श्रावण विशेष : माळढोक अभयारण्यातील नागनाथ मंदिर ! भक्ती अन्‌ पर्यटनही | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

श्रावण विशेष : माळढोक अभयारण्यातील नागनाथ मंदिर

सोलापूर शहरापासून पंधरा ते वीस किलोमीटर अंतरावर असलेल्या माळढोक पक्षी अभयारण्यात अकोलेकाटीच्या माळावर नागनाथ मंदिर आहे.

श्रावण विशेष : माळढोक अभयारण्यातील नागनाथ मंदिर ! भक्ती अन्‌ पर्यटनही

उत्तर सोलापूर : सोलापूर (Solapur) शहरापासून पंधरा ते वीस किलोमीटर अंतरावर असलेल्या माळढोक पक्षी अभयारण्यात (Maldock Bird Sanctuary) अकोलेकाटीच्या (Akolekati) माळावर नागनाथ मंदिर (Nagnath Temple) आहे. हे नागनाथ मंदिर निसर्गाच्या सान्निध्यात वसलेले असल्यामुळे ते भाविकांचे श्रद्धास्थान ठरले आहे. त्याचबरोबर निसर्गप्रेमींना पावसाळी पर्यटनाबरोबर देवदर्शनाचाही आनंद यामुळे घेता येत आहे. माळढोक अभयारण्यातील हिरवीगार वनराई, हिरवेगार गवत मनाला प्रसन्न, आल्हाददायक करते.

हेही वाचा: श्रावण विशेष : सोमेश्‍वर, संगमेश्‍वर अन्‌ रामलिंगेश्‍वर दर्शनाची पर्वणी!

सोलापूर-बार्शी रोडवर सोलापूरपासून वीस किलोमीटर अंतरावर नान्नज माळढोक पक्षी अभयारण्य आहे. त्या अभयारण्यामध्ये अकोलेकाटीच्या (ता. उत्तर सोलापूर) माळावर नागनाथ मंदिर आहे. अनेक वर्षांपूर्वी एक महिला वडवळ (ता. मोहोळ) या ठिकाणाहून आपल्या घराकडे निघाली होती. त्यावेळी वडवळ येथील नागनाथ महाराजांनी तिला प्रसन्न होऊन वर मागण्याची आज्ञा केली. त्यावेळी नागाला राखी बांधण्याची इच्छा त्या महिलेने व्यक्त केली. पण असे करत असताना नागनाथ महाराजांनी एक अट घातली. तू पुढे चल, तुझ्या पाठीमागे मी येतो. मात्र तू ज्या ठिकाणी मागे पाहशील त्या ठिकाणी मी लुप्त होईन, अशी अट घालून ते दोघे एकमेकांच्या मागे- पुढे निघाले. अकोलेकाटीच्या माळावर आल्यानंतर त्या महिलेने चुकून मागे पाहिले. क्षणाचाही विलंब न लावता नागराज त्या ठिकाणी लुप्त झाले, अशी आख्यायिका सांगितली जाते.

सुरवातीच्या काळाला शिवलिंग व नागाचा फणा असेच त्या ठिकाणी होते. मात्र कालांतराने त्या ठिकाणी मंदिराची उभारणी करण्यात आली. नागपंचमीला देवदर्शनासाठी मोठ्या प्रमाणात गर्दी होते. सावरगाव (ता. तुळजापूर) याच्यानंतर अकोलेकाटीच्या माळावरील नागनाथ मंदिराजवळ साप, विंचू व पाल हे तिन्ही प्राणी नागपंचमी दिवशी एकत्र येत असल्याची आख्यायिकाही सांगितली जाते.

हेही वाचा: दक्षिण सोलापूर म्हणजे भाविकांसह पर्यटकांसाठी मोठी पर्वणी !

हे नागनाथ मंदिर माळढोक अभयारण्यात आहे. त्यामुळे मंदिराच्या आजूबाजूचा परिसर पावसाळ्यामध्ये पर्यटकांना आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरतो. हिरवीगार वनराई, हिरवेगार गवत मनाला प्रसन्न, आल्हाददायक करते. त्यामुळे देवदर्शनाबरोबरच अनेक नागरिक पावसाळी पर्यटनासाठी माळढोक अभयारण्याकडे आपली वाट धरतात. नागनाथ मंदिर येथे दररोज दर्शनासाठी भाविकांची मोठी गर्दी होत असल्याचे या ठिकाणचे पुजारी गोपाळ ढगे यांनी सांगितले.

मंदिराच्या शेजारी एक हातपंप आहे. उन्हाळ्यातही त्या हातपंपाचे पाणी पिण्यासाठी वापरले जाते. त्याचबरोबर वन्यप्राण्यांना पाण्याची सोय व्हावी यासाठी मंदिराच्या बाजूलाच पाणवठाही तयार करण्यात आलेला आहे. अनेकांचे श्रद्धास्थान ठरलेले नागनाथ मंदिर हे परिसरात प्रसिद्ध आहे. नगर, विजयपूर, सोलापूर यांसारख्या ठिकाणाहून भाविक भक्त दर्शनासाठी येतात. आजही नागपंचमीला देवाच्या गाभाऱ्यात येऊन नागदेवता दर्शन देत असल्याचे पुजारी ढगे यांनी सांगितले. उत्तर सोलापूर तालुक्‍यात अकोलेकाटी बरोबरच मार्डी येथील नागनाथ मंदिरही भाविकांचे श्रद्धास्थान ठरले आहे. श्रावण महिन्यात या मंदिरात दर्शनासाठी भाविक मोठ्या प्रमाणात गर्दी करतात. माळढोक अभयारण्याच्या शेजारी मार्डी हे गाव आहे. त्यामुळे त्या ठिकाणच्या नागनाथाचे दर्शन घेण्यासाठी गेल्यानंतर माळढोक अभयारण्याची सफर केल्याशिवाय पर्यटक परत आपल्या गावाकडे फिरत नाहीत.

ठळक मुद्दे...

  • सोलापूरपासून पंधरा ते वीस किलोमीटर अंतरावर

  • माळढोक पक्षी अभयारण्यात सफर करण्याची संधी

  • एक दिवसाचे पावसाळी पर्यटन शक्‍य

  • नागपंचमीला भाविकांची होते मोठी गर्दी

Web Title: Features Of Nagnath Temple On The Hill Of Akolekati In Maldhok Bird Sanctuary

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
टॅग्स :maharashtraviralupdate