. येथील गाभाऱ्यातील बारा फूट उंच व सहा फूट रुंद असलेली जागृत गणेश मूर्ती असल्याचे परिसरातील गणेश भक्त सांगतात.

पर्यटन स्थळ म्हणून घोषित

मंदिर समितीने केलेल्या नियोजनबद्ध सोयीसुविधा व जवळपास अकरा एकर क्षेत्रातील मनमोहक व निसर्गरम्य परिसरामुळे हे ठिकाण पर्यटन स्थळ घोषित झाले आहे. सुट्टीच्या दिवशी पर्यटकांची नेहमीच वर्दळ असते. यातून हॉटेल, पूजेचे साहित्य विक्री दुकाने, इतर वस्तूंच्या विक्रीची दुकाने तसेच देखरेखीसाठी कार्यरत कर्मचारी असा अनेकांना रोजगार मिळाला आहे.

loading image
go to top