esakal | PowerAt80: शेतीचे अर्थकारण जाणणारा द्रष्टा नेता

बोलून बातमी शोधा

sharad pawar pramod choudhary.

ज्येष्ठ नेते शरदराव पवार यांचा आज (१२ डिसेंबर) ऐंशीवा वाढदिवस. यानिमित्ताने, उद्योजकतेच्या वाटचालीची सुरुवात करताना त्यांच्याशी संवाद करता आलेले प्राज इंडस्ट्रीजचे संस्थापक-कार्याध्यक्ष डॉ. प्रमोद चौधरी यांनी त्या आठवणींना दिलेला हा उजाळा...

PowerAt80: शेतीचे अर्थकारण जाणणारा द्रष्टा नेता

sakal_logo
By
डॉ. प्रमोद चौधरी

आयुष्याच्या प्रत्येक वळणावर काही माणसं आपल्याला अशी भेटतात, की कालांतराने तो प्रवास पुन्हा अनुभवताना वाटावं, की ती भेट म्हणजे जणू विधिलिखितच! ज्येष्ठ नेते शरदराव पवार यांचे नाव माझ्यासाठी कायमच अशा अग्रगण्यांमध्ये राहील. माझ्या उद्योजकतेच्या वाटचालीतील सुरुवातीच्या कालखंडात त्यांच्याकडून मिळालेले प्रोत्साहन आणि मार्गदर्शन ही माझ्यासाठी अशीच अनमोल ठेव म्हणता येईल.

महाराष्ट्राच्या ग्रामीण भागात जन्म आणि संगोपन झाल्याने, या मातीमध्येच जडणघडण झाल्याने, पश्चिम महाराष्ट्रातील साखर कारखानदारीच्या विश्वाशी अक्षरश: जन्मापासून नाळ जोडल्याने साखर उद्योगाशी निगडित असलेल्या व्यवसायात मी उतरलो, त्याला आता ३७ वर्षे झाली. अभियांत्रिकी शिक्षण पूर्ण केल्यापासूनच स्वदेश आणि स्वनिर्मिती यांचा मूळ धरू लागलेला विचार आणि आधुनिकता व नावीन्य यांचा ध्यास यांतून भावी व्यवसायाचे स्वरूप माझ्या डोळ्यांपुढे येऊ लागले होते. त्यातच माझे आजोबा, सेनापती दादा चौधरी हे अहमदनगर जिल्ह्यातील सर्वत्र आदराने नाव घेतले जाणारे ज्येष्ठ स्वातंत्र्यसैनिक. कदाचित नकळत झालेला त्यांचा प्रभाव आणि घरातील संस्कार यांतूनही मी आपल्या मातीशी जोडला गेलो होतो. शिवाय, माझ्या वडिलांचे कार्यक्षेत्रही उसाच्या शेतीशी संबंधितच होते. त्यातूनच जेव्हा स्वतःचे व्यवसायक्षेत्र निश्चित करू लागलो, तेव्हा साखर कारखानदारीसाठीचे प्रकल्प आणि यंत्रसामग्री हे विषय नजरेसमोर येऊ लागले आणि त्यातच मी कार्यरत झालो.

पवार कुटुंबात सध्या कोण, काय करतंय?

शरदरावांसारख्या मोठ्या नेत्याचे कार्यक्षेत्र आणि रूचीचे विषय अनेक असले, तरी उसशेतीची सांगड प्रक्रिया उद्योगाशी घालणे हा त्यांच्या-माझ्यातील समान दुवा राहिला आहे. त्यांना त्यामधील "अ" ते "ज्ञ" जाणकारी आहे आणि मी सुरुवातीपासून त्याची प्रक्रिया उद्योगाशी सांगड घालण्यासाठी प्रयत्नशील राहिलो आहे.

पश्चिम महाराष्ट्रातला एक साखर कारखाना डिस्टिलरी प्रकल्प उभा करून देणाऱ्याचा शोध घेत असल्याचे समजल्यावरून मी या व्यवसायाच्या प्रवाहात प्रत्यक्ष उतरलो. व्यवसायासाठी एकत्र आलेले आम्ही मित्र-परिचित हे जाणकार आणि आपापल्या क्षेत्रातील अनुभवी मंडळी असलो, तरी ज्या प्रकारच्या कामामध्ये आम्ही प्रवेश करू इच्छित होतो, त्याचा अनुभव आमच्या गाठीशी नव्हता. त्यातून ते काम वेळेआधी पूर्ण करून आम्ही साखर कारखानदारीच्या क्षेत्रात नाव निर्माण केले होते. परंतु हे काम तंत्रज्ञानाशी जोडलेले होते आणि आमच्यापेक्षा अधिक अनुभव असलेल्या व परदेशी तंत्रज्ञानाचे हत्यार हाती असलेल्या एका कंपनीशी आमची तिथे स्पर्धा होती. अशा काळात, जून १९८६मध्ये माळेगाव साखर कारखान्याच्या डिस्टिलरीचे काम मिळावे, यासाठीचे सादरीकरण मी आणि माझ्या कंपनीने केले, तेव्हा त्या तंत्रज्ञानाच्या मूल्यमापनासाठी स्वतः पवारसाहेब हजर होते. स्थानिक उद्योजक म्हणून मिळालेले त्यांचे मार्गदर्शन आणि होकारात्मक दृष्टिकोन यांमुळे ते काम आम्हाला मिळणे सुकर झाले होते.

शरदरावांचे मार्गदर्शन मला यानंतरही सातत्याने मिळत राहिले. निरेतील पॉलिकेम लिमिटेड या कंपनीत आम्ही बसवलेल्या स्प्रॅनिहिलेटर (म्हणजे स्पेशल प्राज अॅनिहिलेटर या शब्दसमूहाचे आम्ही केलेले लघुरूप) या सांडपाणी व्यवस्थापन तंत्रज्ञान प्रकल्पाची पाहणी करून त्यांनी आम्हाला दिलेले प्रोत्साहनही मला आज आठवते. तेव्हा अगदीच नव्या असलेल्या अशा तंत्रज्ञानासाठी असे भक्कम पाठबळ आणि तेही अशा जाणत्या नेत्याकडून मिळणे ही आमच्या औद्योगिक वाटचालीला गती देणारी बाब होती.

शेतीमालाला पूरक उद्योग म्हणून अल्कोहोलनिर्मितीकडे कसे पाहता येईल, ही शरदरावांची नेहमी दृष्टी राहिली. अल्कोहोलवर आधारित रसायनांच्या उत्पादनांनाही ते प्रोत्साहन देत राहिले. ते मुख्यमंत्रिपदी असताना अकाली पडलेल्या पावसामुळे ज्वारी काळी पडली होती, तेव्हा त्यापासून आणि कडवळीपासून अल्कोहोल निर्मितीच्या शक्यतेवरून त्यांच्याशी माझी चर्चा झाली होती. पुढे मी प्राज अॅग्रोव्हिजन ही कंपनी स्थापन केली होती. तेव्हाही त्यांनी रंगीत ढोबळ्या मिरचीच्या प्रयोगासाठी आम्हाला प्रोत्साहन दिले होते. परंतु अशा प्रत्येक विषयामध्ये लक्ष घालताना ते त्याच्या अर्थकारणाविषयी विशेष जागरुक असत. त्या विषयाची व्यवहार्यता जाणून घ्यायचे. हा त्यांचा दृष्टिकोन लक्षणीय होता.

अंगणवाडी महिलांसंदर्भातील 'ती' बातमी शरद पवारांनी का दाबली माहितेय का?

ऊस पीक व त्याच्याशी जोडलेली कारखानदारी यांचाही मानवीय, व्यावहारिक आणि तंत्रज्ञान अशा विविधांगांनी अभ्यास करण्याचा शरदरावांचा आवाका माझ्यासारख्या तंत्रज्ञानाच्या पैलूशी जोडलेल्या माणसाला स्तिमित करत राहिला. विज्ञान-तंत्रज्ञानाने प्रगतीची नवनवी शिखरे काबीज केलेल्या काळातही ही प्रगती शेती-मातीशी जोडली नाही, तर चिरस्थायी ठरणार नाही, याची जाण त्यांच्यासारख्या नेत्याला असणे स्वाभाविकच आहे.

शेती असो की उद्योग, प्रत्येक क्षेत्राने काळानुरूप बदल करणे अनिवार्य असते. त्या-त्या क्षेत्रातील धुरिणांनी हे बदल घडवणे आणि ते आपापल्या क्षेत्राच्या परिसंस्थेला रुचेल-पचेल अशा रीतीने त्यांच्यापर्यंत पोचवणे हेही तितकेच गरजेचे असते. त्यातही मागणी-पुरवठा समीकरणातील मागणी हा अर्धा भाग हाती नसला, तरी उद्योगासारख्या क्षेत्रांना  पुरवठा साखळीचे नियंत्रण आपल्या हाती पूर्णतः ठेवता येते. मात्र आपल्यासारख्या देशातील शेती बहुतांशी मोसमी पावसावर अवलंबून असल्यामुळे त्याचा पुरवठाही एका मर्यादेतच त्यांच्या हाती राहतो आणि बाजारपेठही त्यांच्या नियंत्रणाबाहेर असते.

यातील उद्योग क्षेत्रामध्ये, विशेषतः नव्या शतकाची पहाट उगवल्यानंतर घडत असलेले बदल मी पाहात-अनुभवत आहे आणि काही बदल माझ्यासारखे उद्योजक आपापल्या कंपन्यांत घडवतही आहेत. अतिरिक्त साखरेच्या उत्पादनाचा प्रश्न डोळ्यांपुढे ठेवून माझ्या कंपनीने त्यापासून इथेनॉल निर्मितीचे तंत्रज्ञान आणले, त्याला आता दोन दशके उलटली आहेत. आता त्याही पुढे जात धान्याऐवजी जैवभारापासून, म्हणजे उसाचे पाचट, गव्हाचे काड, ज्वारीचे धाट, तांदळाचे ताट, मक्याच्या कणसाचा भुट्टा, कापसाचे देठ अशा शेतकचऱ्यापासून इथेनॉल निर्मितीचे तंत्रज्ञान आम्ही विकसित केले आहे. शेतीतील किफायतशीरपणा आणि खनिज इंधनामुळे देशाच्या अर्थव्यवस्थेवर पडणारा ताण या दोहोंवर हा तोडगा आहे. जोडीला प्रदूषणाच्या समस्येवरही त्यातून मार्ग निघणार आहे. हा विषय येथे विस्ताराने मांडण्याचे कारण म्हणजे पवारसाहेबांसारखे नेतेही साखर कारखान्यांनी इथेनॉल निर्मितीकडे वळावे, असे प्रबोधन ते सार्वजनिक व्यासपीठांवरून सातत्याने करीत आहेत.

शेतमालावर प्रक्रिया करून शेतकऱ्यांची औद्योगिक भरभराट साधणे हे त्यांच्याप्रमाणेच मीही पाहात असलेले स्वप्न आहे. एक सामान्य शेतकरी भारताच्या शेतीवर आधारलेल्या भवितव्याचा महत्वाचा दुवा बनावा, हीदेखील त्यांच्याप्रमाणे माझी इच्छा आहे.

PowerAT80 : हार के जीतनेवाला बाजीगर!

बायोटेक्नॉलॉजी इनोव्हेशन ऑर्गनायझेशन या औद्योगिक जैवतंत्रज्ञान क्षेत्रातील जागतिक स्तरावरील सर्वांत मोठ्या वाणिज्य संस्थेचा जॉर्ज वॉशिंग्टन कार्व्हर पुरस्कार अलीकडेच मला बहाल करण्यात आला. हा सन्मान होणारा मी पहिलाच भारतीय ठरलो. वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट या साखरेसंदर्भात संशोधन व विकासकार्य करणाऱ्या संस्थेने अलीकडेच या पुरस्कारानिमित्त माझा सत्कार आयोजित केला होता. साखर कारखानदारीतील दिग्गजांच्या उपस्थितीत साहेबांच्या हस्ते माझ्या कार्याची दखल घेतली जाणे ही कृतार्थतेची भावना निर्माण करणारे आहे.

शरदरावांबरोबरचा माझा संवाद हा मर्यादित, तरीही अतिशय अर्थपूर्ण राहिला आहे. एकाच वेळी वेगवेगळ्या विषयांवर विचार करण्याच्या आणि प्रत्येक गोष्टीतील बारकावा पकडण्याची त्यांची क्षमताही तेवढीच थक्क करणारी आहे. माझ्या कंपनीच्या कामाविषयीची आस्था आणि गुणग्राहकता दाखवणारा त्यांचा पैलूही मी अनुभवला आहे.

माती, मती आणि गती ही तिन्ही वर्तुळे परस्परांना छेदतात, अशा परिघामध्ये कार्यरत राहू शकणारी फार थोडी प्रेरणादायी माणसे आपल्याला अवतीभोवती पाहायला मिळतात. अशा माणसांकडून ऊर्जा घेण्याची संधी मिळणे हे आपले भाग्यच असते. हे भाग्य शरदरावांमुळे माझ्यासारख्या असंख्य भारतीयांना यापुढेही मिळत राहणार आहे. सहस्रचंद्रदर्शनाच्या वळणावर पोचलेला हा शरदचंद्र आपल्या समाजज्ञानाच्या शीतल प्रकाशात न्हाऊ घालत राहो, अशी त्यांच्या या वाढदिवसानिमित्त प्रार्थना.