
Budget 2022 : शेअर मार्केट : अर्थसंकल्पाचा अवघड पेपर!
गेल्या आठवड्यात ‘सेन्सेक्स’ ५७,२०० अंशांवर, तर ‘निफ्टी’ १७,६१७ अंशांवर बंद झाले आहेत. या आठवड्यात, उद्या, एक फेब्रुवारी २०२२ रोजी केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन देशाचा अर्थसंकल्प जाहीर करतील. अर्थसंकल्प जाहीर होण्यापूर्वी ३१ जानेवारीला आर्थिक पाहणी अहवाल सादर केला जाईल. सद्यःस्थितीचा विचार करता उत्पन्नापेक्षा खर्चाची बाजू जास्त असणारा वित्तीय तुटीचा अर्थसंकल्प जाहीर होण्याची परंपरा पुढे चालू राहणे अपेक्षित आहे. मात्र, अंदाजापेक्षा जास्त वाढत असलेले करउत्पन्न ही सध्याच्या बिकट परिस्थितीमध्ये सरकारसाठी एक जमेची बाजू आहे. कोरोना महासाथीमुळे उदभवलेल्या आर्थिक संकटांमुळे देशांतर्गत उत्पादनात झालेली घट, वाढती बेरोजगारी, आंतरराष्ट्रीय बाजारात भडकलेल्या तेलाच्या किमतींमुळे वाढलेली महागाई अशी अनेक आव्हाने सरकारपुढे असताना, अर्थसंकल्परुपी अवघड असलेला पेपर या आठवड्यात जाहीर होणार असल्याने गुंतवणूकदारांचे लक्ष त्याकडे असणार आहे.
अर्थसंकल्पात सरकारी कंपन्यांच्या निर्गुंतवणुकीचा वेग वाढवणे, खासगीकरणास प्राधान्य देणे, कृषी, वाहन उत्पादन, ऊर्जा, बँकिंग, पर्यटन, संरक्षण आदीं क्षेत्रांचा; तसेच रोजगारनिर्मिती या बाबी लक्षात घेऊन पायाभूत सोयी-सुविधांच्या विकासावर मोठ्या प्रमाणात तरतुदी करण्याचे सरकारचे उद्दिष्ट असणे अपेक्षित आहे. सरकारी कंपन्यांच्या निर्गुंतवणुकीचा वेग वाढवणे; तसेच आगामी काळात बहुप्रतीक्षित ‘एलआयसी’ची प्राथमिक समभागविक्री करण्याचे उद्दिष्ट असल्याने शेअर बाजारात गुंतवणुकीवर लागणारा कर, दीर्घकालीन व अल्पकालीन भांडवली लाभ कर, लाभांशावरील कर आदींमध्ये कोणता बदल होतो, याकडे देखील सर्वांचे लक्ष असणार आहे. सर्वसामान्यांसाठी एकूण उत्पन्नावर लागणारा कर कमी होणार का, करमुक्त उत्पन्नाची मर्यादा वाढणार का, ‘जीएसटी’च्या रचनेत बदल होण्याचे संकेत मिळणार का, अशा अनेक प्रश्नांचे उत्तरे अर्थसंकल्पातून मिळणार आहेत.
अर्थसंकल्पात उत्पन्नावर आधारीत कररचनेएवजी खर्चावर आधारीत कररचना येणार का, संपत्तीकर येणार का, क्रिप्टो करन्सीच्या व्यवहारांवर कर लागणार का आदी अनेक विषयांवर सध्या सोशल मीडियावर व्हायरल होणाऱ्या पोस्टमुळे चर्चांना उधाण आले आहे. अशा चर्चेतील विषयांवर देखील अर्थसंकल्पात उत्तरे मिळतात का, हे पाहावे लागेल.

बाजारात काय करावे?
ऑक्टोबर २०२१ पासूनच ‘सेन्सेक्स’ ६२,२४५ ते ५५,१३२; तसेच ‘निफ्टी’ १८,६०४ ते १६,४१० अंश या मर्यादित पातळ्यांमधेच चढ-उतार करताना दिसत आहे. तसेच गेल्या १० वर्षांत अर्थसंकल्प जाहीर झाल्यावर केवळ त्या दिवशी निर्देशांकातील होणाऱ्या हालचालींचा मागोवा घेता असे लक्षात येते, की सर्वसामान्य गुंतवणूकदाराने केवळ अर्थसंकल्पाच्या दिवशी अंदाज बांधून, धोका स्वीकारत अल्पावधीचा व्यवहार करण्याऐवजी अर्थसंकल्पानंतर कंपन्यांच्या आर्थिक प्रगतीचा वेध घेऊन नियोजनबद्ध पद्धतीने गुंतवणूक केल्यास ती फायदेशीर ठरू शकेल. यामुळे सर्वसामान्य गुंतवणूकदारांनी सध्याची परिस्थिती पाहता, केवळ अंदाजावर एकाच दिवसासाठी व्यवहार करून धोका स्वीकारण्याऐवजी दीर्घावधीचा विचार करून ‘दुर्घटनासे देर भली’ हे लक्षात घेणे आवश्यक आहे.
शेअरचे सध्याचे भाव आणि दीर्घावधीमधील मिळकतीमध्ये वाढ करू शकण्याच्या क्षमेतेनुसार ‘व्हॅल्युएशन’, त्याचप्रमाणे व्यवसायातील एकाधिकार किंवा वर्चस्व निर्माण करीत विकसनशील देशात होणाऱ्या प्रगतीचा वेध घेऊ शकणाऱ्या, कच्च्या तेलाच्या किमती चढ्या असताना देखील व्यवसायात तग धरून व्यवसायवृद्धी करू शकण्याची क्षमता दर्शविलेल्या किंवा क्षमता असलेल्या, कर्जाचे प्रमाण मर्यादित ठेऊन प्रगती केल्याचा इतिहास असलेल्या; तसेच आगामी काळात भांडवलावर उत्तम परतावा मिळवत व्यवसायात होत जाणाऱ्या ध्रुवीकरणाचा फायदा घेत उत्तम प्रगती करू शकणाऱ्या बर्जर पेंट्स, एचडीएफसी बँक, डॉ. लाल पॅथ लॅब, रिलॅक्सो फूटवेअर, टीटीके प्रेस्टिज आदी विविध कंपन्यांच्या शेअरचा विचार करावा. यामधील जोखीम लक्षात घेऊन दीर्घावधीसाठी टप्प्याटप्प्याने गुंतवणूक करणे; तसेच अर्थसंकल्पानंतर आढावा घेऊन पुढील गुंतवणुकीचे नियोजन करणे योग्य ठरू शकेल.
या लेखातील माहिती अभ्यासाच्या दृष्टिकोनातून दिली गेली आहे. प्रत्यक्ष व्यवहार करताना, जोखीम ओळखून वैयक्तिक गुंतवणूक सल्लागाराचा सल्ला घेणे आवश्यक आहे.
(लेखक ‘सेबी’ नोंदणीकृत गुंतवणूक सल्लागार आहेत.)
Web Title: Bhushan Godbole Union Budget 2022 Central Government Of India Economy
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..