esakal | प्राचीन संस्कृतीतील जलव्यवस्थापन आजही मार्गदर्शक
sakal

बोलून बातमी शोधा

file photo

प्राचीन संस्कृतीतील जलव्यवस्थापन आजही मार्गदर्शक

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

भटकंती व छायाचित्रण या दोन छंदांचा मिलाफ साधून पुण्यातील गणेश पांगारे यांनी महत्त्वाचं दस्तऐवजीकरण केलं आहे. जगभरातील विविध देशांतील ऐतिहासिक वारसास्थळांमधून स्वतःला जाणवणारे सामाजिक व सांस्कृतिक पैलू त्यांनी पर्यावरणीय संदर्भात अभ्यासले. इतिहासाच्या वेगवेगळ्या कालखंडात, निरनिराळ्या देशांमधील लोकजीवनातून आलेल्या शहाणपणाचा वारसा गणेश पांगारे आज जगभरातील अभ्यासकांसमोर मांडतात.

पांगारे म्हणाले, ‘‘पर्यावरणाबाबतचा विकास कुठे व कसा झाला, याचं कुतूहल वाटलं. महाराष्ट्रात अण्णा हजारे, विलासराव साळुंखे, पोपटराव पवार आदींनी पाण्याचं दुर्भिक्ष्य असलेल्या गावांमध्ये लोकसहभागातून पाऊसपाणी कसं राखलं; ते समजून घेतलं. भारतातील वेगवेगळ्या राज्यांतील जलसंरक्षण व संवर्धनाचे प्रयोग पाहिले. निरनिराळ्या देशांमधील, वेगवेगळ्या कालखंडातील संस्कृतीच्या खुणांमधून पाणी व्यवस्थापनाचा धांडोळा घेतला. सुमारे पस्तीस वर्षांच्या भटकंतीत मी अनेक पुरातन वसाहतींचे अवशेष पाहिले. काही ठिकाणी प्राचीन वास्तूंचं जतन जाणीवपूर्वक केलं गेल्यामुळे आजही त्यांतून जुन्या काळातील लोकजीवनाचा अंदाज बांधता येतो.’’

हेही वाचा: परीक्षार्थींनो Best Luck; पोलिस बंदोबस्तात उद्या भरतीची लेखी परीक्षा

पांगारे यांनी पुढे सांगितलं की, भूशास्त्रात एम.एस्सी. केल्यावर मी ग्रामीण व्यवस्थापन विषयात एमबीएचं शिक्षण घेतलं. माझी पत्नी वसुधा हिने समाजशास्त्राची पदवी घेतली आहे. दोघे मिळून अनेक अभ्यासप्रकल्पांमध्ये सहभागी होतो. इंग्रजीतून काही पुस्तकांचं लेखन तर काहींचं संपादन मी केलं आहे. मी आणि वसुधाने एकत्रितपणे काही पुस्तकांचं संकलन- संपादन केलं आहे. उदाहरणार्थ, ‘डाइंग विजडम’ या पुस्तकात आम्ही जलव्यवस्थापन क्षेत्रातील तज्ज्ञांचे लेख संकलित करून आमचे विचार प्रस्तावनेत मांडले आहेत.

सध्या मी जागतिक बँकेसाठी करत असलेल्या कामासाठी बँकॉकमध्ये वास्तव्याला आहे. सिंधू, ब्रह्मपुत्रा, गंगा आदी नद्यांचं मानवी जीवनात महत्त्व अभ्यासणं हा आवडीचा विषय आहे. एकापेक्षा अधिक देशांमधून वाहणाऱ्या नद्यांबाबत संबंधित देशांची राजकीय भूमिका व त्यातून निर्माण होणारा संघर्ष, नद्यांच्या निरनिराळ्या वर्तनाचा मानवी जीवनावर होणारा परिणाम, हिलसासारख्या माशाच्या स्थलांतरामागची कारणं आदींचं अध्ययन करत असतो.

हेही वाचा: ‘आयटीआय’ची अंतिम गुणवत्ता यादी ४ सप्टेंबरला होणार जाहीर

पाण्याची भिस्त पावसावरच

पिण्यासाठी व घरगुती इतर उपयोगासाठी, त्याचप्रमाणे शेतीसाठी लागणाऱ्या पाण्याची भिस्त पावसावरच अवलंबून असते. कमी, जास्त किंवा मध्यम प्रमाणात पडणाऱ्या पावसाचा थेंब अन् थेंब साठवून त्याचं योग्य व्यवस्थापन, हे प्राचीन संस्कृतीत आजही बघायला मिळणाऱ्या खुणांमधून लक्षात येतं.

कित्येक पिढ्यांचा अनुभवांतून पूर्वजांना पाणी व एकंदरीत निसर्गाबाबत आलेलं शहाणपण कालातीत आहे. आजही त्यातून खूप काही शिकण्यासारखं आहे, हे मी जगभरातील संस्था, संघटनांसमोर करत असलेल्या व्याख्यान, चर्चासत्रांमधून सांगत असतो.

- गणेश पांगारे

loading image
go to top