esakal | एकदम झक्कास! सडावाघापूर पठारावर बहरली रंगीबेरंगी फुलांची दुनिया I Sadawaghapur Pathar
sakal

बोलून बातमी शोधा

Sadawaghapur Plateau

कासच्या धर्तीवर सडावाघापूर पठारावरदेखील रंगांची उधळण पाहायला मिळत आहे.

एकदम झक्कास! सडावाघापूर पठारावर बहरली रंगीबेरंगी फुलांची दुनिया

sakal_logo
By
यशवंतदत्त बेंद्रे

तारळे (सातारा) : कासच्या धर्तीवर (Kas Pathar Season 2021) सडावाघापूर पठारावरदेखील (Sadawaghapur Plateau) रंगांची उधळण पाहायला मिळत आहे. पिवळी, पांढरी, निळी अशा रंगांनी पठार व्यापले आहे. उलट्या धबधब्याने (Sadawaghapur Reverse Waterfall) प्रसिद्धीच्या शिखरावर असलेल्या सडावाघापूर पठाराचे या रानफुलांमुळेदेखील नाव होऊ लागले आहे. अनेक पर्यटक इकडे येत असून, पठारावर मुक्तपणे विहार करीत निसर्ग, फुले, थंड वारा याचा आस्वाद घेत आहेत. येथील फुलांची दुनिया दर वर्षी बहरते. मात्र, अभ्यासकांचे याकडे दुर्लक्ष आहे. येथे शास्त्रीय पद्धतीने अभ्यास झाल्यास व फुलांचे संवर्धन झाल्यास सडावाघापूर पठारही फुलांचे डेस्टिनेशन बनू शकते.

उलटा धबधबा, विस्तीर्ण पठार, गगनचुंबी पवनचक्क्या, हिरवे गालिचे, धुक्याची दुलई, धुक्यात हरविलेल्या पवनचक्क्या, रस्ते व घरे पाहणे सोबत भिजायला पाऊसधारा हे पावसाळ्यातील स्वर्गसुखच ठरले आहे. ते येथे अनुभवायला मिळते. हा अनुभव घेण्यासाठी व निसर्ग डोळ्यात साठवण्यासाठी पावसाळ्यात हजारो पर्यटक पठारावर गर्दी करतात. अगदी पुणे, मुंबईपर्यंत याचे लोण पसरले आहे. याचप्रमाणे पाऊस संपला, की पठारावर सप्टेंबर, ऑक्टोबरमध्ये रंगांची दुनिया बहरू लागते. अनेक जण इकडे भेटी देत आहेत.

हेही वाचा: 24 घोटाळे उघड, त्यात ठाकरे सरकारमधील 18 नेत्यांची नावं : सोमय्या

कासच्या तुलनेत येथील बहर कमी व लहान फुले असतात. मात्र, येथे कसलीही बंधने नसल्याने पर्यटकांना मुक्त विहार करता येतो. आताही पठारावर फुलोत्सव सुरू आहे. यात सीतेची आसवं, पिवळी सोनकी, पिवळी मिकी माउस, स्मिथिया आगरकरी, पांढरे गेंद आशा फुलांनी पठारावर गर्दी केली आहे. यामुळे पठारावर पांढरा, पिवळा, निळा गालिचे पसरल्याचा भास होत आहे. गेली अनेक वर्षे हा फुलोत्सव सुरू आहे.

हेही वाचा: कालेयचा 'उल्का वर्षाव' पाहण्याची संधी; पृथ्वीवर घडणार अनोखा 'आविष्कार'

दर वर्षी फुले बहरतात आणि कोमेजतात

दर वर्षी फुले बहरतात आणि कोमेजतात; परंतु याचा शास्त्रीय अभ्यास झालेला नाही. अभ्यासकांनीदेखील इकडे पाठ फिरवली आहे. याचे संशोधन आणि संवर्धन झाल्यास येथेही मोठ्या प्रमाणावर फुलोत्सव पाहायला मिळू शकतो, तरीही मुक्त वावर असल्याने अनेक जण पठारावर भेटी देत आहेत.

हेही वाचा: कॅलिफोर्नियात दुष्काळाच्या झळा; पाण्यासाठी घेतायत दीड कोटींचे मशीन

loading image
go to top