
Tiruchendur Temple : जेव्हा ब्रिटीश सैनिकांनी भगवान कार्तिकेयांची मूर्ती समुद्रात टाकून धुम ठोकली!
भारतातील मंदिरांचा इतिहास वैविध्यपूर्ण आहे. इथल्या मंदिरांची वास्तूकला, शिल्पकला कौतूकास्पद आहे. खासकरून दक्षिण भारतातील अनेक मंदिरे सुबक आणि आकर्षक आहेत. तशीच त्यांचा इतिहासही रोमांचक आहे.
आज आपण अशाच एका मंदिराबद्दल जाणून घेऊयात. तिरुचेंदूर मंदिराची कथा दोन कारणांमुळे अद्वितीय आहे. एका डच राजाने या मंदिराचे किल्ल्यात रूपांतर केले होते. त्याच डच लोकांनी भारत सोडून जाताना भगवान कार्तिकेयांची मूर्ती पळवून नेली होती. पण, समुद्रात गेल्यावर तिथेच त्यांनी ती मूर्ती टाकली आणि ते पळून गेले. (Tiruchendur Temple : amazing india tiruchendur temple history and facts)
तामिळनाडूच्या तुतीकोरीन जिल्ह्यातील तिरुचेंदूर शहरात अरुल्मिगु सुब्रमण्यस्वामी मंदिर आहे. हे तामिळनाडूमधील सहा सर्वात पवित्र मुरुगन मंदिरांपैकी एक आहे. सहा मंदिरांपैकी हे एकमेव मंदिर आहे. जे समुद्राजवळ आहे. तर बाकीचे डोंगरावर आहेत. पौराणिक कथांनुसार, येथेच भगवान शिव आणि देवी पार्वती यांचे पुत्र भगवान मुरुगन यांनी असुर राजा सुरपद्मा यांच्याशी झालेल्या युद्धात विजय मिळवला होता.

हे मंदिर एकेकाळी डच सैन्याचा गड म्हणून वापरले जात होते. यावर विश्वास ठेवणे कठीण आहे. याची सुरुवात 17 व्या शतकात झाली. तुतीकोरीन जिल्ह्यातील थुथुकुडी हे एक प्रमुख बंदर होते. ते प्राचीन काळापासून मोत्यांच्या व्यापारासाठी प्रसिद्ध होते. ते वर्षानुवर्षे पर्यटकांना आकर्षित करत असे.

मदुराईच्या नायक घराण्याचा शासक तिरुमलाई यांच्याशी झालेल्या तहाने डच लोकांना तुतिकोरिन जिल्ह्यातील कयालपट्टीनम येथे किल्ला बांधण्याची परवानगी दिली. पण यावरून डच आणि पोर्तुगीज यांच्यात युद्ध झाले. पोर्तुगीज इथे 16 व्या शतकापासून स्थायिक झाले होते.
अखेर पोर्तुगीजांनी डचांना येथून हाकलून दिले आणि त्यांचा किल्ला नष्ट केला. पण लवकरच, डच लोकांनी श्रीलंकेतील डच गव्हर्नरची मदत घेतली. १६४६ च्या सुमारास तिरुचेंदूर येथील मुरुगन मंदिरासह तुतीकोरीनमधील पोर्तुगीज प्रदेशांवर हल्ला केला आणि त्याचा ताबा घेतला.
डच लोकांनी केवळ मंदिरच ताब्यात घेतले नाही. तर ते मजबूत केले. आणि त्याचा वापर पोर्तुगीजांवर हल्ला करण्यासाठी केला. मंदिराचा ताबा घेताना त्या लोकांनी मंदिरात ठेवलेले बरेच सोने-चांदी लुटल्याचेही सांगितले जाते.


1648 च्या सुमारास डच लोकांनी मंदिराचा त्याग केला. मंदिर सोडण्यापूर्वी त्यांनी बॉम्बफेक करून ते नष्ट करण्याचा प्रयत्न केला, परंतु ते यशस्वी होऊ शकले नाहीत. तसेच, ते लोक जेव्हा भारतातून माघारी परतत होते तेव्हा त्यांनी कार्तिकेय महाराजांची मूर्ती सोबत नेली.
पण, जहाज समुद्रात गेल्यावर प्रचंड वादळ आले. त्या वादळातून मूर्ती बाहेर काढणे सोपे नव्हते. त्यामूळे जहाज चालवणारा नावाडी डच अधिकाऱ्यांना म्हणाला की, जोवर ही मूर्ती जहाजात आहे तोवर आपण पुढे जाऊ शकत नाही. त्यामूळे ही मूर्ती इथेच सोडावी लागेल.

काही दिवसांनी त्या मंदिरातील पुजारी वडामलाई पिल्लय्यान यांच्या स्वप्नात प्रकट झाले. त्यांनी समुद्रात १० किलोमीटरच्या अंतरावर माझी मुर्ती आहे,तसेच माझ्या मुर्तीच्या वर एक लिंबू पाण्यावर तरंगत आहे, असे सांगितले. त्यानंतर वडामलाई पिल्लय्यान काही माणसांसह समुद्रात गेले आणि चमत्कारिकरीत्या ती मूर्ती सापडली. या मूर्तींची मंदिरात पुनर्स्थापना करण्यात आली.

या मंदिराबद्दल असाही एक चमत्कार सांगितला जातो की, २००४ मध्ये जेव्हा सर्वात मोठी त्सुनामी आली होती, तेव्हा या मंदिराला धक्का न लावता त्सुमानीच्या उंच लाटा मंदिराच्या बाजूने गेल्या.