Datt Jayanti 2022 : कुरूगुड्डीच्या बेटावर श्री टेंबेस्वामींना झाला ‘दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा’ मंत्राचा साक्षात्कार! | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Datta Mandir Kuravpur

Datt Jayanti 2022 : कुरूगुड्डीच्या बेटावर श्री टेंबेस्वामींना झाला ‘दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा’ मंत्राचा साक्षात्कार!

कर्नाटकमधील रायचूर या जिल्ह्यात कुरवपूर हे दत्त महाराजांचे तिर्थक्षेत्र आहे. कृष्णा नदी विभागून तयार झालेल्या एका बेटावर हे मंदिर आहे. या क्षेत्राच्या चोहोबाजूनी पाणी आहे. या क्षेत्री दत्त महाराजांनी १४ वर्षे वास्तव्य केल्याचा उल्लेख पुराणात आढळतो. श्री वासुदेवानंद सरस्वती(टेंबेस्वामी) यांना याच ठिकाणी ‘दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा’ या अठरा अक्षरी मंत्राचा साक्षात्कार झाला.

कुरवपूर क्षेत्र स्वातंत्र्यापूर्वी निजाम राज्यात होते. सध्या ते कर्नाटकात रायचूर जिल्ह्यात येते. कुरूगुड्डी या छोट्या खेडयाजवळ कृष्णा नदीचे नैसर्गिकरीत्या दोन भाग झाले आहेत व पुढे ते दोन भाग एकत्र आले आहेत. जेथे कृष्णेचे दोन भागात विभाजन झाले आहे त्या भागाला ‘कुरगुड्डी बेट’ म्हणतात. 

श्रीक्षेत्र कुरवपूर हे एक प्राचीन दत्तक्षेत्र आहे. श्रीपाद श्रीवल्लभ हा दत्तात्रेयांचा प्रथम अवतार असे मानले जाते. त्यांचा जन्म आंध्र प्रदेशामध्ये पीठापूर येथे झाला. वयाची सोळा वर्षे झाल्यानंतर ते पीठापूर येथून निघाले. संपूर्ण भारतभर भ्रमण करून ते कुरवपूर या ठिकाणी आले.

हेही वाचा: श्रीमद्‌भगवद्‌गीता- शरीर आणि मनात स्फुल्लिंग पेटवणारा 'प्रोग्रॅम'

कुरवपूर अथवा कुरुगड्डी हे रायचूर तालुक्यांतील एक खेडे कर्नाटक आणि आंध्र राज्यांच्या सीमा भागांत ज्या ठिकाणी कृष्णा-भीमा नद्यांचा संगम झाला आहे. तेथे एका बेटावर आहे. या बेटाच्या जवळ कृष्णा नदीच्या प्रवाहांत आणखी काही बेटे आहेत. येथे श्रीपाद श्रीवल्लभांच्या पादुका असून टेंबेस्वामींची गुहा आहे. या गुहेमध्ये श्रीधर स्वामींनीदेखील वास्तव्य केले होते. मुख्य मंदिरामध्ये श्री दत्तगुरुंच्या पादुका तसेच पूर्णाकृती मूर्ती आहे. त्यासोबत आपण दत्तगुरूंच्या पालखीचे दर्शन घेऊ शकता. रायचूरपासून २९ कि. मीटरवरील ‘आतकूर’ या गावी जाऊन तेथून कुरवपूर बेटावर जाण्यासाठी थोडे चालत कृष्णेच्या काठावर जावे लागते. पलीकडे जाण्यासाठी आता नावेची सोय झाली आहे.

हेही वाचा: Devendra Fadanvis: स्वत: स्टेअरिंग हातात घेत समृद्धी महामार्गाची फडणवीस यांनी घेतली दखल

कुरवपूरात काय पहाल

श्रीपाद मंदिर

श्रींचे मंदिराचा परीसर मोठा आहे. अनेक प्रकारचे वृक्ष तिथे आहेत.मंदिराच्या प्रवेशद्वारावर मोठी कमान आहे. कमानीतून आत गेल्यावर पिंपळ, कडुनिंब हे मोठे वृक्ष असून त्यांना दगडी पार बांधला आहे. या पारावर दक्षिणाभिमुख दोन मंदिरे असून, एका मंदिरात दक्षिणाभिमुख काळ्या शाळिग्राम शिळेची मारूतीची रेखीव मूर्ती आहे व दुसऱ्या मंदिरात केशवमूर्ती आणि शिवलिंग पादुका आहेत. या पारासमोरच मुख्य पूजास्थान असून, तेथेच श्रीपाद श्रीवल्लभ जप-तप-अनुष्ठानादी कर्मे करत असत. यालाच ‘निर्गुण पीठ’ म्हणतात.

पुरातन वटवृक्ष

श्रीपाद वल्लभांच्या या मंदिरात एक पुरातन वटवृक्ष आहे. तो साधारणपणे ९०० वर्षांपूर्वीचा असल्याचे सांगितले जाते. या वृक्षाच्या ढोलीमध्ये एक मोठा सर्प आहे. तो कधीतरी नशिबवानालाच दिसतो, असे सांगितले जाते.

श्री टेंबेस्वामी गुहा

या मंदिर परीसरात एक निसर्गनिर्मित गुहा आहे. तीच्या रचनेवरून ती प्राचीन असल्याचे समजते. या गुहेत श्री वासुदेवानंद सरस्वती टेंबेस्वामी यांनी १९१० मध्ये चातुर्थाश्रमीय चातुर्मास संपन्न केल्याचे लिखीत पुरावे आहेत. आता या ठिकाणी बांधकाम होऊन शिवमंदिर बांधण्यात आले आहे.