esakal | Lockdown नंतर फिरायला जाताय? रांचीमध्ये जाऊन घ्या विदेशातील फिल

बोलून बातमी शोधा

Lockdown नंतर फिरायला जाताय? रांचीमध्ये जाऊन घ्या विदेशातील फिल
Lockdown नंतर फिरायला जाताय? रांचीमध्ये जाऊन घ्या विदेशातील फिल
sakal_logo
By
शर्वरी जोशी

गेल्या वर्षभरापासून थैमान घातलेल्या कोरोना विषाणूचा फटका संपूर्ण जगाला बसला आहे. यात भारतदेखील अपवाद नाही. भारतातही अनेकांना कोरोनाची लागण झाली आहे. त्यामुळे सध्या काही राज्यांमध्ये लॉकडाउन घोषित करण्यात आला आहे. विशेष म्हणजे गेल्या एक वर्षापासून प्रत्येक जण घरात अडकला आहे. त्यामुळे कधी एकदा कोरोनाचं संकट टळतंय आणि आपण ५-६ दिवस फिरायला बाहेरगावी जातोय असं अनेकांना झालं आहे. त्यातच आता अनेक जण आगाऊ प्लॅन करायला लागले आहेत. यात बरेच जण महाराष्ट्राबाहेरील पर्यटन स्थळांचा विचार करत आहेत. म्हणूनच जर महाराष्ट्राबाहेर फिरायचा बेत आखत असाल तर झारखंडची राजधानी रांचीचा विचार एकदा नक्की करा. कारण, रांचीमध्ये अशी काही ठिकाणं आहे. जिथे गेल्यावर तुम्हाला विदेशात गेल्याचा फिल येईल.

भारतातील प्रसिद्ध शहरांमध्ये रांचीचा आवर्जुन समावेश केला जातो. या शहराला झऱ्याचं शहर असंही म्हटलं जातं. निसर्गसंपदा लाभलेलं हे शहर सध्या अनेक पर्यटकांना खुणावत आहे. म्हणूनच येथील परफेक्ट डेस्टिनेशन्स कोणते ते पाहुयात.

हेही वाचा: पत्नीचे दागिने गहाण ठेवून कोरोनाग्रस्तांना पुरवतोय मोफत ऑक्सिजन

१. दसम धबधबा -

रांचीपासून जवळपास ४० किलोमीटर दूर अंतरावर दसम धबधबा आहे. रांचीमधील प्रसिद्ध पर्यटन स्थळांपैकी हे एक लोकप्रिय ठिकाण आहे. या धबधब्याचं उगम स्थान कचनी नदीमधून झाल्याचं सांगण्यात येतं. दसम या शब्दाचा स्थानिक भाषेतील अर्थ पाण्याचा साठा असं आहे.

२. टागोर हिल -

रविंद्रनाथ टागोर यांच्या नावावरुन या ठिकाणाला नाव देण्यात आलं आहे. असं म्हटलं जात की, रविंद्रनाथ टागोर यांची ही आवडती जागा होती. जवळपास ३०० फूट उंचीवर हे ठिकाण आहे.

३. सूर्यमंदिर -

रांचीपासून ३७ किलोमीटर दूर अंतरावर हे मंदिर आहे. हे संपूर्ण मंदिर संगमरवराचं आहे. १८ चाकं आणि ७ घोडे यांचा रथ अशी या मंदिराची रचना आहे. दर वर्षी २५ जानेवारी रोजी या मंदिरात मोठी जत्रा भरते.

४. रांची तलाव -

१८४२ मध्ये रांची तलाव तयार करण्यात आला होता. या तलावात बोटिंगचीदेखील व्यवस्था करण्यात आली आहे.

५. पहाडी मंदिर -

समुद्रसपाटीपासून २१४० फूट उंचीवर हे मंदिर असून यात भगवान शंकराची प्राणप्रतिष्ठा करण्यात आली आहे. या मंदिराला ३०० पायऱ्या आहेत.