esakal | दहावीनंतर आता स्कॉलरशिप परीक्षाही रद्द होणार?
sakal

बोलून बातमी शोधा

Scholarship Exam

आता पुन्हा कोरोनामुळे परिस्थिती अत्यंत बिघडल्याने ‘सीबीएसई’ आणि राज्य शिक्षण मंडळाची दहावीची परीक्षा रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

दहावीनंतर आता स्कॉलरशिप परीक्षाही रद्द होणार?

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

मुंबई : राज्यात कोरोना आणि त्याचा कहर वाढत असल्याने मे महिन्याच्या अखेरीस घेण्यात येणारी पाचवी आणि आठवीतील विद्यार्थ्यांची शिष्यवृत्ती परीक्षा लवकरच रद्द करण्याची घोषणा केली जाणार आहे, अशी माहिती शिक्षण विभागातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिली.

राज्यात पाचवी आणि आठवीच्या विद्यार्थ्यांसाठी महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेकडून ही परीक्षा आयोजित केली जाते. यंदा ही परीक्षा २५ एप्रिल रोजी होणार होती; परंतु कोरोनाच्या दुसऱ्या लाटेमुळे राज्यातील अनेक शहरे आणि ग्रामीण भागातही परिस्थिती बिघडल्याने ही परीक्षा २३ मेपर्यंत पुढे ढकलण्याचा निर्णय घेतला होता.

हेही वाचा: पुणे जिल्ह्यात 1 मेपर्यंत काय असतील निर्बंध? 18 प्रश्नांची उत्तरे

आता पुन्हा कोरोनामुळे परिस्थिती अत्यंत बिघडल्याने ‘सीबीएसई’ आणि राज्य शिक्षण मंडळाची दहावीची परीक्षा रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यामुळे या काळात शिष्यवृत्ती परीक्षा आयोजित करणेही शक्य होणार नसल्याने ती रद्द केली जाणार आहे. त्याची माहिती लवकरच महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेकडून दिली जाणार असल्याचे सांगण्यात आले.

ऑनलाइनचा पर्याय

राज्यातील एकूण परिस्थिती लक्षात घेता ही परीक्षा ऑनलाइन घ्यावी अथवा एखाद्या ॲपवरून घेतली जावी, अशी मागणी शिक्षक आणि मुख्याध्यापक संघटनेने केली होती; मात्र तसे होत नसेल तर ही परीक्षा रद्द करावी, अशा सूचना परीक्षा परिषदेला करण्यात आल्या होत्या.