esakal | रामटेक : निसर्गरम्य तीर्थक्षेत्र, पर्यटनस्थळे
sakal

बोलून बातमी शोधा

ramtek tample

रामटेक : निसर्गरम्य तीर्थक्षेत्र, पर्यटनस्थळे

sakal_logo
By
टीम ई सकाळ

नागपूर : नैसर्गिक संपन्नता, धार्मिक स्थळे, पर्यटनस्थळ आदींनी समृद्ध भाग अशी नागपूर जिल्ह्याची खरी ओळख. रामटेक तालुक्यात पवित्र गडमंदिरासह कालिदास स्मारक, बुद्ध धर्माचे शिलालेख, प्राचीन वास्तुशास्त्र, महानुभाव पंथाचे धार्मिक स्थळ, जैन धर्माचे स्थान, नगरधन किल्ला, हेडब्बा टेकडी, जपाळा, रामधाम, केशबा राजा, अंबाळा तलाव असे अनेक निसर्गरम्य तीर्थक्षेत्र, पर्यटनस्थळे आहेत. रामटेक गडमंदिरावर प्रभू श्रीराम, सीता, लक्ष्मण मंदिरात देश-विदेशातून भाविक दर्शनाला येतात.

मंदिरापासून काही अंतरावर कालिदास स्मारक आहे. ज्या ठिकाणी कालिदासांनी ‘मेघदूत’ची निर्मिती केली. शेतकऱ्यांना लाभ व्हावा म्हणून माजी मंत्री मधुकरराव किंमतकर यांनी सत्रापूर सिंचन प्रकल्प आणला, परंतु अद्याप प्रकल्प पूर्ण झालेला नाही. त्यामुळे बऱ्याच शेतकऱ्यांना याचा फायदा होत नाही. रामटेक तालुक्यातील तोतलाडोह जलाशयात मोठ्या प्रमाणात मासे आहेत, परंतु जंगल असल्याने अनेक मच्छीमार यापासून वंचित आहेत.

हेही वाचा: एकाच वर्षात सोयाबीन बियाणे दर्जेदार!

रामटेक तालुक्यात पेंच व्याघ्र प्रकल्प, मानसिंगदेव अभयारण्य, खुर्सापार असे तीन प्रकल्प आहेत. त्या ठिकाणी तेथीलच लोकांना रोजगार उपलब्ध आहे, परंतु, हे प्रकल्प पावसाळ्यात बंद राहत असल्याने नागरिकांना भटकंती करावी लागते. रामटेक ते गोटेगाव रेल्वेसाठी अनेक सर्व्हे झाले. आमदार, खासदार, अनेक पक्षांतील नेत्यांनी याबाबत लोकांना भ्रमित केले. परंतु, प्रकल्प पूर्ण झालेला नाही. हा प्रकल्प सुरू झाला असता तर मोठ्या प्रमाणात रोजगार निर्माण झाले असते. रामटेक तालुक्यात देशातून नव्हे तर विदेशातून पर्यटक येतात.

रामटेक तालुका पर्यटनक्षेत्र म्हणून ओळखला जातो. परंतु, या क्षेत्रात मनसर-कांद्री मॅंगनीज माईन सोडून कुठेही रोजगार उपलब्ध नाही. परंतु, पारशिवनी-मौदा तालुका त्यास अपवाद आहे. कारण, या तालुक्यात सूतगिरणी असल्याने मोठ्या प्रमाणात रोजगार निर्माण होत आहेत. परंतु रामटेक पर्यटनस्थळ असल्याने उद्योगधंद्यांबाबत याकडे दुर्लक्ष करण्यात आले. रामटेक तालुक्यातील बांबू आर्ट व सूतगिरणी बंद पडलेली परसोडा मॅंगनिज माईन सुरू करून रोजगार निर्माण करावे.
- सतीश डोंगरे, जिल्हा परिषद सदस्य
loading image
go to top