
UPSC Student : रणजी क्रिकेट सोडून सुरू केली परीक्षेची तयारी, पोरानं UPSC क्रॅक करत चमकवलं गावाचं नाव
UPSC Student Success Story : यूपीएससी परीक्षेचा निकाल काही दिवसांपूर्वी लागला असून या परीक्षेत यश मिळवलेल्या विद्यार्थ्यांचं सर्वत्र कौतुक सुरु आहे. अशाच एका राजस्थानमधील कुदान गावातील रहिवासी असलेल्या मनोज मेहरियाने देशात ६२८ वा क्रमांक मिळवून संपूर्ण गावाचे नाव उंचावले आहे. त्याच्या या यशाचं सर्वत्र कौतुक होतंय. त्याने त्याच्या दिवंगत वडिलांचे स्वप्न प्रत्यक्षात उतरवल्याचा त्याच्या कुटुबिायांना फार अभिमान आहे. त्याचा निकाल येताच आईच्या डोळ्यांतून आनंदाश्रूंचा वर्षाव झाला.
मनोजचे वडील राजेंद्र मेहरिया यांचे निधन झाले असून 3 भावंडांमध्ये सर्वात मोठा असल्याने मनोज कुटुंबाची काळजी घेत आहे. निकाल आल्यावर त्याची आई तारा देवी भावूक झाली. तिच्या दिवंगत पतीचे स्वप्न तिच्या मुलाने पूर्ण केल्यावर तिचा आनंद गगनात मावेनासा झाला आणि घरात जल्लोषाचे वातावरण निर्माण झाले.
विना कोचिंग यूपीएससी मनोजने काढली
मनोजने सांगितले की, मी कोणत्याही कोचिंग सेंटरमध्ये कोचिंग केले नाही आणि स्वतः घरी अभ्यास करून हे स्थान मिळवले आहे. मनोजच्या यशाची माहिती शहरात पोहोचल्यानंतर त्याला दूरवरून लोक शुभेच्छा देऊ लागले. तसेच गावकऱ्यांनीसुद्धा त्याचे तोंडभरून कौतुक केले. (Motivational Story)
मनोज सध्या समाजशास्त्रात एमए करत आहे. त्याने गावातील शाळेतून 10वी पूर्ण केली, त्यानंतर त्याने 12वी सीकरमधून केली. बारावीनंतर क्रिकेट खेळायला सुरुवात केली. मनोज हा रणजी क्रिकेटपटू राहिला आहे. दुखापतीमुळे 2018 मध्ये क्रिकेट सोडले आणि पुन्हा शैक्षणिक क्षेत्राकडे तो वळला. यानंतर त्याने अनेक सरकारी भरती परीक्षा उत्तीर्ण केल्या, पण चांगली नोकरी मिळविण्यासाठी त्याने यूपीएससीची तयारी केली. लॉकडाऊनच्या वेळी त्याने UPSC ची तयारी सुरू केली होती. (UPSC Exam)
मनोज सांगतात की, त्याला कोचिंगमध्ये अभ्यास करताना कंफर्टेबल वाटत नव्हते, म्हणून त्याने स्वतः अभ्यास केला. सध्या त्याने चांगली रँक घेऊन UPSC उत्तीर्ण केली आहे, पण स्वप्न आयएएस होण्याचे आहे, त्यामुळे तो 2023 मध्ये तो त्यासाठी परीक्षाही देणार आहे. तयारीत गुंतलेल्या विद्यार्थ्यांना सल्ला देताना तो म्हणाला की, तुम्हाला कुठूनही मिळत असलेल्या माहितीचा वापर करू नका. तुमचे स्रोत मर्यादित ठेवा जेणेकरून कोणताही गोंधळ होणार नाही. तयारी दरम्यान, नातेवाईक आणि विवाह सोहळे सोडावे लागतात, परंतु उत्तम करियरसाठी तुम्हाला एवढी किंमत मोजावीच लागेल.