दीडशे वर्षांचे ‘बेस्ट’ संग्रहालय

मुंबई हे केवळ भारतातीलच नव्हे, तर जगाच्या नकाशावरील चर्चेतील शहर! त्यामागील महत्त्वाचं कारण म्हणजे येथील सार्वजनिक वाहतुकीच्या सुविधा.
best musium mumbai
best musium mumbaisakal
Summary

मुंबई हे केवळ भारतातीलच नव्हे, तर जगाच्या नकाशावरील चर्चेतील शहर! त्यामागील महत्त्वाचं कारण म्हणजे येथील सार्वजनिक वाहतुकीच्या सुविधा.

लोकल ट्रेन, काळ्या-पिवळ्या टॅक्सी, रिक्षा या सार्वजनिक वाहतुकीच्या सुविधांसोबतच मुंबईकरांची हक्काची वाहतूक सेवा म्हणजे बेस्ट! दीडशे वर्षांचा इतिहास असलेला बेस्टचा कालपट आणिक आगारातील संग्रहालयात अनुभवता येतो.

मुंबई हे केवळ भारतातीलच नव्हे, तर जगाच्या नकाशावरील चर्चेतील शहर! त्यामागील महत्त्वाचं कारण म्हणजे येथील सार्वजनिक वाहतुकीच्या सुविधा. या सुविधा सर्वसामान्यांच्या खिशाला परवडतील अशा आहेतच, शिवाय त्या गेली अनेक वर्षे अतिशय कार्यक्षम पद्धतीने कार्यरत आहेत. यातील एकही सुविधा बंद असली तरी सामान्य मुंबईकरांचं दैनंदिन वेळापत्रक कोलमडून पडतं. त्यातही ‘बृहन्मुंबई इलेक्ट्रिक सप्लाय अँड ट्रान्सपोर्ट’ असे पूर्ण नाव असलेला हा उपक्रम मुंबईला केवळ वाहतूक सेवा पुरवत नाही, तर वीजपुरवठाही करतो याची अनेकांना कल्पना नसते. वरकरणी केवळ मुंबईच्या रस्त्यावर धावणाऱ्या लाल रंगाच्या गाड्या एवढीच त्याची ओळख असली, तरी त्याचा इतिहास तब्बल १५० वर्षांचा आहे. हा दीड शतकाचा कालपट अनुभवायचा असेल आणि जुन्या मुंबईच्या आठवणीत रममाण व्हायचं असेल, तर शीव येथील आणिक आगारातील बेस्टच्या वस्तुसंग्रहालयाला भेट द्यायलाच हवी.

आणिक आगारातील एका जुन्या इमारतीमधील तिसऱ्या मजल्यावर बेस्टचे वस्तुसंग्रहालय आहे. पूर्वी कुर्ला बस डेपोत असलेले हे संग्रहालय १९९० च्या दशकात जागेअभावी आणिक आगारात स्थलांतरित करण्यात आले. संग्रहालयात मुंबईच्या वाहतूक आणि वीजपुरवठा सेवेचा इतिहास जतन करण्यात आला आहे. ट्राम, बेस्ट बसच्या प्रतिकृती, बसचे प्रकार, बसची जुनी तिकिटे, तिकीट वितरण यंत्रे, सुरुवातीपासूनची वीज मीटर, दिवे, कर्मचाऱ्यांचे बॅच, पोषाख, टेलिफोन, आगारातील वस्तू, छायाचित्रे अशा अनेक वस्तू येथे पाहायला मिळतात.

आजच्या बेस्ट बसची सुरुवात ही घोड्यांनी ओढली जाणाऱ्या ट्राम गाडीने झाली होती, हे कदाचित अनेकांना ठाऊक नसेल. अमेरिकेतील बोस्टन व न्यूयॉर्क शहरातील लोकांनी तेथे शेअर्स जमवले आणि नंतर १८७३ साली मुंबई येथे रजिस्ट्रेशन मिळवले. ९ मे १८७४ रोजी बॉम्बे ट्रामवे कंपनी लिमिटेडने घोड्यांनी ओढली जाणारी व लोखंडी रुळांवरून धावणारी पहिली ‘ट्राम’ गाडी ग्रँट बिल्डिंग (कुलाबा) ते पायधुनी या मार्गावरून धावली होती. ७ मे १९०७ रोजी विजेवर चालणारी ट्राम मुंबईत सुरू झाली. मुंबईत शेवटची ट्राम ३१ मार्च १९६४ साली धावली. दरम्यानच्या काळात म्हणजेच १५ जुलै १९२६ रोजी अफगाण चर्च ते क्रॉफर्ड मार्केटदरम्यान पहिली बेस्ट बस धावली. फकीर महंमद बाबा या १८८५ साली बेस्टमध्ये रुजू झालेल्या पहिल्या ट्राम कंडक्टरांनी पहिले तिकीट ट्रॅफिक मॅनेजर लुकास यांना दिले होते, या आणि अशा अनेक दुर्मिळ गोष्टींच्या नोंदी येथे आढळतात.

मुंबई आणि गर्दी हे समीकरण फार जुने आहे. तुम्हाला आश्चर्य वाटेल या वाढत्या गर्दीचा सामना करण्यासाठी १९३७ साली डबल डेकर बस सुरू करण्यात आल्या होत्या. या डेमलर डबल डेकर बेस्ट बसची चेसी संग्रहालयात मध्यभागी ठेवण्यात आली आहे. घोड्यांनी ओढली जाणारी ट्राम वळू शकत नसे. त्यामुळे शेवटच्या स्थानकाला पोहोचल्यानंतर एका बाजूचे घोडे सोडून दुसऱ्या बाजूला आणून बांधले जात होते. ज्यांनी ट्राम प्रत्यक्षात कधीही पाहिली नाही त्यांना ट्रामची छायाचित्रे आणि दुतर्फा वापरता येणाऱ्या खुर्च्या येथे प्रत्यक्ष पाहता येतात.

संग्रहालयात ब्रिटिश काळात कंडक्टर वापरत असलेले तिकीट मशीन आहे. बॉम्बे इलेक्ट्रिक सप्लाय ट्रामवे कंपनीची नकाशे असलेली जुनी तिकिटे, बेस्ट बस्टची परतीच्या प्रवासासाठी मधून अर्धा भाग फाडण्याची सोय असलेली तिकिटे, आपत्कालिन तिकिटे, कुपन तिकिटे येथे आहेत. १९८६ पर्यंत बेस्ट बस तिकीट इंग्रजीत देत असे. यापैकी बहुतेक मूल्यांची मूळ तिकिटे संग्रहालयात जतन केलेली आहेत.

इलेक्ट्रिक पथदिवे रूढ होण्यापूर्वी मुंबई शहर गॅसच्या दिव्यांनी उजळायचे. बेस्टच्या वीज विभागातील असे दोन दिवे आता संग्रहालयाची शान आहेत. भेंडी बाजार, एस्प्लेनेड रोड (आता महात्मा गांधी रोड) आणि चर्चगेट स्ट्रीट (आताचा वीर नरिमन रोड) हे गॅसच्या दिव्यांनी उजळलेले पहिले रस्ते होते, याची नोंद येथे सापडते. १९६२ मध्ये बेस्ट उपक्रमाचे प्रभारी अभियंता पी. जी. पाटणकर यांना भूमिगत रेल्वे प्रणालीचा अभ्यास करण्यासाठी बर्लिन आणि मिलान येथे पाठवण्यात आले होते. जेणेकरून बेस्टला मुंबईची गर्दी कमी करण्यासाठी असाच उपाय काढता येईल. १९६४ मध्ये बेस्टच्या महाव्यवस्थापकांना जपानमध्ये भूमिगत रेल्वे प्रणालीचा अभ्यास करण्यासाठी आमंत्रित करण्यात आले. या अभ्यासानंतर पाटणकर यांनी मुंबईसाठी भूमिगत रेल्वेबाबतची त्यांची सर्व निरीक्षणे आणि सूचना सविस्तरपणे नोंदवून त्या उपक्रमाला सादर केल्या. ही योजना नंतर खूप खर्चिक असल्याचे सिद्ध झाल्याने सरकारने ती नाकारली होती. या संपूर्ण प्रकल्पाची मॉडेल्ससह तपशीलवार योजना बेस्ट संग्रहालयात प्रदर्शित केलेली आहे. विशेष म्हणजे महाराष्ट्र सरकार आता त्याच धर्तीवर मेट्रो-३ भूमिगत कॉरिडॉर बनवत आहे.

संग्रहालयातील आणखी एक आकर्षण म्हणजे धातूचा घुमट. वाहतूक सिग्नल नियमित व्यवहारात येण्यापूर्वी मोठ्या ट्रॅफिक जंक्शनवर असे घुमट ठेवलेले असत. हे घुमट रात्रीच्या वेळी मोठ्या ट्रॅफिक जंक्शनवर लावले जात आणि बेस्ट उपक्रमाच्या इलेक्ट्रिकल विभागाद्वारे चालवले जायचे. . मोठे इलेक्ट्रिक मीटर, दुर्मिळ लाकडी चार-ब्लेडचा पंखा, ‘बॉम्बे ट्रामवे’चे भिंतीवरील घड्याळ, जाहिरातीसाठीचा टेबल फॅन आणि दादर बस डेपोमध्ये खोदताना सापडलेली एक मोठी लोखंडी घंटा यांसारख्या असंख्य दुर्मिळ गोष्टी या संग्रहालयात आहेत. हे संग्रहालय केवळ बेस्ट बसचा इतिहास सांगत नाही तर मुंबई शहर कसे बदलत गेले याचाही पट तुमच्यासमोर उभा करतं.

nanawareprashant@gmail.com

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com